शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

अंगणवाडीत  बाळ आणि बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:05 IST

बाबांनी आपल्या मुलांशी, बालकांशी  कसे वागावे, काय करावे, काय खेळावे,   संवाद कसा साधावा, या सार्‍या गोष्टी  बाबा पालक आनंदानं शिकताहेत.

ठळक मुद्दे‘बाबा’च्या ‘आई’ होण्याच्या प्रवासातला  हा वेधक टप्पा. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त..

- शांतीलाल गायकवाडबाबा बाळाचे डायपर बदलताहेत अन् आई त्याकडे कौतुकाने बघतेय. दुसर्‍या घरात अण्णा अंघोळ घालताहेत आपल्या चिमुकल्या पुतणीला. खालच्या आळीतील दोन-तीन चुणचुणीत बाळांशी गप्पागोष्टी करीत एक आजोबा त्यांना घेऊन अंगणवाडीकडे निघालेत. अंगणवाडीतही आता बाबा पालकांची गर्दी होते आहे, असे काहीसे बदललेले चित्र आता औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण, कन्नड व खुलताबाद या चार तालुक्यातून सहज नजरेला पडतेय.‘युनिसेफ’नं त्यासाठी पुढाकार घेतला असून, वर्धा येथील ‘सेवाग्राम’ तसेच ‘एकात्मिक बालविकास प्रकल्प’ व ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या सहकार्याने बाबा पालकांना आपल्या मुलांशी आणि कुटुंबाशी जोडून घेण्याचा हा प्रेमळ प्रकल्प ठिकठिकाणी सुरू आहे. त्याचे उत्तम परिणामही दिसू लागले आहेत.पारंपरिक साखळदंडात जखडलेली संस्कृती आता शहरी भागात सैल झालेली दिसत असली तरी अजूनही बालकांना अंघोळ घालणे, शी-सूसह त्यांची स्वच्छता राखणे, भरणपोषणापासून मुलांची तयारी करून त्यांना शाळेत पोहोचविण्यापर्यंतची सारी जबाबदारी आयांचीच, या घट्ट झालेल्या समजुतीला उपरोक्त चित्र धक्का देते आहे. गावातील  लहानसहान पोरं दोन-तीन तास कोंडणारी, त्यांना आहार देणारी व बाळांचे वजन करणारी एक खोली म्हणजे अंगणवाडी हे अनेक ठिकाणचे चित्र. या अंगणवाडीत राबताही फक्त बालक, माता व गरोदर महिलांचाच.  बाळगोपाळांना आणून सोडणे व घेऊन जाणे हे महिलांचेच अलिखित कर्तव्य आणि जबाबदारीही बाप मंडळींनी ठरवून टाकलेली.  मुलांचे बाबा, आजोबा, काका अर्थात पुरुष मंडळीची अंगणवाडीकडे चक्कर ही अपवादात्मक परिस्थितीतच होई. मूल हे आई-बाबा या दोघांचे असताना त्याच्या वाढ व विकासाची जबाबदारी फक्त आईवरच का? आता मात्र हे चित्र बदलतेय..औरंगाबादपासून 20 किलोमीटर अंतरावरील करमाड गावातील अंगणवाडी ‘बाबां’नी गजबजलेली. त्यात ‘आईं’ची संख्या मोजकीच. अंगणवाडी ताई या बाबांशी संवाद साधते आहे. बाबाही त्या संवादाशी एकरूप झालेले. गोलाकार आकारात उभे हे बाबा एकमेकांकडे दोरीचा बिंडाळा फेकताहेत. हो, हा बिंडाळा खाली मात्र पडू द्यायचा नाही. तयार झालेले दोरीचे हे जाळे थोड्यावेळाने जमिनीवर ठेवले जाते. हाच खेळ सर्व बाबांकडून पुन्हा खेळवून घेतला जातो. आता मात्र बिंडाळा खाली पडला की अंगणवाडीताई रागावते. चिडचिड करते. ओरडते. खेळाडूंना खेळ खेळण्यास वेळेचे बंधनही घातले जाते. आता तयार झालेले हे जाळेदेखील जमिनीवर ठेवले जाते. दोन्ही जाळ्यातील फरक निरीक्षणातून मांडावा लागतो. शांतचित्ताने, न रागावता आणि वेळेचे बंधन नसताना होणारे दोर्‍यांचे जाळे दाट असते तर, वेळेचे बंधन, राग, चिडाचिड अशा वातावरणात होणारे दोर्‍यांचे जाळे एकदम विरळ असते. या खेळाचे नाव मेंदूचे जाळे. बालकाच्या मेंदूचा विकास कसा होतो, हे या खेळातून बाप पालकांना शिकवले जाते. बाप मानूस अनेकदा रागीट, चिडचिडा व मारकाही असतो. मुलांना प्रेम देण्याऐवजी त्यांच्यावर चिडतो, प्रसंगी मारतोही. बालकांना रागावणे, भीती दाखवणे, बळजबरी करणे अशा गोष्टींमुळे मुलांच्या मेंदूचे जाळे विरळ होते. बालकांना हुशार करण्यासाठी त्यांच्याशी खेळणे, संवाद वाढवणे, त्यांना स्पर्श करणे, हे फार महत्त्वाचे असते. यातूनच त्यांचे मेंदूचे जाळे दाट होण्यास मदत होत असते, हे अंगणवाडीताई प्रयोगातून बापांना पटवून देतात.0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांच्या संगोपणात बाबांचा सहभाग वाढविणार्‍या या अभियानात बाबांनी बालकांशी काय खेळावे, कसे खेळावे, संवाद कसा साधावा, याचे प्रयोगासह सादरीकरण करून शिकविले जाते. त्यासाठी गावात लहान व मोठे पालक मेळावे भरविले जातात. या मेळाव्यांना उपरोक्त वयोगटातील बालके, माता, पिता आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींना निमंत्रित केले जाते. गावातील किशोरवयीन मुले-मुली, गर्भवती माता, गावातील सरपंचासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पोलीसपाटील, बचतगटांच्या सर्व महिला, शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक व शक्य झाल्यास आजूबाजूच्या गावातील सरपंच आणि उपसरपंचांनाही बोलावले जाते.या सर्वांच्या उपस्थितीत बाबांना मुलांसाठी खेळणी कशी तयार करावी, बालकांशी कसे खेळावे, संवाद कसा साधावा, याची प्रात्यक्षिके दाखविली जातात. बालकांशी थेट कृतीतूनही संवाद साधण्यास सांगण्यात येते. बाबांकडून कागदाची, मातीची वेगवेगळी खेळणीही तयार करून घेतली जातात. विशेष म्हणजे बालकांना बाजारातून विकत आणून कोणतीही खेळणी देऊ नका, घरातील टाकाऊ वस्तूतूनच खेळणी तयार केली जावी, असा दंडकच येथे आहे.बालकांच्या वयोगटानुसार वेगवेगळे खेळ आहेत. एका वयोगटाचा खेळ दुसर्‍या वयोगटाला चालत नाही. कारण हे खेळ मुलांच्या बौद्धिक व शारीरिक विकासाशी निगडित आहेत. 0 ते 1 वर्षाच्या बालकांसाठी चेंडू खाली टाकणे, बॅगमध्ये काय?, लपाछपी, गालाचा फुगा करणे, ओठांचे धडे असे खेळ आहेत. 1 ते 2 वर्ष वयोगटासाठी वस्तू उचलणे, वस्तूंची लपवाछपवी, वस्तूंची नावे सांगणे, वेगवेगळे आवाज, बडबडगीते पुन्हा पुन्हा म्हणणे इत्यादी खेळ आहेत. 2 ते 3 वर्ष वयोगटासाठी ‘तू काय करू शकतो?’, ‘तुला काय वाटते?’ , ‘लहान-मोठी पावले’, ‘मी मदत करतो’, ‘आकार लावणे’ आदी खेळ आहेत. हे खेळ बाबा खेळतात तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर येणारे हावभाव पाहण्यालायक असतात. अंगाई गीत गाणारे बाबा, बालकांसाठी घोडा होणारे बाबा. नुसती मज्जा.  यापुढे जाऊन संवादाचा आणखी एक छान खेळ पालकांना समजावून सांगितला जातो. गर्भवती महिला आणि तिच्या पतीलाही या मेळाव्यात आमंत्रित केले जाते. तेथे गर्भातील बाळाशी बाबांनी कधी संवाद साधलाय का, असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नावर अनेक बाबा लाजतात. ‘ही लाजण्याची गोष्ट नाही’, हे मग त्यांना समजावून सांगितले जाते. गर्भात बाळांच्या मेंदूची वाढ साधारणत: 25 टक्के झालेली असते. या अवस्थेत बाबा जर गर्भातील बाळांशी संवाद साधत असतील, तर बाळांची बौद्धिक क्षमता अधिक वाढते. याचे अनुभव अनेक बाबा-आई सांगत होते.विलास मते हे पालक सांगत होते, पूर्वी ही अंगणवाडी भात वाटणारीच होती. मी कधीच इकडे येत नव्हतो. आता माझे दुसरे अपत्य. पहिल्या अपत्याला मी एवढा वेळ व प्रेम देऊ शकलो नाही. अर्थात माझ्याकडे वेळ होता. पण कुठेतरी एक पुरुषी अहंकारही असावा. त्याची आई घरीच असते ना? मग करेल सर्व. माझी ही भूमिका आता बदलीय. मुलांना आता मी वेळ देतोय. त्यांचे प्रश्न समजून घेतो. त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. सुटीच्या दिवशी मुलांना अंघोळ घालतो. आमचे एकत्रित कुटुंब आहे. घरात चार मुले आहेत. त्या सर्वांना मी शाळेसाठी तयार करतो. त्यांचे बाबाही यात मदत करतात.  अंगणवाडीताई अरुणा कांबळे म्हणाल्या, मुलांची वाढ व विकास ही आईचीच जबाबदारी ठरलेली होती. आम्हीही पुरुषांशी कधीच बोलत नव्हतो. आता त्यांच्याशी खुलेपणाने संवाद साधतोय. अनेक बाबा आता आपल्या मुलांना तयार करून अंगणवाडीत घेऊन येतात. त्यांचे वजन वाढले की कमी झाले, यावर त्यांचे लक्ष असते. त्यामागील कारणेही ते विचारतात. कांबळे म्हणाल्या, एकदा गृहभेटीत गरोदर आईशी संवाद साधत असताना त्यांच्या मिस्टरांना आम्ही बोलावले होते. आम्ही त्यांना विचारले, गर्भातील बाळांशी पोटावर हात ठेवून कधी बोलतात का? यावर ते लाजले व म्हणाले, हे तर फक्त पिक्चरमध्येच होतेय. तेव्हा आम्ही म्हणालो, आमचे पाहून तर पिक्चर तयार होतो ना. पुढच्या भेटीत ते बाबाही आनंदाने गर्भसंस्काराच्या अनेक गोष्टी सांगत होते. कृष्णा पांचाळ यांची जुळी मुले अंगणवाडीत आहेत. ते म्हणाले, दिवसभर काम करून घरी आलो की, मुलांशी बराच वेळ खेळतो. त्यांचे कपडे बदलतो. शी-सू साफ करतो. त्यातून मिळणारा आनंद नाही सांगता येणार शब्दात. कृष्णा तारो म्हणाले, मी आता अंगणवाडीत सतत येतो. येथे अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात. मुलांना मी खूप वेळ देतो. मी मुलांना सांभाळतो व त्याची आई स्वयंपाक करते. मुलांना अंगणवाडीत आणून सोडण्याची जबाबदारी मी आता माझ्याकडे घेतलीय.रवींद्र धोत्रे यांनी सांगितले, माझा मुलगा व मुलगी दोघे अंगणवाडीत येतात. मुलगा मोठा. त्याला मी जास्त वेळ देऊ शकलो नाही याचे शल्य आता जाणवते. बाप म्हणून घरासाठी पैसे मोजले की, माझे काम संपले ही वृत्ती बदलली. मी मुलांना वेळ द्यायला शिकलो.  मंगेश कुलकर्णी यांनी सांगितलेले अनुभव मजेशीर होते. ते म्हणाले, मुलीला अंघोळ घालाविशी वाटते; परंतु ती इतकी लहान आहे की, नाकातोंडात पाणी जाण्याची भीती वाटते. मला वडिलांची आजही भीती वाटते. परंतु माझ्या मुलीला माझी भीती वाटत नाही. मी घरी गेलो की ती आईच्या तक्रारी माझ्याकडे करते. हे खूपच आनंददायी आहे. संदीप विठ्ठल मुंबे म्हणाले, आता मुलांसाठी आपोआप वेळ मिळतो. पूर्वी तो मिळत नव्हता. मी मुलांना घास भरवतो. डायपरही बदलतो. 

विसंवाद संपून संवादाला सुरुवातयुनिसेफच्या औरंगाबाद तालुका समन्वयक पूनम कावडे, सुपरवायझर सुनीता परदेशी यांनी बाबांमध्ये झालेले अनेक बदल यावेळी सांगितले. अनेक बाबा बालकांच्या संगोपणात सहभागी झाल्यामुळे अनेक घरात पतीपत्नीमध्येही चांगला संवाद घडू लागला आहे. त्यातून पतीपत्नीमधील विसंवाद संपल्याचे निरीक्षणही पूनम कावडे यांनी नोंदविले. युनिसेफ व सेवाग्राम - वर्धातर्फे एकात्मिक बालविकास प्रकल्प व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या सहकार्याने गेल्या वर्षभरापासून राबविण्यात येणार्‍या ‘बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचे आणि समुदायाचे सक्षमीकरण’ या अभियानाचे असे सकारात्मक परिणाम सध्या ग्रामीण भागातून दिसत आहेत. बालकांचा विकास व संगोपणाची जबाबदारी ही फक्त आई, आजीचीच अर्थात फक्त महिलांचीच नाही, तर कुटुंबातील सर्व सदस्यांचीच आहे. कुटुंबासह गावसमुदायातील प्रत्येक घटकाला जाणीव झाली पाहिजे की बालविकास ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, याचे भान हे अभियान गावकर्‍यांना करून देते आहे. या अभियानाचा उद्देश असा व्यापक असला तरी बालकांच्या संगोपन व वाढीत आता आईसह बाबाही लक्ष देऊ लागले आहेत.

shantilalgaikwad@gmail.com(लेखक लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)(छायाचित्रे : शेख मुनीर)