साहित्यपूजक
By Admin | Updated: June 7, 2014 19:01 IST2014-06-07T19:01:18+5:302014-06-07T19:01:18+5:30
कथां, कादंबर्यांनाही संपादन लागते असे कोणाला वाटतच नव्हते त्या काळात राम पटवर्धन नावाच्या एका संपादकांनी ही गरज निर्माण केली. आपली कविता, कथा त्यांच्या नजरेखालून एकदा तरी जावी असे कवी, लेखक यांना वाटू लागले. साक्षेपी संपादनाने मराठी साहित्याला अनेक लेखक देणार्या पटवर्धन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे स्मरण..

साहित्यपूजक
अरूण म्हात्रे
आता इतक्या वर्षांनी जाणवते की, मौजेच्या खटाववाडीतील त्या इवल्याशा इमारतीच्या अरूंद जिन्यातून वर गेल्यावर लागलेल्या सरांच्या टेबलासमोर, कोणी तरी कवी, लेखक, समीक्षक वा चित्रकार, गायक, तर नाटककार, शिल्पकार वा सामाजिक कार्यकर्ता बसलेला असायचा, त्या वेळी त्या दोघांतली ती नि:शब्द शांतताही, सृजनाचा टाहो फोडणारी असायची. साधा बुशकोट आणि साधी ढगळ पॅण्ट घातलेले राम पटवर्धन हे दिसायला जराही बॉस वगैरे वाटायचे नाहीत. पण, त्यांच्या पुढयात बसल्यावर त्यांच्या एकेक नेमक्या प्रश्नांनी अगदी चौकशीच्या प्रश्नांनीही समोरच्याला आपण एका ‘अग्निहोत्रा’ समोर बसलो आहोत याची जाणीव व्हायची.
मला आठवतोय तो काळ, अशोक शहाण्यांनी, मराठी साहित्यावर क्ष किरण टाकण्याचा आणि नंतर सर्र्व अनियतकालिकांच्या म्होरक्यांचा ‘सत्यकथा’ जाळण्यासाठी आलेल्या मोच्र्याचा ! खरे तर तोपर्यंत ‘सत्यकथा’ त्या वेळच्या कवी-लेखकांच्या नसानसात इतकी भिनली होती की लेखन म्हटले की आठवायची ती सत्यकथाच.
मी त्या वेळी पोदार कॉलेजमध्ये एफ.वाय/ इंटरला होतो. माझ्या सुदैवाने ५0 मार्कांच्या मराठीच्या पेपरसाठी शिकवायला चक्क राम पटवर्धन सर होते. एक-दोन तासातच मला सरांच्या लेखनशिस्तीच्या कडक आग्रहाची कल्पना आली. आपला मुद्दा शांतपणे, संयतपणे समोरच्याला सांगण्याचे कसब सरांकडे होते त्याच्या मागे त्यांचे वाचन, व्यासंग आणि त्यातून तयार झालेली काही विशिष्ट लेखनसूत्रे ही होती.
राम पटवर्धन हे एखाद्या कसलेल्या मल्लासारखे ‘सत्यकथा’ संप्रदायाच्या, सर्मथनासाठी पुढे असत. संपादक म्हणून श्री.पु. भागवत आणि त्याच्या अगोदर वि.पु. भागवत या दिग्गजांच्या खुर्चीत बसताना आपल्यापुढे लेखनाची किती विविध आव्हाने आहेत याची पटवर्धन सरांना पूर्ण कल्पना होती. पूर्ण कल्पना याचा अर्थ सरांच्या भाषेत स्वरूप, विस्तार, विविधता आणि र्मयादाही. आपल्या लेखन संहितेच्या घट्ट चौकटीत पटवर्धन सर, वर्तमानाला वा वास्तवाला स्पर्श करू पहायचे. पण, लेखक म्हणून, सामाजिक /राजकीय व्यवस्थेविरुद्ध व्यक्त होताना, आपली एक र्मयादा आहे याचे भान त्यांनी कधी सोडले नाही. उगाच ‘उठून दिसावे’ हे त्यांच्या रक्तातच नव्हते !
‘सत्यकथे’ची होळी करायला आलेल्या मोर्चेकरांपाशी जाळण्यासाठी ‘सत्यकथे’चे अंक नव्हते. तेव्हा ते अंक, मौजेतून आयत्यावेळी त्यांच्यापर्यंत पोहचवणारे राम पटवर्धन, एकांगी नव्हते. ‘मला तुमचे म्हणणे पटते हो, पण ते मी माझ्याकडे छापू शकत नाही, कारण ते आमच्या पद्धतीने आले नाही’ इतका सरळसाधा युक्तीवाद सर करीत. पण या त्यांच्या स्पष्टपणातच अनेक प्रश्नांची उत्तरे होती. राम पटवर्धन यांच्या विलक्षण नजरेला पसंत पडायला हवे, त्याहीपेक्षा पटायला हवे, यासाठी आपल्या लिखित साहित्याचे, दहा-दहा वेळा नवे तर्जुमे करणारे लेखक माझ्या पाहण्यात आहेत. ही ‘सत्यकथे’ची भीती ही होती आणि ‘सत्यकथे’वरची भक्तीही होती. लेखनात सरांना आपले परके असे कोणी नव्हते.
‘गोळीबंद’ लेखनाचे ते पुरस्कर्ते होते. (गोळीबंद हा त्यांचाच शब्द.) लेखन कसे ‘कसून’ करायला हवे (‘कसून’ हा शंकर वैद्य सरांचा शब्द) किंवा लेखन हे निर्दोष असायला हवे. ( हा बहुधा श्री. पुं.चा शब्द). या पद्धतीच्या लिखाणासाठी ‘सत्यकथा’ इरेला पेटली होती. आणि त्यांचे ते ‘इरेला पेटणे’ केवळ एका मासिकांसाठी नव्हते, तर ते समस्त मराठी वाड.मयासाठी होते. पटवर्धन त्या विचारांचे नम्र पाईक होते माझ्या वैयक्तिक आयुष्यात सरांचा सहवास फक्त दोन वर्षाचाच. पण मी चिकाटीने तो लांबवला. ‘सत्यकथे’त माझी कविता कधीच छापून आली नाही. (याचे फार दु:ख झाले नाही कारण नेमका तो काळ मी ‘राष्ट्र सेवा दलात क्रियाशील होतो. लेखनापेक्षा सामाजिक सहभाग महत्वाचा वाटण्याचे ते दिवस.) मात्र माझ्या विविध साहित्यिक उपक्रमांची माहिती, सरांच्या कारकिर्दीतच सुरू झालेल्या ‘परिक्रमा’ नावाच्या सदरात, जवळ-जवळ दर महिन्याला असायची.
माझ्या कविता लेखनाचा किस्सा तर फारच रंजक आणि उद्बोधक आहे. कॉलेजात ‘कवी म्हणून फार फेमस असलेला मी. मराठीतही वर्गात पहिला बिहिला यायचो. त्याच टेचात मी, त्या काळी लिहिलेल्या ८0 हून अधिक कवितांची वही सरांना वाचायला दिली. (आपण कसले अफाट धाडस केलेय याची त्या वेळी कल्पना नव्हती.) तीन-चार महिन्यांनी मी घाबरत घाबरत सरांच्या ‘सत्यकथे’च्या कचेरीत गेलो. फार शांतपणे त्यांनी माझी वही परत केली आणि म्हणाले ‘‘यात तुझ्या स्वत:च्या कविता नाहीत. आहेत त्या कुणाच्या तरी प्रभावातल्या. तुझी स्वत:ची अशी एक ‘अर्धी कविता मला मिळालीय. तू परत वाच म्हणजे मी काय म्हणतो ते तुला कळेल !’’ मला तो धक्काच होता. छोट्या-छोट्या कविसंमेलनात गाजणारा मी हा सरांच्या दृष्टीने कवीच नव्हतो ! मी अक्षरश: निराशेच्या गर्तेत गेलो. प्रेमभंगाहून दारूण अशी ती अवस्था होती. आपली वही, साश्रू नयनांनी पुन्हा- पुन्हा वाचण्यात तीन महिने गेले. आपल्या कवितेत पुन्हा-पुन्हा येणारे काही टिपीकल शब्द टाळून लिहायला हवे याचा पहिला धडा मला मिळाला.
कवितेसाठी नोकरी सोडतोय असा थोडासा हिरोईक निरोप सांगून, त्यांचे ेआशीर्वाद घ्यायला परत एकदा त्यांच्या मठीत गेलो. तेव्हाही, अरे लेखन ही जिविका तुझा प्राण, तुझा श्वास आहे. आता यापुढे या तुझ्या जिविकेला , तू उपजिविका करतो आहेस, हे लक्षात घे. हे काही कौतुकास्पद नाही, हे एक विचित्र व्रत आहे. आता ते कसे सांभाळायचे तुझे तू बघ ! असा जमिनीवर आणणारा सल्ला त्यांनी दिला. नंतरची आठ दहा वर्षे तो सल्ला किती योग्य होता, हे अनुभवण्यात माझी लेखन ऊर्जा कधी बहरली तर कधी ओसरली.
आता जो काही मी लेखनात आहे, त्यामागे आलोचनाचे सुहास बापट, अनुष्टुभंचे म.सु. पाटील, कविवर्य सुरेश भट, कविवर्य शंकर वैद्य, माझे मामा एम.पी. पाटील असे काही जण आहेत. पण राम पटवर्धन सरांनी केलेली कानउघडणी हा या लेखन विद्यापीठातला माझा पहिला धडा होता आणि त्याच ‘सत्यकथा’ हे माझं सिलॅबस होतं.
सुरुवातीच्या कॉलेजच्या दिवसात इतर मुलांनी केलेल्या सरांच्या टवाळीत मी ही असायचो. मात्र जसे सर समजत गेले तसे मी त्या उत्सृंखुल, ठोबळ आणि वखरच्या महाविद्यालयीन ‘फिल्लमगिरीतून बाहेर आलो.
सरांना आदरांजली देताना इतर इनेक लेखकांसारखे हेच वाटतय, जर त्या नेमक्या बहराच्या काळात राम पटवर्धन नावाचा ‘ऋषीतुल्य आचार्य’ समोर नसता, तर माझ्यातल्या किंचित लेखकाच तारू कुठल्या दिशेला जाऊन फुटलं असतं? मी अजून लिहिता असतो का?
कॉलेजच्या दुसर्या वर्षी ‘भजन’ नावाच्या एका एकांकिकेत मी काम केलं होत. त्यात अभिनयात थोडे उजवे असे आम्ही एकांकिकेतील काही भूमिकासाठी निवडले गेलो आणि आमच्या मित्रांपैकी एक मित्र ‘बुवा’ हे कॅरेक्टर मध्यवर्ती हे तुम्हाला कळले नाही. त्याला तुम्ही ‘वेटर’ म्हणून इतके दुय्यम तिय्यम केलेत की एकांकिकेचा कणाच निघून गेला.’ आम्ही सारे डोक्याला हात मारून बसलो अजून त्या चुकीचे अपराधीपण मनातून जात नाही.
राम पटवर्धन या व्यक्तीचे वैशिष्ट्य हेच की त्यांनी त्यावेळी सांगितलेल्या कैक ‘सूज्ञपणांच्या चार गोष्टी मनातून जात नाहीत. सर गेले पण त्यांच्या ‘सत्यकथा’ नावाच्या मठीतली नि:शब्द शांतता आणि सरांचे मोजकेत बोलणे एखाद्या ऐतिहासिक वास्तूतून आल्यावर तिथला आवाज नंतर कैक दिवस मनात घुमत रहावा, तसे घुमते आहे..
(लेखक साहित्यिक आहेत.)