'गांधी'पलीकडे अॅटनबरो

By Admin | Updated: August 30, 2014 14:59 IST2014-08-30T14:59:48+5:302014-08-30T14:59:48+5:30

महात्मा गांधींजींचं महात्मापण खर्‍या अर्थाने जगाला समजावून दिलं ते रिचर्ड अँटनबरो यांनीच! थोर व्यक्तिमत्त्वांवर आधारित कलाकृतींना अनेक र्मयादा येतात, बंधनं पडतात. ‘गांधी’ चित्रपटही त्याला अपवाद नव्हताच; पण त्या सगळ्या अडचणींवर मात करत रिचर्ड यांनी चरित्रपट कसा करायचा, याचा आदर्शच घालून दिला. त्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले. त्यांच्या चित्रपटीय कारकिर्दीचा वेध...

Attenborough beyond 'Gandhi' | 'गांधी'पलीकडे अॅटनबरो

'गांधी'पलीकडे अॅटनबरो

 अशोक राणे

 
रिचर्ड अँटनबरो गेले आणि आपल्यासमोर चटकन त्यांचा ‘गांधी’ आला. आपणा भारतीयांच्या संदर्भात हे साहजिकच आहे. परंतु ‘गांधी’पुरतीच त्यांची ओळख मर्यादित आहे का? आपल्या नव्वद वर्षांच्या जीवनप्रवासात आणि सत्तरहून अधिक वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी समाज आणि कला क्षेत्रात खूप काहीतरी केलंय. मिळवलंय.. परंतु आपल्यासाठी ते मुख्यत: ‘गांधी’वाले अँटनबरो! महात्मा गांधींचा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर खूप खोलवर परिणाम होता आणि म्हणून त्यांच्यावर चित्रपट करण्याचा त्यांनी निर्धार केला आणि असंख्य अडचणींवर मात करून त्यांनी तो पुराही केला. चित्रपटविषय म्हणून गांधी त्यांचा श्‍वास होता. परंतु एक गोष्ट फारच कमी लोकांना माहीत आहे आणि ती म्हणजे अँटनबरोंचं स्वत:चं व्यक्तिमत्त्व मुळापासून ‘गांधीयन’ होतं. ऑक्सफर्डला शिकत असताना वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी दोन निर्वासित र्जमन ज्यू मुलींना आश्रय दिला होता. दुसरं महायुद्ध सुरू झाल्याचा हा काळ होता. त्या वेळी नऊ आणि अकरा वर्षांच्या या मुलींना असा आधार देणार्‍या विद्यार्थिदशेतील अँटनबरोंनी पुढे त्यांना दत्तकच घेतलं आणि कायमचं पालकत्व स्वीकारलं. हा कोवळ्या वयातला ‘रोमँटिझम’ नव्हता. ही त्यांची वृत्ती होती. प्रवृत्ती होती. प्रकृती होती. मानवता त्यांच्यात पुरेपूर भिनलेली होती. आयुष्यभर त्यांनी अगदी थेटपणे आणि आक्रमकपणेही वर्णवादाच्या विरोधात भूमिका घेतली आणि ती त्याच निष्ठेने पाळली. दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांच्या लढय़ाविषयी त्यांना मन:पूत कळवळा होता. या लढय़ातला खंदा लढवय्या नेता स्टिव्ह बिको यांच्याविषयी त्यांना कुतूहल आणि त्याहीपेक्षा अपार आदर होता. स्टिव्हचा पत्रकार मित्र डोनाल्ड वूड्सविषयीही त्यांची अशीच भावना होती आणि म्हणूनच त्यांच्या लढय़ाची जगाला माहिती व्हावी म्हणून त्यांनी ‘क्राय फ्रिडम’ची निर्मिती, दिग्दर्शन केलं. वर्णभेद, राजकीय भ्रष्टाचार आणि हिंसाचाराचे थरकाप उडविणारे दुष्परिणाम याचं अतिशय भेदक आणि विचाराला प्रवृत्त करणारं चित्रण त्यांनी त्यात केलं होतं. दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांच्या लढय़ावरचा हा एक अतिशय श्रेष्ठ दर्जाचा चित्रपट होता. 
रिचर्ड अँटनबरो गेले आणि मलाही ‘गांधी’ आठवला; परंतु पाठोपाठच ‘क्राय फ्रिडम’ डोळ्यांसमोर दिसायला लागला आणि मग विन्स्टन चर्चिल यांच्या कारकिर्दीचा आरंभकाळ असलेला ‘यंग विन्स्टन’, ‘चॅपलिन’, ‘अ ब्रिज टू फार’, ‘अ कोरस लाइन’, ‘मॅजिक’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आठवले. वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी त्यांनी केलेला निर्माता - दिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट ‘क्लोजिंग रिंग’ आठवला. ‘द ग्रेट एस्केप’, ‘टेन रिग्लिंटन पॅलेस’, ‘फ्लाइट ऑफ द फिनिक्स’, ‘द सँड पेबल्स’, ‘एलिझाबेथ’, ‘ज्युरासिक पार्क’ आणि सत्यजित राय यांच्या ‘शतरंज के खिलाडी’मधील जनरल औट्रॅम अशा त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखाही नजरेसमोर तरळल्या.
रुपेरी पडद्यावरच्या त्यांच्या या काही भूमिका अनेकांना आठवतील. परंतु, आपल्यातल्या नटाविषयी खुद्द अँटनबरो यांनी असं म्हटलंय, की ‘‘मी एक सामान्य नट आहे. नाटकात आणि सिनेमात अशा काही भूमिका माझ्या वाट्याला आल्या आणि त्यासाठी त्या त्या लेखक - दिग्दर्शकांची जी मला मदत झाली, त्यामुळे नट म्हणून माझ्याबद्दल बरं बोललं गेलं. समीक्षकांनी कौतुक केलं. लॉरेन्स ऑलिव्हिए, पीटर ओ’टूल आणि पॉल म्युनी यांच्या जवळपासदेखील मी नट म्हणून उभा राहू शकत नाही.’’
विशीच्या उंबरठय़ावर रंगभूमीवर नट म्हणून आपल्या कलाजीवनाला आरंभ करणार्‍या आणि पुढे लंडनच्या जगप्रसिद्ध ‘रॉयल अकॅडेमी ऑफ ड्रॅमेटिक आर्ट’ या नाट्यशाळेत रीतसर नाट्यशिक्षण घेणार्‍या अँटनबरोंचं हे म्हणणं म्हणजे केवळ त्यांच्यातली नम्रता नव्हे, तर त्यांचं सखोल कलाभान आहे. अँटनबरो दिग्दर्शित ‘अ ब्रिज टू फार’मध्ये त्यांचे आवडते अभिनेते लॉरेन्स ऑलिव्हिए प्रमुख भूमिकेत होते, तर त्यांची आणखी एक आवडती कलाकार त्यात होती.. लिव्ह उलमन!
‘द ग्रेट एस्केप’ आणि ‘द सँड पेबल’ हे नट म्हणून त्यांचे स्वत:चे दोन आवडते आणि नट म्हणून समाधान देणारे चित्रपट असं ते म्हणत. ‘द सँड पेबल’मध्ये स्टीव्ह मॅक्विनबरोबर काम करताना आपण त्याच्या अभिनय कौशल्याने अक्षरश: भारावून गेलो होतो, असंही त्यांनी म्हटलंय. ‘गांधी’मुळे त्यांची जगभर एक वेगळी ओळख झाली. त्यांना निर्माता, दिग्दर्शक म्हणून दोन आणि चित्रपटाला एकूण आठ ‘ऑस्कर्स’ मिळाली, परंतु दिग्दर्शक म्हणून त्यांचा स्वत:चा आवडता चित्रपट ‘क्राय फ्रिडम’! ‘गांधी’विषयी लिहिण्याआधी या लक्षणीय कलावंताचे स्मरण जागवत, त्याला भावांजली वाहणार्‍याया लेखात काही गोष्टीचे उल्लेख येणे आवश्यक आहे.
वडिलांबरोबर लहानपणी चार्ल्स चॅपलिनचा चित्रपट पाहिला आणि तिथूनच त्यांना अभिनेता व्हायची प्रेरणा मिळाली. ऑक्सफर्डमधून पदवी घेऊन बाहेर पडताच त्यांनी आपला मोर्चा थेट रंगभूमीकडेच वळवला. अगाथा ख्रिस्तीचं ‘माऊसट्रॅप’ हे त्यांचं नाटक यशस्वी झालं आणि ते कलाक्षेत्रात कायमचे रुजले. १९५२ मध्ये ते रंगमंचावर आलं. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी शीला सिम या देखील ‘माऊसट्रॅप’च्या पहिल्या कलाकारसंचात होत्या. ‘द लीग ऑफ जंटलमन’ची १९५९ मध्ये निर्मिती करून ते चित्रपट निर्मिती क्षेत्रात आले. २00६ पर्यंत तिथे रमले आणि वर नमूद केलेल्या चित्रपटांसह इतरही अनेक लक्षणीय चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. दिग्दर्शन केले. ‘सत्यजित राय यांच्याकडून आपणास दिग्दर्शनाची प्रेरणा मिळाली आणि त्यांच्याच चित्रपटांतून आपण दिग्दर्शनाचे शिक्षण घेतले’ असं ते म्हणत.
समाजकार्य आणि शिक्षणक्षेत्रात आश्रयदाता आणि एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. वृद्ध कलावंतांना अखेरचे दिवस समाधानात काढता यावेत म्हणून त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने संस्था काढली. दोनेक वर्षांपूर्वी ते स्वत:च पत्नीसह तिथे मुक्कामाला आले आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्याआधी त्यांनी आपल्या मालमत्तेची निरवानिरव करून सर्वार्थाने मुक्तीचा मार्ग स्वत:हून पत्करला. शेवटच्या आजारपणाच्या अवस्थेत, व्हीलचेअरवर बसल्या बसल्या त्यांनी हे सारं केलं आणि ते शेवटच्या क्षणाला सामोरं जायला सिद्ध झाले. ही योजनाबद्धता हे त्यांच्यातील कलावंताचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य! ते ‘गांधी’मुळे आपणा भारतीयांना जवळून पाहता आलं आणि इथल्या ढिसाळ फिल्मी वातावरणाला कंटाळलेल्या, विटलेल्या लोकांनी मनापासून त्याचं कौतुक केलं.
‘गांधी’चा प्रस्ताव घेऊन रिचर्ड अँटनबरो सर्वप्रथम पंडित नेहरूंना भेटले, तेव्हापासून तो चित्रपट पूर्ण होईपर्यंत असंख्य वाद उपस्थित झाले.  मधल्या काळात नेहरूही गेले. इंदिरा गांधी आल्या. त्या सिनेमा साक्षर असल्यामुळे त्यांना अँटनबरो किती उत्तम प्रतीचा चित्रपट करू शकतील याची जाण होती. त्यांनी संपूर्ण पटकथा वाचली होती. आपले आक्षेप आणि त्याहीपेक्षा भारतीय जनता कशा पद्धतीने या ‘गांधी’कडे पाहील याची कल्पना त्यांनी अँटनबरोंना दिली आणि मग एनएफडीसीमार्फत अर्थसाह्यही दिलं. मुख्य आक्षेप होता, की गांधीजींच्या आसपासच्या काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा चित्रपटात नव्हत्या. एका चित्रपटात अख्खा गांधी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढा आणणं अवघडच होतं. परंतु रिचर्ड अँटनबरो सतत जे म्हणत होते, त्याकडे आक्षेप घेणारे लक्ष देत नव्हते. ते म्हणत, मी मला भावलेला, माझ्या एकूण जगण्यावर प्रभाव टाकून गेलेला आणि असा मी एकटाच नाही, तर असा हा महामानव माझ्या चित्रपटातून दाखवतो आहे. त्यासाठी त्यांनी त्यांना आवश्यक वाटणारे तपशील घेतले. मला माहीत आहे, की हे विवेचन आताही वादग्रस्त होईल. त्यावर मीही माझे म्हणणे मांडू शकतो; परंतु इथे त्यासाठी जागा नाही. असो. दिग्दर्शक आपल्या चित्रपटाची म्हणून एक गोष्ट गृहीत धरतो. कारण त्यातून त्यासंबंधी त्याला जे म्हणायचे आहे, तेवढेच त्याला दाखवायचे असते. आणि हे सूत्र मान्य व्हायला काहीच हरकत नसावी. रिचर्ड अँटनबरोंचा ‘गांधी’ असाच पाहायला हवा. एक गोष्ट मात्र मानायलाच हवी, की या चित्रपटाने ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावरचा चित्रपट कसा असावा याचा सुंदर वस्तुपाठच घालून दिला होता आणि म्हणून त्या वेळच्या सार्‍या आक्षेपांसकट आणि चित्रपट पाहिल्यानंतर मनाशी आलेल्या सार्‍या मुद्यांसकट ‘गांधी’ आठवतो. त्यातल्या चांगल्या आणि आवडलेल्या गोष्टींबद्दल इतक्या वर्षांनी आजही मन:पूत बोललं जातं. ‘बाबासाहेब आंबेडकर’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ आणि अलीकडचा ‘यशवंतराव चव्हाण’ यांच्या बाबतीत हे घडेल का? सांगूनच टाकतो.. कदापि नाही!
बर्लिन महोत्सवात एकदा मला बेन किंग्जलेंशी बोलण्याची संधी मिळाली. मी त्यांना विचारलं, ‘‘गांधींची व्यक्तिरेखा साकारताना नेमकं आव्हान कशा प्रकारचं होतं?’’ ते म्हणाले, ‘‘गांधी दिसायचे कसे, हसा-बोलायचे कसे, एकूणच त्यांची शरीरभाषा कशी होती हेही दाखवणं आव्हान होतं. परंतु मला गांधींचे डोळे महत्त्वाचे वाटले. त्यात एकाच वेळी मिस्कील भाव आणि करुणा होती. ते दाखवणं सर्वांत महत्त्वाचं आणि आव्हानात्मक होतं. खरे गांधी तिथे दिसतात. मी एवढंच म्हणेन की मी प्रयत्न केलाय.’’
बेन किंग्जलेंच्या या प्रयत्नाला सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर प्राप्त झाला. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे जगभरच्या आणि विशेषत: भारतीय प्रेक्षकांनी त्यांना भरभरून दाद दिलीय.. रिचर्ड अँटनबरोंना हाच गांधी दाखवायचा होता! 
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)

Web Title: Attenborough beyond 'Gandhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.