जर्मनीवर 'कला'स्वारी
By Admin | Updated: August 9, 2014 14:35 IST2014-08-09T14:35:53+5:302014-08-09T14:35:53+5:30
चित्रकार आणि ‘इन्स्टॉलेशन आर्टिस्ट’ डॉ. सुबोध केरकर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन र्जमनीतल्या विख्यात कुंट्स म्युझियममध्ये येत्या २0 ऑगस्टपासून भरणार आहे. त्यांचे चित्रवैभव आणि या वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाविषयी..

जर्मनीवर 'कला'स्वारी
अनंत साळकर
आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची नाममुद्रा उमटवणार्या गोमंतकीय कलाकारांत आघाडीवर असलेले चित्रकार आणि ‘इन्स्टॉलेशन आर्टिस्ट’ डॉ. सुबोध केरकर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन र्जमनीतल्या विख्यात कुंट्स म्युझियममध्ये भरणार आहे. देशातल्या नामचीन आणि निवडक कलाकारांची निवड या प्रतिष्ठेच्या प्रदर्शनासाठी करण्यात आली असून, सुबोध गुप्ता, सुदर्शन शेट्टी आणि एल. एन. तल्लूर अशा प्रस्थापितांबरोबर आपली कला सादर करण्याचा मान गोव्याच्या या पुत्राला देण्यात आला आहे. येत्या २0 सप्टेंबरपासून सुरू होणारे हे प्रदर्शन जानेवारीअखेरपर्यंत खुले असेल.
अर्थात अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय सन्मान डॉ. केरकर यांना नवे नाहीत. याआधी र्जमनीतच ‘जितादेल स्पँदावू’ आर्ट गॅलरीत त्यांच्या इन्स्टॉलेशन्सचे प्रदर्शन भरले होते. इंग्लंडच्या ‘सात्ची’ प्रदर्शनगृहात तसेच अँम्स्टरडॅम येथील ‘कॅन्वास’ आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातही त्यांच्या निर्मितीचे आणि कल्पकतेचे दर्शन कलाप्रेमींना घेता आले. असे असले तरी कुंट्स म्युझियममधील प्रदर्शन ही कुठल्याही आर्टिस्टसाठी अतीव सन्मानाची बाब असते.
सुबोध सांगतात, ‘‘ हे युरोपमधले प्रतिष्ठेचे प्रदर्शन तर आहेच, शिवाय आपल्या देशातील निवडक आणि मातब्बर कलाकारांनाच त्यांनी निमंत्रित केलेले आहे. माझी याआधीची प्रदर्शने परदेशातील गॅलरींत भरली होती. मात्र, या वेळेस पहिल्यांदाच मी म्युझियममध्ये माझी कला प्रदर्शित करतो आहे. अशा प्रकारची प्रदर्शने कमालीची व्यावसायिक तर असतातच, शिवाय काटेकोरपणे निवड करून केवळ उत्कृष्ट कलाकारांनाच तेथे संधी दिली जाते. येथे प्रदर्शन करणे म्हणजे त्या कलाकाराला राजमान्यता मिळणे.’’
कुंट्स म्युझियमचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांच्या दुनियेत वेगळाच दबदबा आहे. गेली पंधरा वर्षे येथे सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि विविध देशांच्या इतिहासावर आधारित प्रदर्शने भरवली जात आहेत. ‘स्पर्श’ या नावाने भरणार्या यंदाच्या प्रदर्शनाचे सूत्र आहे समकालीन भारतीय कलांवर हिंदू विधींचा प्रभाव. यात इन्स्टॉलेशन्सबरोबर शिल्पकला, मिनिएचर्स, तांत्रिक कला आणि व्हिडिओजचा समावेश असेल.
सुबोध केरकरांची एकूण आठ इन्स्टॉलेशन्स प्रदर्शित केली जाणार आहेत. त्यात ‘पूर्ण शून्य- पूर्ण कुंभ’ या अनोख्या कलाकृतीचा समावेश आहे. कुंभमेळ्यातल्या पूर्णकुंभाच्या संकल्पनेवर ही कलाकृती बेतलेली आहे. कुंभ हा हिंदू धर्मातले महत्त्वाचे प्रतीक. सुबत्ता आणि ऐश्वर्य दर्शवणारे. मंदिरांबरोबरच सामाजिक जीवनात या प्रतीकांना श्रद्धेने पूजतात. सुबोध यांच्या कलाकृतीत फायबर ग्लासचे अडीच मीटर उंचीचे दोन प्रचंड कुंभ असतील. एकाच्या बाह्यांगावर पाण्याचा भास करून देणारी सजावट साकारली असून, त्यावर उपडा ठेवलेल्या कुंभावर तडे गेलेल्या शेतजमिनीचे चित्र असेल. विपुलता आणि दारिद्रय़ यांचे या देशातले सहजीवन दर्शवणारी ही कलाकृती. सुबोध सांगतात, ‘‘आपल्या देशात पदोपदी विरोधाभास भेटत असतात. आपण विक्रमी कृषी उत्पादन घेतो आणि इथल्या भुकेकंगालांची संख्याही विक्रमी आहे. सांस्कृतिक वैविध्य असलेल्या या देशात सांस्कृतिक अतिरेक्यांचीही चलती असते. एकाच वेळी पूर्ण कुंभ आणि शून्य कुंभ असा विरोधाभास येथे पाहायला मिळतो. माझ्या कलाकृतीतून मला हेच सांगायचे आहे.
सुबोध यांची दुसरी प्रेक्षणीय कलाकृती आहे गणेश देव्हारा. गणेश हे आपल्या देशातील धार्मिक देवाणघेवाणीचे प्रतीक मानून त्यांनी ही निर्मिती केलीय. परधर्माचा प्रभाव दर्शवणारी अनेक शिल्पे आणि चित्रे देशातल्या मंदिर, मशिदी आणि चर्चमध्ये सापडतात. गोव्यातल्या एका चर्चमध्ये तर सेंट ख्रिस्तोफरला डोईवरल्या पाटीत बाल येशूला घेऊन पुराच्या पाण्यातून वाट काढताना दाखवले आहे. कृष्णजन्माची आठवण करून देणारी ही कलाकृती. कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याने अशा प्रकारे धर्माच्या बंधनातून स्वत:ची वाट शोधलेली दिसते. आपल्या देशाला संस्कृतींचा महाकुंभ म्हटले जाते. हीच संकल्पना सुबोध यांच्या या कलाकृतीतून साकारली गेली आहे. त्यांचा गणेश हा ऑगस्ट रॉडीनच्या थिंकरप्रमाणे सचिंत बसलेला आहे.
सुबोध केरकर यांनी देशातील कलाक्षेत्रात एक वादळी व्यक्तिमत्त्व म्हणून नाव कमावले आहे. परिघाबाहेर जाऊन जाणिवांचा धांडोळा घेणारा हा कलावंत अनेकदा वादाच्या भोवर्यातही सापडलेला आहे. त्यांच्या गणेशचित्रांमुळे मध्यंतरी सनातन भारतीय संस्कृती संस्थेने आंदोलनाचे हत्यार उपसले होते. या प्रदर्शनाचे श्रेयही डॉ. केरकर याच संस्थेला देतात. खट्याळपणे ते सांगतात, ‘‘त्यांच्या आंदोलनामुळे माझी चित्रे इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली. प्रदर्शनाचे आयोजक या चित्रांमुळे प्रभावित झाले आणि त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. नंतरच्या चर्चेतून मला नवे विषयही सापडले. त्यामुळे सनातनचा मी अत्यंत आभारी आहे.’’
सप्टेंबरपासून कुंट्स म्युझियम या र्जमनीस्थित बोकम शहरातील संग्रहालयात हे प्रदर्शन भरते आहे. डॉ. केरकर यांची प्रचंड इन्स्टॉलेशन्स आयोजकाना येथून न्यावी लागतील. त्यासाठी खर्च येईल तो किमान वीस लाख रुपये. अर्थातच आयोजक तो सोसतील. इतका प्रचंड खर्च कलाकारासाठी करणारे हे प्रदर्शन काय ताकदीचे आहे याची कल्पना यावरूनच यावी. गोव्याचा एक मनस्वी कलाकार इतकी उंची गाठतो आहे, ही बाबदेखील प्रत्येक गोमंतकियासाठी अभिमानास्पद अशीच.