चिमण्या खरंच नष्ट होत आहेत?
By Admin | Updated: May 31, 2014 17:35 IST2014-05-31T17:35:17+5:302014-05-31T17:35:30+5:30
घराच्या अंगणात खेळणार्या चिमण्या दिसत नाहीत आजकाल.. हे मोबाईल लहरींमुळे होतं म्हणतात. हे एकच कारण आहे का? की चिमण्यांप्रती असणारी आपली आस्थाच कमी होत चालली आहे?.. भौतिक कारणांसोबत याचाही शोध घ्यायला हवा.

चिमण्या खरंच नष्ट होत आहेत?
डॉ. जयंत वडतकर
पक्षी प्रजातीतील चिमणी हा पक्षी संपूर्ण जगात मानवाच्या सर्वांत जास्त परिचयाचा पक्षी असावा. अगदी पक्षी म्हणजे काय? यातलं काहीही कळत नसलं तरी चिमणी ही प्रत्येकालाच अगदी लहानपणापासूनच परिचयाची अन् जिव्हाळ्याचीही असते. तिची पहिली ओळख होते ती चिऊ- काऊच्या गोष्टीपासूनच. मात्र अलीकडच्या काळात शहरातील चिमण्या कमी होऊ लागल्या आहेत आताची पिढी चिमण्या पाहण्यापेक्षा विकासाच्या गोष्टीत जास्त रस घेताना दिसत असल्यामुळे कदाचित पुढच्या पिढय़ांना चिमणी माहीत असेलच असे ठामपणे म्हणता येणार नाही, हा भाग वेगळा!
युरोप व आशिया खंडामध्ये वर्षानुवर्षापासून जसाजसा शेतीचा प्रसार होत गेला, तशी चिमणी पृथ्वीतलावरच्या दूरदूरच्या प्रदेशात पोहोचली. १९व्या शतकात तिला न्यूयॉर्कमध्ये बगीच्यातील अळ्यांवर नियंत्रण व स्वच्छता ठेवण्यासाठी म्हणून नेले अन् चिमणी अमेरिकेतही स्थिरावली. या तिच्या सार्वत्रिकीकरणामुळे तिने मानवाच्या साहित्यात, संस्कृतीत अगदी जगभरातील बालगीतांमध्येही स्थान प्राप्त केले, ते उगीच नव्हे.
सर्वत्र सर्रास दिसणारा, मानवाच्या वस्तीभोवताली राहणारा सुंदर छोटासा पक्षी म्हणजे चिमणी. अलीकडच्या काळात संख्या झपाट्याने कमी होऊ लागल्यापासून खरंतर चिमण्या मोठय़ा प्रमाणात चर्चेत आली. त्यापूर्वी मानवी वस्तीभोवताली मोठय़ा संख्येत वावरणारी चिमणी तशी दुर्लक्षितच.
काही वर्षांपूर्वी जगभरात एक बातमी झळकली, की ‘मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे चिमण्या कमी होत आहेत.’ अन् सर्वांचे लक्ष पुन्हा चिमणीकडे वळले. अनेक शहरांमधून बातम्या येऊ लागल्या, की आमच्या शहरातून चिमण्या कमी झाल्या. काही ठिकाणी तर चिमण्या नष्ट झाल्या वगैरे वगैरे !
साधारणत: २00५च्या दरम्यान मी माझ्या संशोधनासंबंधीच्या काही कामानिमित्त मुंबईच्या प्रसिद्ध बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये गेलो असता चिमणीवर संशोधन करणारा तरुण पक्षीअभ्यासक दिलावर मोहम्मदची भेट झाली.
अर्थात पुढचं माझं दिलावरसोबतचं संभाषण ‘चिमणी’ भोवतीच होतं. साहजिक माझा पहिला महत्त्वाचा प्रश्न होता, मोबाईलमुळे चिमण्या संपत आहेत का? त्याच्या संशोधनाचा मूळ मुद्दाही हाच होता.
त्याने मला उत्तर देण्याची घाई केली नाही. जेवणानंतर आम्हाला मागील रस्त्याने घेऊन गेला. एका ठिकाणी फुटपाथवर आम्ही सारे थांबलो! फुटपाथ अन् रस्त्याकडेला पाण्याची दगडी भांडी ठेवलेली, बाजूच्या दगडी भिंतीमध्ये असंख्य फटी अन् फुटपाथवर जुनी वड, पिंपळ व इतर काही झाडं. पाण्याच्या भांड्याजवळ लोकांनी आणून टाकलेली बाजरी अन् विशेष म्हणजे या सार्याचा आस्वाद घेणार्या असंख्य चिमण्या तिथे दिसत होत्या. भोवताली गाड्यांची ट्राफिक, लोकांचा गोंगाट हे सारे होतेच. त्यांच्या जोडीला भारताच्या आर्थिक राजधानीत असंख्य कंपन्यांचे करोडो मोबाईल्स व त्यांच्या टॉवर्समधून निघणार्या ध्वनिलहरीही. मग लगेच म्हणावं का, मोबाईलमुळे चिमण्या कमी होतात हे खरे नाही! दिलावरने मात्र ते दाखवूनही विचार करून उत्तर दिले! तो म्हणाला, नाही सध्या तसं काही सांगता येणार नाही; पण माझ्या संशोधनाचा विषय येथूनच पुढे सुरू होतो. त्यानंतर मी या विषयाचा तुलनात्मक अभ्यास नाही; पण निरीक्षण सातत्याने इतकी वर्षे करतो आहे. विविध संशोधने, वृत्तपत्रांतील बातम्या वाचतो आहे! काय असेल चिमण्या कमी होण्यामागचं खरं कारण! चिमण्या खरंच कमी होत आहेत का? अनेक प्रश्न आहेत. चिमण्या कमी होण्यामागचे केवळ हेच एक कारण नसावे याचे भान त्याला असावे बहुदा.
निरीक्षणावरून काही अनुमान काढायचे झाल्यास ‘होय! चिमण्या कमी झाल्या आहेत!’ अनेक ठिकाणी झपाट्याने कमीही होत असल्याचे दिसून आले आहे. गावात घराच्या अंगणात पूर्वीचा चिवचिवाट आज ऐकू येत नाही? हे माझेच नाही तर सामान्य निरीक्षकांचेही अनुमान आहे. मग काय कारण आहेत चिमण्या कमी होण्यामागे. चिमण्यांच्या गरजा तशा फारच कमी. फक्त घरटं करण्याइतपत एक छोटीशी जागा मग ती फोटोमागे, भिंतीच्या फटीत वा खिडकी, दरवाजाच्यावर, जेथे जागा मिळेल तिथे. कधी विहिरीमधील छिद्रांमध्ये, खायला थोडे दाणे अन् वृक्षांवरची कीड वा अळ्या, बस्स एवढंच. मात्र शहरांमध्ये आजकाल आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीत बिचार्या चिमणीला जागाच नाही. अंगण नाही, अंगणात दाणा नाही, बाग आहे; पण अळ्या वा कीड नाही. असलीच तर ती कीटकनाशकांच्या प्रादुर्भावाने दूषित. हवेतही वाहनांच्या धुराचे प्रदूषण! मग चिमणी राहणार कुठे? शहरात राहीलच कशासाठी? मोबाईलच्या ध्वनिलहरींमुळेही चिमण्यांवर दुष्परिणाम होत असल्याचे काही संशोधनांमधून समोर आले असून ध्वनिलहरीच्या प्रकोपाने अंडी न उबवताच खराब होतात किंवा पिल्लू निघालेच तर लहरींच्या प्रकोपाने उडण्यापूर्वीच मरून जाते, हेही चिमण्यांची संख्या कमी होण्याचे महत्त्वाचे कारण आहेच.
ग्रामीण भागात, शेतीच्या प्रदेशात अगदी शहर सोडून थोडं बाहेर गेलं तरी आजही चिमण्या दिसतात, अगदी भरपूर नाही; पण दिसतात मात्र नक्की. म्हणजेच चिमणी आजही मानवाच्या सहवासातच राहणे पसंत करते, आपल्यालाच मात्र तिची गरज नाही, असे झाले आहे. ही मानसिकता आता तरी बदलायला हवी.
पहाटे उठल्या -ठल्या मन प्रसन्न करणारा चिमणीचा चिवचिवाट शहरात आजही ऐकू शकाल जर चिमण्यांनी अंगणात बागडावे, चिवचिवाट करावा, असे आपल्याला खरेच मनापासून वाटत असेल तर त्यासाठी त्यांना निवारा अन् खाद्य जर उपलब्ध करून दिले तर त्यांनाही तुमची गरज आहेच. आजकाल चिमणीचे घरटे लावण्याची पद्धत रूढ होत आहे. एक घरटं आपणही लावा, थोडे दाणे रोज बागेत टाका, एक पाण्याचं भांडं ठेवा, चिमणी तुम्ही लावलेलं घरटं लगेच ताब्यात घेईल अन् पुन्हा चिवचिवाट बहरेल तुमच्या अंगणात.!
(लेखक वाईल्ड लाईफ अँड एन्व्हायर्नमेंट कॉन्झर्व्हेशन सोसायटीचे मानद वन्यजीव रक्षक आहेत.)