...ज्याचा तिन्ही शिखरांवर झेंडा!
By Admin | Updated: May 31, 2014 17:39 IST2014-05-31T17:39:54+5:302014-05-31T17:39:54+5:30
आशिषनं ‘मकालू’ शिखर सर केल्याची माहिती नेपाळहून सातार्यामध्ये थडकली, तेव्हा त्याची आई इकडं घरासमोरचं अंगण शेणानं सारवत होती. ही गोड बातमी सर्वांना सांगण्यासाठी ती भरल्या हातानंच शेजारी-पाजारी पळाली. पत्र्याच्या घरात राहणार्या त्याच्या वडिलांनीही अंगणातल्या गायीला घरातली चपाती मोठय़ा मायेनं खाऊ घातली.. कारण, त्यांच्या लेकराचे हात आभाळाला टेकले गेले होते

...ज्याचा तिन्ही शिखरांवर झेंडा!
सचिन जवळकोटे
वेळ पहाटेची. तापमान वजा तीस अंश सेल्सिअसपेक्षाही खाली. ताशी चाळीसच्या वेगानं वारं सुटलेलं. कृत्रिम प्राणवायूची नळकांडी असूनही, श्वास घेताना खूप त्रास. थोडीशी हालचाल केली, तरीही प्रचंड दमछाक. तरीही हे दोन मराठी वेडे मोठय़ा जिद्दीनं हळूहळू वर सरकत होते. आता ‘मकालू’ शिखराचा शेवटचा टप्पा राहिला होता. ‘यशाचं शिखर गाठणं किती खडतर असतं,’ याचा शब्दश: अर्थ या दोघांनाही या क्षणी पुरता कळून चुकला होता. यातला एक होता सातार्याचा आशिष माने, तर दुसरा पुण्याचा आनंद माळी.
आनंदला थकवा जाणवू लागला, तेव्हा आशिषनं एकट्यानेच वर सरकण्याचा निर्णय घेतला. एकेक पाऊल पुढं टाकताना त्याला साक्षात मृत्यू डोळ्यांसमोर दिसत होता; कारण तारेवरची कसरत केल्याप्रमाणे अत्यंत निमुळत्या अशा निसरड्या कड्यावरून पुढं जावं लागत होतं. थोडा जरी पाय घसरला, तरी थेट नऊ - दहा हजार फूट खोल दरीत कोसळण्याचा धोका होता. आशिषला यापूर्वी ‘एव्हरेस्ट’ अन् ‘ल्होत्से’ या दोन शिखरांचा अनुभव होता; परंतु ‘मकालू’ची गोष्ट वेगळी होती. ‘एव्हरेस्ट’वर चौदा-पंधरा माणसं उभी राहू शकतील, एवढी जागा शिखराच्या वरच्या टोकावर होती. इथं एक माणूसही कसाबसा उभं राहणं अत्यंत अवघड होतं. कारण, शिखराचं टोक खर्या अर्थानं टोकदार होतं.
सुमारे २७ हजार फुटांवर आशिष पोहोचला, तेव्हा त्याचं शरीर पूर्णपणे गळून गेलं होतं. या उंचीवर बिलकूल हालचाल केली नाही, तरीही शरीरातली ऊर्जा आपोआपच नाहीशी होत असते, याची पूर्णपणे जाणीव असलेल्या आशिषनं मग न थांबता बर्फाच्या निसरड्या कड्यालाच आधार बनवला. कधी हात, तर कधी पाय हलवत तो शेवटच्या टोकाला पोहोचला. खरंच.. मराठी माणसाच्या इतिहासातला तो अत्यंत गौरवशाली असा क्षण होता. कारण, ‘एव्हरेस्ट, ल्होत्से अन् मकालू’ या तीन सर्वोच्च हिमशिखरांवर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणारा तो पहिला मराठी तरुण होता.
आशिषचे प्रशिक्षक उमेश झिरपे सांगत होते, ‘या मोहिमेची खूप दिवसांपासून आम्ही तयारी केली होती. सातत्यानं या तरुणांकडून सराव करून घेत होतो. त्या कष्टाचं चीज झालं. आशिषनं महाराष्ट्राचं नाव मोठ्ठं केलं. आम्हा सार्यांचंच स्वप्न पूर्ण केलं. इट्स ग्रेट अँचिव्हमेंट फॉर अस.’
वडील शरद माने बोलताना जुन्या आठवणी डोळ्यांसमोर आणत होते, ‘आशिष पावणेदोन वर्षांचा होता, तेव्हा मी त्याला आमच्या विहिरीतल्या पाण्यात फेकलं होतं. असं केल्याशिवाय तो स्वत:हून पोहायला शिकणार नाही, हा माझा अंदाज होता. मात्र, ही घटना पाहून माझे वडील रागानं माझ्या अंगावर धावून आले होते. एवढा लहान आशिष कसा काय पोहू शकेल, असा सवाल त्या वेळी त्यांचा होता अन् आज तो जगातल्या इतक्या उंच शिखरावर कसा काय पोहोचू शकेल, असा प्रश्न या वेळी मला पडला होता. त्याला डोंगरदर्यांची लहानपणापासूनच आवड. तो पाच वर्षांचा होता, तेव्हा आजोबांसोबत तो जुन्या पायवाटेवरून अख्खा पन्हाळा गड चढला होता. कोरेगावच्या जरंडेश्वर डोंगराचं तर त्याला भलतंच वेड. पाहता-पाहता उड्या मारत तो डोंगर सर करत होता.’
‘मुलाचे पाय जसे पाळण्यात दिसतात.. तसे आशिषचे पाय डोंगरात थिरकलेले दिसले होते.’ मात्र, त्याच्या गिर्यारोहणाला आई-वडिलांचा प्रचंड विरोध होता.
आई रेखा माने सांगत होती, ‘त्याच्या कुंडलीत उंचावरून खाली पडण्याचा अपघाती योग असल्याचं एका ज्योतिषानं आम्हाला खूप वर्षांपूर्वी सांगितलं होतं. त्यामुळं आम्ही त्याला गिर्यारोहणाला पाठवत नव्हतो. मात्र, एक दिवस शहरातल्या एका तरुणाच्या अपघाताची बातमी आम्ही पेपरात वाचली. रस्त्यावरून हळू वेगात चाललेल्या एका मोटारसायकलस्वाराला पाठीमागून येणार्या भरधाव ट्रकनं उडवल्याची ती बातमी होती. ते वाचून आमची चलबिचल सुरू झाली. अपघात घडायचाच असेल, तर तो इथं रस्त्यावरही होऊ शकतो. त्यासाठी आशिषच्या स्वप्नांचा चुराडा करणारे आपण कोण? असा प्रश्न आम्ही एकमेकांना विचारला अन् तत्काळ त्याला परवानगी देऊन टाकली.’
आई-वडिलांचा होकार हा आशिषच्या जीवनातला खूप मोठा ‘टर्निंग पॉइंट’ होता; कारण त्या परवानगीनंतरच त्यानं तीन मोठय़ा हिमशिखरांना गवसणी घातली होती. आशिष मोठय़ा कौतुकानं भरभरून बोलत होता, ‘मनात जिद्द असेल, तर मराठी तरुण काय करू शकतो, हेच मी जगाला दाखवून दिलंय. मी तीनही माऊंटवर पोहोचू शकतो, याचा आत्मविश्वासही याच टीमनं दिला. एव्हरेस्ट शिखर सर्वांत उंच असलं, तरीही मकालू शिखर अत्यंत अवघड अन् जीवघेणं होतं. खूप चॅलेंजिंग होतं ते माझ्यासाठी!’
गिर्यारोहण मोहीम ही जेवढी धोकादायक, तेवढीच पैशांसाठीही आव्हानात्मक. मोहीम यशस्वी होवो अथवा न होवो, लाखो रुपये पाण्यासारखे खर्च करावेच लागतात. (पर्वतावर वापरल्या जाणार्या सॅटेलाईट फोनचा खर्च मिनिटाला दोनशे रुपये एवढा असतो. यावरून ओळखा, बाकीच्या गोष्टी कितीच्या घरात असतील!) ज्याच्या घरची परिस्थितीच बेताची असेल, अशांचं काय? आजही पत्र्याच्या घरात राहणार्या माने दाम्पत्यानं आशिषचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखो रुपयांच्या उठाठेवी केल्या. इकडून-तिकडून ‘अँडजेस्ट’ करून त्याच्या छंदाला पूर्णपणे पाठिंबा दिला. आईनं अंगावरचं सोनं गहाण ठेवून पैसे उभे केले. केवळ ‘तो’ सर्वोच्च क्षण आपल्या आशिषनं अनुभवावा म्हणून!
(लेखक लोकमत सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)