गोव्याचं सर्वांगीण चरित्रं 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 08:00 AM2019-06-23T08:00:00+5:302019-06-23T08:00:04+5:30

सांस्कृतिक आणि पर्यावरणीय अवस्थेवर दीर्घ लेखांतून जे भाष्य करीत आहेत, त्यांचे विषयानुरूप संकलन त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या तीन पुस्तकांत आहे. ‘जहाल आणि जळजळीत’, ‘हिरव्या बोलीचे शब्द’ आणि ‘ओस्सय’ या पुस्तकांच्या त्रिधारेद्वारे गोव्याचे सर्वांगीण चरित्रच नायक यांनी मांडले आहे...

The all round biopic of Goa | गोव्याचं सर्वांगीण चरित्रं 

गोव्याचं सर्वांगीण चरित्रं 

Next

- विश्राम गुप्ते 

स्थानिक राजकारण आणि त्यात वावरणाऱ्या विविध सत्ताधाऱ्यांच्या व्यक्तिगत आणि राजकीय कारकिर्दीवर टाकलेला झोत आहे. कुठलीही भीड न बाळगता नायक वेळोवेळी विविध राजकीय नेत्यांची आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चिकित्सा करतात. लोकोपयोगी निर्णयांची घोषणा करून त्यांची अंमलबजावणी न करणं, हे चालू राजकारणाचं व्यवच्छेदक लक्षण झाल्यानं ‘रोलबॅक’ आणि ‘यू-टर्न’ हे दोन शब्द सत्ताधाऱ्यांच्या शब्दकोशात महत्त्वाचं स्थान भूषवतात. गोव्यातलं गेल्या दशकातलं राजकारण प्रामुख्याने दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भोवतालीच फिरत होतं. त्यांच्या धडाडीमुळे गोव्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. या सत्तेने निर्माण केलेले विविध सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक ताणतणाव ‘जहाल आणि जळजळीत’चा प्रतिपाद्य विषय आहे. गोव्याला गेल्या दशकापासून भेडसावणाऱ्या समस्या म्हणजे प्रादेशिक आराखड्याबाबत शासन आणि सामाजिक संस्थांमधला विवाद, मांडवी नदीच्या पात्रात उभे असलेले कॅसिनोज, इथल्या बंद झालेल्या खाणी, त्यांच्या लीजांमधला भ्रष्टाचार, खाणमालकांनी केलेलं खनिजाचं बेकायदा उत्खनन, त्यातून सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची सरकारी खजिन्याची झालेली लूट, न सुटलेला माध्यम प्रश्न, विशेष राज्याचा दर्जा, पर्यटन व्यवसायाची दुरवस्था, प्रदूषण, कचºयाच्या विल्हेवाटीचा प्रश्न आणि मासेमारीसारख्या पारंपरिक व्यवसायाला लागलेलं ट्रॉलर्सचं ग्रहण. गोव्यातल्या या प्रमुख समस्यांचा वेध श्री नायक विश्लेषणात्मक लेखांमधून घेतात.
गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वाढतं महत्त्व, कधी नव्हे ती संघात पडलेली फूट, ती पाडणारे संघाचे गोव्याचे प्रमुख सुभाष वेलिंंगकरांनी पर्रीकरांशी मांडलेला उभा दावा, त्याची कारणमीमांसा नायक करतात. त्याचसोबत गोव्यात वावरणारे विविध राजकारणी, त्यांचे व्यक्तिविशेष आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वांची चिरफाड ‘जहाल आणि जळजळीत’ करते. या लेखांतून गोव्यात रुजू बघणाºया उजव्या विचारसरणीची कठोर समीक्षासुद्धा आहे. माध्यमिक शाळांना शासकीय अनुदान देताना ते फक्त कोकणी आणि मराठी माध्यमातल्या शाळांनाच देण्यात यावं, ते इंग्रजी माध्यमातल्या शाळांना देण्यात येऊ नये. हा आग्रह धरून गोव्यात मातृभाषावादी कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. त्याला विरोधी पक्षनेते असलेल्या पर्रीकरांचा पाठिंबा होता. मात्र, पर्रीकर जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी इंग्रजी शाळांना अनुदान सुरूच ठेवले; त्यामुळे त्यांच्यावर यू-टर्न घेणारे मुख्यमंत्री म्हणून टीका झाली. कॅसिनो बंद करू म्हणणारे पर्रीकर ते बंद करू शकले नाहीत, खाणमालकांनी केलेली सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची बेकायदेशीर लूट खाणमालकांकडून वसूल करू शकले नाहीत, कचºयाची समस्या ते सोडवू शकले नाहीत अशा अनेक फसलेल्या निर्णयांची चिकित्सा ‘जहाल आणि जळजळीत’मध्ये विस्ताराने येते. पर्रीकरांच्या दु:खद निधनानंतर या लेखांना ऐतिहासिक परिमाण लाभते. एका अर्थानं हे पुस्तक गोव्याचं समग्र राजकीय चरित्र आहे. 
पर्रीकरांचं नेतृत्व हे चाणाक्ष होतं, हा नायकांचा प्रमुख युक्तिवाद आहे. त्यामुळे त्यांनी स्थानिक हिंंदू आणि ख्रिश्चनांना सामावून घेणारी ‘मिशन सालसेत’ म्हणजे दक्षिण गोव्यात बहुसंख्येने असलेल्या ख्रिश्चनांना भारतीय जनता पक्षात आणण्याची योजना राबवली आणि दोन्ही धर्मांच्या नेत्यांना घेऊन गोव्यात भाजपची सत्ता राबवली. त्यातून भाजप हा फक्त हिंंदूंचाच पक्ष आहे, ही धारणा मोडीत निघाली. या धार्मिक समरसतेसाठी पर्रीकरांना दूरदृष्टीचा नेता म्हणता आलं असतं; पण नायक त्यांना चाणक्यनीती राबवणारे नेते म्हणूनच सादर करतात. २०१२च्या सुमारास गोव्यात आलेल्या आप या राजकीय पक्षाच्या चक्रीवादळाबद्दल लिहिताना इतर पत्रकारांसारखेच नायकसुद्धा आपच्या राजकीय शक्तीबद्दल भारावून गेलेले वाटतात. मात्र, पुढे देशभरात आपची वाताहत सुरू झाली. कुठलीही ठोस राजकीय व्हिजन नसलेल्या आपसारख्या व्यक्तिकेंद्रित लोकप्रियतावादी आंदोलनाची मानसशास्त्रीय मीमांसा नायकांनी करावी, ही अपेक्षा आहे. स्थानिकांचं परदेशात नोकरीनिमित्ताने जाणं आणि त्यातून तयार होणाºया पोकळीत कर्नाटक, महाराष्टÑ, उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या प्रदेशांतून रोजंदारीवर काम करणाºया श्रमिकांनी येऊन ही पोकळी भरून काढणं, हे गोव्याच्या समाजशात्रातलं डायनामिक्स नायक ओळखतात. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातली पर्यावरण चळवळ अधिक सजग आहे. तिला इथल्या सुशिक्षितांचा पूर्ण पाठिंंबा आहे. त्यामुळे जंगलतोड, वनक्षेत्रात अवैध रीतीने सुरू झालेल्या लोहखनिज खाणी, सीआरझेड आणि त्यातून होणारा गोव्याचा औद्योगिक विकास, समुद्रकिनाऱ्यांवर उगवलेली बेकायदेशीर बांधकामं, मासेमारीसारख्या पारंपरिक व्यवसायावर आलेलं ट्रॉलर्सचं संकट, कचऱ्यांची समस्या, त्यातून निर्माण होणारे पर्यावरणाचे गंभीर प्रश्नं, अमली पदार्थांचा मुक्त वापर, इथल्या रानात आढळून आलेला पट्टेरी वाघांचा वावर, गोव्याच्या पर्यावरणीय हिताला बांधील असलेल्या स्थानिक एनजीओ, गोवा फाउंडेशनच्या कार्यावरचे दीर्घ आणि विश्लेषक लेख ‘हिरव्या बोलीचे शब्द’मध्ये वाचायला मिळतात.
नायक कट्टर पर्यावरणवादी संपादक असल्याने गोव्याच्या विविध पर्यावरणीय समस्यांचा त्यांनी घेतलेला विश्लेषक धांडोळा केवळ उद्वेग व्यक्त करीत नाही, तर या पर्यावरणीय समस्यांची सोडवणूक कशी करायची, याचं मार्गदर्शनसुद्धा ‘हिरव्या बोलीचे शब्द’मध्ये आढळून येतं. महाराष्टÑातल्या पर्यावरण चळवळीला मार्गदर्शक ठरतील, असे यातले काही लेख आहेत. गोव्याच्या निसर्गसौंदर्यावर भाळून इथे जगभरातील पर्यटक येतात; पण हे सौंदर्य राखण्याची जबाबदारी जशी स्थानिक नेतृत्वाची तशीच ती सामान्य नागरिकांचीसुद्धा आहे, असं संपादक सुचवतात. जगभरातच उपभोक्तावादाची लाट आली असताना पर्यटकांचा आवडता गोवा त्याला अपवाद ठरू शकत नाही. पण, या गोव्याला कचºयाच्या समस्येचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे विदेशी पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवू लागले आहेत. हे पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. कचरा इथला यक्षप्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर स्थानिकांच्या संकुचित मानसिकतेतसुद्धा शोधता येतं. त्रिधारेतलं तिसरं पुस्तक म्हणजे ‘ओस्सय’. गोव्यातल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची जडणघडण, शेकडो वर्षांपासून सुरू असलेली इथली पारंपरिक गावकरी प्रथा, त्यातूनच पुढे पोर्तुगिजांनी राबवलेली कोमुनिदाद ही ग्रामव्यवस्था, हिंंदू आणि ख्रिश्चन या दोन धर्मांचं परस्परपूरक सांस्कृतिक नातं, दोन्ही धर्मांच्या विविध रोचक प्रथा-परंपरा, सण आणि जत्रा, जागोरसारख्या अर्थपूर्ण लोककलांची अभिव्यक्ती, स्थानिक देवळांचा इतिहास, हिंंदूंच्या विविध जाती, बहुजनांचं सक्षमीकरण, सारस्वत ब्राह्मणांचं गोव्याच्या संस्कृतीतलं स्थान, विविध देवळांचे मालकी हक्क, कोकणी-मराठी भाषावाद, त्याला मिळालेलं हिंंसक वळण, आक्रमक ख्रिस्ती मानसिकता, चर्चची समाजाभिमुख भूमिका आणि ख्रिस्ती धर्माचं राजकारण, पोर्तुगीज भाषेचा कोकणीवरचा प्रभाव, रोमी लिपी आणि त्याअनुषंगाने निवडक ख्रिश्चनांचे आक्रमक राजकारण, त्रियात्र फॉर्ममधलं ख्रिस्ती थिएटर, गोव्यात रुजलेल्या सनातन संस्थेचा प्रभाव आणि त्यामुळे राष्टÑीय स्तरावर झालेली गोव्याची मलिन प्रतिमा, असे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरचे दीर्घ लेख ‘ओस्सय’चा विषय आहे. गेल्या दशकातल्या सांस्कृतिक घुसळणीचं विस्तृत वर्णन आणि विश्लेषण हे ‘ओस्सय’चं डोळ्यात भरणारं वैशिष्ट्य आहे. इथे विविध मतमतांतरांचा आढावा घेऊन संपादक विश्लेषक भाष्य करतात. त्यातून गोवा ‘मेल्टिंग पॉट’ म्हणजेच सर्वसमावेशक संस्कृतीला सामोरा जातोय, हे कळतं. पारंपरिक गोवा आधुनिक होत जातानाच्या प्रसूतिवेदना ‘ओस्सय’च्या पानोपानी ऐकू येतात. धर्म, भाषा, प्रदेश, बोली आणि जातीचे जुने कंगोरे बोथट होताना नव्या सामाजिकतेचा उदय गोव्यात होतोय; पण तो होत असताना पारंपरिक द्वेषावरचं राजकारण आणि संस्कृतीकरणसुद्धा इथे सुरू असल्याचा संपादकीय निष्कर्ष आहे. हिंंदू आणि ख्रिश्चन धर्मांमध्ये वाढणारी आक्रमकता हा चिंंतेचा विषय आहे. त्यावर उतारा म्हणून गोव्याची समृद्ध अशी जागोर आणि जत्रेसारखी सर्वसमावेशक मानवता धर्मावर आधारित सांस्कृतिक लोकपरंपरा उपयुक्त ठरेल, असं ‘ओस्सय’ वाचताना जाणवतं. पत्रकार चालू काळाचं विश्लेषणात्मक वर्णन करून इतिहासकारांची प्राथमिक साधनं तयार करतात. त्यामुळे आधुनिक गोव्याचा इतिहास समजून घेताना आणि तो लिहिताना राजू नायकांच्या या त्रिधारेला उपयुक्त संदर्भ ग्रंथाचं मोल प्राप्त होतं. राजकीय घटनांवर आणि सांस्कृतिक घडामोडींवर झटपट म्हणजेच अविचारी प्रतिक्रिया देणाºया सामाजिक माध्यमांच्या लोकप्रिय लेखनशैलीवर ही त्रिधारा चांगला उतारा आहे. मुख्य म्हणजे त्यातून गोव्याचं समग्र राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चरित्र उलगडतं. त्यामुळे गोव्याच्या आधुनिक अभ्यासकांना व सामान्य वाचकांना ही तिन्ही पुस्तकं ‘कंपलसरी रीडिंग’ म्हणून सुचवावीशी वाटतात.

(तिन्ही पुस्तकांचे प्रकाशक- जाग प्रकाशन, मडगाव, गोवा)
 

Web Title: The all round biopic of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.