आखाडों का भी पेट होता है.
By Admin | Updated: August 1, 2015 16:07 IST2015-08-01T16:07:35+5:302015-08-01T16:07:35+5:30
आखाडय़ांच्या जमिनी कुणाला विकता येत नाहीत. कुणा एका साधूची ती मालमत्ताही नसते. साधू महंत-महामहंत होतात, येतात-जातात, पण आखाडय़ांची मालमत्ता आखाडय़ांचीच राहते! आणि वाढतेही. तरीही झगडे होतात. अनेक साधूंचं आयुष्यच कज्जे, खटल्यांत हरवून जातं. - का?

आखाडों का भी पेट होता है.
>मेघना ढोके
मुळात या आखाडय़ांची गरज काय? दोन कुंभमेळ्यांच्यामध्ये हे आखाडे करतात काय? पोटापाण्याची सोय कशी होते आणि कुंभ दर कुंभ ‘नहात’ देशभर फिरण्यासाठीचा पैसा, साधनसामग्री हे साधूसमाजी आणतात कुठून?
हाच प्रश्न बडय़ा बडय़ा महंतांना विचारला की ते सांगतात, ‘आखाडे माने समङिाये सेना है साधुओंकी.’
- म्हणजे काय, तर एकेकाळी धर्माच्या रक्षणासाठी साधू एकत्र आले. त्यांनी आपली सेनाच बनवली. त्या सेनेतल्या तुकडय़ा म्हणजे हे खालसे नी गावोगावी वसलेली आखाडय़ांची स्थानं म्हणजे या सेनेच्या चौक्या म्हणूयात. मात्र ही झाली कोण्या एकेकाळची व्याख्या नी व्यवस्था! खरंतर त्यापुढच्या टप्प्यात साधुंचे हे आखाडे सुरक्षिततेच्याच हेतूनं निर्माण झाले!
सुरक्षितता कुणाची?
धर्माची? जनतेची??
या दोघांचीही, पण मुख्य म्हणजे साधूंची!
परस्परातील मतभेद, भांडणं आणि रोज उठून होणारे रक्तपात थांबावेत म्हणून या आखाडय़ांची निर्मिती झाली. त्यातून अयोध्या, हरिद्वार, अलाहाबाद येथे या आखाडय़ांची मुख्य स्थानं अर्थात गाद्या तयार झाल्या. आणि साधूंसह धर्माची कामं हस्ते परहस्ते सुरू झाली. त्यात हिंदू धर्माचे चार दिशांचे शंकराचार्यही येऊन मिळाले आणि धर्माकारणाची एकसंध ताकद, एकजूट मुघल काळात झाली. ही अशी सारी माहिती, मौखिक इतिहास आखाडय़ातल्या महंतांकडून समजत जातो! त्यातली एक गोष्ट मग उत्सुकता चाळवतेच!
हे साधू रक्तपात, मारामा:या करतात? कशासाठी? - विरक्तीच्या वाटेवर खूनखराबा हे ऐकूनच अजब वाटतं! विचारलं की अनेक साधू सांगतात, ‘आता कायद्याच्या राज्यात नाही खूनबिन होत. पण पूर्वी होत असत असं म्हणतात!’
- पण कशासाठी?
‘जमीं जायदाद बहुत लगी है आखाडोमें. और क्या?’ - उत्तर मिळतं!
म्हणजे काय तर अनेक आखाडय़ांची मालमत्ता प्रचंड असते. काहींकडे शेकडो एकर जमिनी असतात. काही ठिकाणी शेती होते, कुणी सालदार ठेवतो. त्या उत्पन्नातून आखाडय़ांचा, साधूंचा, येणा:या-जाणा:या खालशांचा खर्च भागवला जातो!
आखाडय़ांची ऐपत या इस्टेटीवर आणि त्यांना त्यांचे भक्तगण देत असलेल्या दानांवर ठरते. जितके पैसेवाले भक्तगण जास्त, आखाडा तितका जास्त पॉवरफुल हा साधा हिशेब!
इथवर गोष्ट सोपी, पण अवघड प्रश्न पुढेच की आखाडय़ांच्या या इस्टेटीवर मालकी कुणाची? वारसदार कोण? काही साधू आपले वारसदार, उत्तराधिकारी निवडतात. त्याच्या नावे मृत्युपत्र करून ठेवतात. आपल्या असतेपणीच उत्तराधिकारी म्हणून त्याला कारभार करू देतात! काहींच्या हातून मात्र सत्तेच्या चाव्या सुटत नाहीत, दोनचार शिष्यांना ‘तूच माझा उत्तराधिकारी’ असा फील देत ते झुलवत ठेवतात आणि मग ते आपापसात झुंजतात. राजकारण करतात. परस्परांचा काटा काढण्याचेही प्रयत्न करतात. पूर्वी याच कारणावरून म्हणो खूनही पडत असत! कधी शिष्यांचे, कधी महंतांचेही. स्वातंत्र्यानंतर मात्र या आखाडय़ांची रीतसर नोंदणी झाली.
साधूंच्या आखाडय़ांनाही पंचायती स्वरूप आलं. म्हणजे साधू आपापल्या समाजातून पंच निवडून देऊ लागले. साधूंचे आपसी कज्जे सोडवण्याचं काम ही पंचायत करते. साधूंच्या गैरवर्तणुकीबद्दल त्यांना दंडही सुनावले जातात. आखाडय़ाच्या बाहेर काढणं ही सर्वात मोठी शिक्षा. याशिवाय बहिष्कार, पंगतबंदी, कुंभस्नानबंदी अशाही काही कठोर शिक्षा मानल्या जातात!
या शिक्षेमुळे आयुष्यातून उठतात काही साधू ! आणि काहींना कटकारस्थानं करून आखाडय़ातूनच उठवलं जातं, अशी माहिती खासगीत मिळते. हे सारं कळलं की, आपल्या हाती साधू समाजाची काही गोपनीय माहिती लागली असं वाटू शकतं. पण तो गैरसमजही वेळीच दूर केलेला बरा, कारण हे सारं साधू समाजात ओपन सिक्रेट मानलं जातं. सगळ्यांना सगळं माहिती असतं. संमत नसेलही, पण त्यावरून काही गहजब होताना तरी निदान दिसत नाही. कारण मूळ मुद्दाच सत्ता-पैसा आणि जमिनीचा असतो.
हे खरंय की, आखाडय़ांच्या जमिनी कुणाला विकता येत नाहीत. त्या कुणा एका साधूची मालमत्ताही ठरू शकत नाही. साधू-महंत-महामहंत होतात, येतात-जातात, पण आखाडय़ांची मालमत्ता आखाडय़ांचीच राहते!
- आणि वाढतेही.. का?
या प्रश्नाच्या उत्तरात आणखी गंमत आहे. काही आखाडय़ांना ग्लॅमर येतं, त्यांचा महंत पॉप्युलर होतो, त्यांचे भक्त/साधक वाढतात. त्यातून त्यांची पुंजी अफाट वेगानं वाढताना दिसते. काही आखाडास्वामींना मात्र स्वत:भोवती असं कालानुरूप ग्लॅमर तयार करता येत नाही म्हणा किंवा ते तयार होत नाही. राजकीय वतरुळातल्या पॉवरफुल नेत्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेता येत नाही. सर्व स्थानातून ताकद वाढत नाही. ते मग मागेच राहून जातात. अंधा:या पत्र्याच्या शेडमधे, कुठंतरी कडेकपारीत विरक्त आयुष्य जगत राहतात. गरिबी पाठ सोडत नाही आणि कुणीही फारसं न फिरकणा:या या आखाडय़ात एकटेपणा साथ सोडत नाही. काही जणांचं तर सारं आयुष्य आखाडय़ांच्या जमिनीबाबत कोर्ट कज्जे, वकील आणि हेलपाटे यातच हरवून जातं!
फार विचित्र-विक्षिप्तही वाटतं हे सारं ऐकताना, पण मग नाशिकच्या खाकी आखाडय़ातल्या नरसिंहदास महाराजांचे शब्द आठवत राहतात.
‘आखाडों का भी पेट होता है ना बेटा!’
पोटापाण्याची मारामारी साधू झाले तरी संपत नाही आणि त्यातून सत्ता खुणावत असली की तिच्यासाठीचा संघर्ष याही समाजात टळत नाहीच! राजकारण कुठंही जा असं अटळच असतं बहुधा मानवी जगण्यात.
असावंच कदाचित!
खर्च आखाडय़ानं केला,
वेदना मात्र मीच भोगल्या.
त्र्यंबकेश्वरच्या एका आखाडय़ात महंत तीर्थसिंगजी निर्मल भेटले होते. निर्मल आखाडय़ाचे स्थानधारी महंत. एकदम उंचपुरे, हसरे सरदारजी आजोबाच! मूळचे लाहोरचे. पण फाळणीनंतर सगळा कुटुंबकबिला भारतात आला. नोकरी मिळाली पुढे पोलीस हवालदाराची. संसार केला. मुलंबाळं झाली. पण संसारात मन रमेना म्हणून साधू होऊन बाहेर पडले. निर्मल आखाडय़ात येऊन साधू झाले. त्र्यंबकेश्वरच्या आखाडय़ाचे महंत आजारी होते म्हणून त्यांच्या सेवेला आले ते इथलेच होऊन राहिले. म्हातारे झाले. सारं आयुष्य डोंगरकपारीत एकटय़ानं व्यतित केलं. म्हणाले, लिव्हरची दोन ऑपरेशन झाली. सारा खर्च आखाडय़ानं केला, पण वेदना तर माङया मीच जगलो. त्या कोण सहन करणार? मनुष्य असणं हे सगळ्यांचं एकाच पातळीवरचं असतं!
- बारा वर्षापूर्वीची ती भेट!
आज जेव्हा साधू समाजातलं, आखाडय़ातलं राजकारण चर्चेला घेतलं तेव्हा वाटतंय की खरंच माणूस असणं हे सगळ्यांचं समानच असतं. असावं. एकाच पातळीवरचं. साधू तरी त्याला अपवाद कसा ठरावा?
(लेखिका ‘लोकमत’मध्ये
मुख्य उपसंपादक आहेत)
meghana.dhoke@lokmat.com