नियतीशी करार
By Admin | Updated: December 31, 2016 13:12 IST2016-12-31T12:48:15+5:302016-12-31T13:12:57+5:30
‘कशासाठी जगायचं?’ - हे मी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच नक्की करून टाकलं होतं. कसं काय केलं असेल हे? तेव्हा माझी समजच काय होती? ‘भारताच्या खेडय़ातल्या लोकांचं आरोग्य सुधारायचं’ ठरवून केवढी मोठी जबाबदारी आपण शिरावर घेतो आहोत, हे समजण्याची अक्कल तरी होती का?

नियतीशी करार
>- शोधयात्रा
- डॉ अभय बंग
त्या दिवशी एक नवलच घडलं.
दोन मुलं सायकलवर डबलसीट बसून जात होती. मोठा समोर बसून सायकल चालवत होता; छोटा मागे कॅरीअरवर दोन बाजूला दोन पाय करून बसून आपल्या पायांनी पायडलवर जोर पुरवत होता. ते दोघं वर्धा शहराकडून पिपरी नावाच्या खेड्याकडे निघाले होते.
उन्हाळ्यातली दुपार भट्टीसारखी तापलेली होती. रस्ता चढावावर होता. दोघं दमून निंबाच्या झाडाखाली थोडा वेळ थांबले. दम घ्यायला लागले.
‘आपण दोघं आता मोठे झालो आहोत’ - मोठा म्हणाला.
‘हो, आपण आता मोठे झालो आहोत’ - छोट्याने रुकार दिला.
‘जीवनात काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे’ - मोठा म्हणाला.
‘ठरवून टाकूया’ - छोटा म्हणाला.
त्या दोघांनी त्या माळरानावर रस्त्याच्या बाजूला उभं राहून थोडा वेळ विचार केला. काय बरं करावं? ते दोन भाऊ म्हणजे माझा मोठा भाऊ अशोक व मी होतो. अशोक सोळा वर्षांचा, मी तेराचा.
समोर पिपरी खेडं दिसत होतं. अवतीभवती ठणठणीत कोरडी पडलेली शेतं होती. ‘शेतीची अवस्था वाईट आहे. खेड्यातली माणसं गरीब व उपाशी आहेत. ती आजारी आहेत. काही तरी केलं पाहिजे’ - आम्ही विचार केला.
ही बावन्न वर्षांपूर्वीची, १९६४ सालची घटना आहे. भारत चीनसोबत युद्ध हरला होता. नेहरूजी नुकतेच मरण पावले होते. आम्ही वर्तमानपत्रात वाचायचो - देश खचला होता. स्वातंत्र्याची पहिली आशा-उभारी काळवंडून चिंता सुरू झाली होती. भारतात अन्न-धान्याचं दुर्भिक्ष्य होतं. गुराढोरांना खाऊ घालायची ‘मिलो’ नावाची ज्वारी अमेरिकेहून जहाजाने यायची व ती गोदीतून खेडोपाडी पाठवली जायची. रेशनच्या दुकानासमोर रांगा लावून माणसं ती ज्वारी घ्यायची. भारतातली खेडी त्यावर जिवंत राहण्याची धडपड करत होती. मुलं खुरटलेली होती, माणसं खोकत होती.
समोर असलेल्या पिपरीतही हे होतं. हेच चित्र आम्ही वर्धा जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात पाहिलं होतं. हेच आम्ही खानदेशमधल्या भोकर नावाच्या खेड्यात एक वर्ष वनवासात राहताना पाहिलं होतं. बातम्या कानी यायच्या - हा टीबीने मेला, ती बाळंतपणात धनुर्वाताने मेली...
आम्ही दोघांनी त्या दिवशी आपल्या छोट्या कुवतीने विचार केला. भारतातील खेड्यातली शेती सुधरवली पाहिजे. आरोग्य सुधरवलं पाहिजे.
अशोक म्हणाला- ‘मी शेती सुधरवतो.’
‘बरं बुवा, मग मी आरोग्य सुधरवतो.’
माझ्या वाट्याला आलेलं मी स्वीकारलं.
तिथे उभं राहून आम्ही आपसात कर्तव्याची वाटणी केली. आयुष्याचा निर्णय घेतला. जणू नियतीशी करार केला.
मागे वळून पाहतो तेव्हा आज अचंबा वाटतो. त्या वयात आम्ही असा निर्णय कसा घेतला? पुढे खरंच तो वादा पाळला का? त्याचा माझ्या जीवनावर काय परिणाम झाला? हीच कथा आज सांगायची आहे.
आपण आज सर्वत्र बघतो - मुलं-मुली शोध घेत आहेत - कोणतं शिक्षण घ्यायचं, काय करिअर करायचं? कुठे जास्त संधी आहे? दहावी-बारावीपासून नव्हे, त्यापूर्वीच पूर्वतयारी सुरू होते. केजी ते पीजी हाच प्रश्न, हाच शोध. कोणतं करिअर करू? आई-बाप, काके-मामे, चुलत भाऊ-मावस भाऊ, शेजारी-पाजारी सर्व सल्ले देतात. शिक्षक मार्गदर्शन करतात. कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींनी वर्तमानपत्रांची पहिली पानं व्यापलेली असतात. शहरात व शहराबाहेर रस्त्यांवर मोठमोठ्या पाट्या लागलेल्या - ट्यूशन क्लासेसच्या. आयआयटी, नीट, सीईटी, जेईई, यूपीएससी-एमपीएससीच्या परीक्षांची तयारी. यातून जीवनाचा मार्ग शोधला जातो. एमपीएससीच्या निवडीची वयोमर्यादा आता बेचाळीस वर्षांपर्यंत वाढवली जाणार आहे. म्हणजे लाखो युवक-युवती बेचाळीस वर्षांचे होईपर्यंत करिअर निवडण्याची पूर्वतयारीच करत राहणार आहेत.
‘करिअरचा शोध’ हा बाह्य दिसणारा प्रश्न आहे. खरा आतला प्रश्न असतो - या जीवनाचं काय करू? आयुष्याचा हा निर्णय ‘मला कसं जगावंसं वाटतं, काय हवं-हवंसं वाटतं’ या आधारे आपण घेतो. म्हणजे की कुठे राहावंसं वाटतं - मुंबईला की पुण्याला, कोणती नोकरी हवी - सरकारी की प्रायव्हेट, साफ्टवेअर इंजिनिअर की बँकेत, घर किती मोठं हवं, टीव्ही किती इंचांचा हवा या स्वप्नांवर ‘जीवनाचं काय करू’ याचे निर्णय ठरतात.
माझं असं झालं नाही. ‘करिअर-निवड’ ऐवजी कर्तव्य-निवड म्हणून तो प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला. काय सौभाग्य ! केवढ्या जीवघेण्या स्पर्धेतून, वणवणीतून वाचलो. केवळ वाचलो एवढंच नाही, आयुष्याला ध्रुवतारा मिळाला. कितीतरी गोंधळ, भ्रम टळला. जीवन एक वरदान झालं. हा फरक कशामुळे पडला? ‘कशासाठी जगायचं’ हे तेरा वर्षांचा असताना त्या दिवशी मी कसं काय नक्की करून टाकलं? तेव्हा माझी समजच काय होती? ‘भारतातल्या खेड्यांतील लोकांचं आरोग्य सुधारायचं!’ केवढी मोठी जबाबदारी आपण आपल्या शिरावर घेतो आहोत याची अक्कल तरी होती का? ती व्यावहारिक अक्कल नव्हती हे एका अर्थाने बरंच झालं. नाहीतर कचरलो असतो. तो निर्णय झाला आणि पुढची वाट स्पष्ट होत गेली. त्याची ही कथा.
आणखी एक ब्रह्मप्रश्न आहे - कोऽहम ‘मी कोण आहे?’ अनादि काळापासून माणूस हा प्रश्न स्वत:ला विचारतो आहे. उत्तर सोपं नसावं. कारण खूप भ्रम, खूप तडफड होताना दिसते. मला तेव्हा हा प्रश्न नव्हता. पण पुढे तोही पडला.
मी कोण आहे? माझ्या जीवनाचं प्रयोजन काय? मी कसं जीवन जगू? या तीन अनादि प्रश्नांचा शोध कळत नकळत प्रत्येकच जण घेत असतो. बाह्य प्रश्न वेगळे व भौतिक जीवनाचे वाटले तरी आतले मूलभूत प्रश्न हेच असतात.
वस्तुत: प्रत्येकाचं जीवन याचीच शोधयात्रा असते. माझी शोधयात्रा कशी घडली? या प्रश्नांची उत्तरं मिळाली का? कशी मिळाली? यांची कहाणी या लेखमालेतून सांगणार आहे. आपली यशोगाथा सांगण्याचा मोह होऊ नये, शोधयात्रा सांगावी असा माझा प्रयत्न राहील. यशोगाथा ‘मी’ची असते, ती इतरांना काय उपयोगाची? शोधयात्रा मात्र प्रत्येकाची होऊ शकते. माझी स्मृती सुरू होते ‘महिलाश्रम’ मध्ये.
****
महिलाश्रम ही एक जादुनगरी होती.
वर्धा शहरच तसं मुळी छोटं. पन्नास हजार लोकसंख्येचं. त्याकाळी ते मध्य प्रदेशात होतं. या शहराच्या दोन विशेषता. एक, देशाच्या मध्यभागी असलेल्या या शहरातून दिल्ली-मद्रास व मुंबई-कलकत्ता अशा दोन्ही उभ्या-आडव्या रेल्वेलाइन जायच्या. दुसरी विशेषता, इथे महात्मा गांधी व विनोबा भावे हे दोन महापुरु ष राहिले होते. या दुसऱ्या ऐतिहासिक विशेषतेमुळे माझं जीवन घडलं.
१९१० च्या जवळपास जमनालाल बजाज दत्तकपुत्र म्हणून वर्ध्याला आले. या अस्वस्थ श्रीमंत तरुणाला साबरमतीच्या गांधींचं व त्यांच्या आश्रमी व्रतस्थ जीवनाचं फार आकर्षण. तसाच एक आश्रम वर्ध्याला सुरू करण्यासाठी त्यांनी गांधींना आग्रह केला. म्हणून गांधींनी आपल्या आश्रमातील एका तरुण शिष्याला - विनायक नरहर भावेला अर्थात विनोबांना - १९२२ मधे वर्ध्याला पाठवलं आणि साठ वर्षांचं एक पर्व वर्ध्याला सुरू झालं.
विनोबांनी वर्ध्याला आपला आश्रम सुरू केला. नाव दिलं - सत्याग्रहाश्रम. ते वर्धा शहराबाहेर एक-दीड मैल अंतरावर स्थिरावलं. तिथे तरु ण विनोबा व त्यांचे अनेक सहयोगी व शिष्य दहा पंधरा वर्षं राहिले. स्वत: आध्यात्मिक अध्ययन व व्रतस्थ जीवन जगणे, रोज आठ-दहा तास शेती, चरखा, सफाई अशी शारीरिक श्रमाची कामे कर्मयज्ञ म्हणून करून स्वत:ची भाकरी स्वावलंबनाने अर्जित करणे व स्वातंत्र्य आंदोलन आणि सत्याग्रहाचा प्रसार वर्धा जिल्ह्यात करणे असे हे त्रिविध जीवन होते. तिथे असतानाच विनोबांनी गीतेचा मराठी पद्यअनुवाद असलेली ‘गीताई’ रचली. ती इतरांना नीट समजते की नाही याची कसोटी घेण्यासाठी इथेच त्यांनी ती प्रथम कन्याश्रमातील मुलींना शिकवली. त्या सत्याग्रहाश्रम व कन्याश्रमातूनच निर्माण झालं होतं हे महिलाश्रम. पुढे तर स्वत: महात्मा गांधी वर्ध्याला राहायला आले. महिलाश्रमात काही काळ राहून मग तीन मैल दूर सेवाग्रामला त्यांनी आपला आश्रम सुरू केला. त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली व जमनालाल बजाजांच्या पालकत्वाखाली महिलाश्रम सुरू राहिला. वाढला. पूर्ण देशातून स्वातंत्र्य आंदोलनातील देशभक्त आपल्या मुलींना तिथे शिकायला पाठवायचे. अशी ही ऐतिहासिक जागा.
१९५३ साली, मी तीन वर्षांचा असल्यापासून माझी स्मृती इथून सुरू होते. दहा वर्षांचा होईपर्यंत मी इथे वाढलो. त्यावेळी गांधीजी व जमनालाल बजाज इतिहास झाले होते. विनोबा भूदान पदयात्रेवर देशभर पायी फिरत होते. पण त्या तिघांचा प्रभाव महिलाश्रमावर व वर्ध्यावर क्षणोक्षणी जाणवायचा.
पंचवीस-तीस एकर जमिनीवर पसरलेला पांढऱ्या भिंती व कौलारू छतांच्या इमारतींचा हा परिसर. विद्यार्थिनींसाठी छात्रालये, भोजनालय, विद्यालय, श्रमालय व शिक्षकांसाठी दहा-बारा घरे. परिसरात एक पक्की दोन मजली इमारत होती. पांढरी शुभ्र. राजहंसासारखी. वरच्या मजल्यावर मोठी मोकळी गच्ची होती. माझ्या लहानपणी रोज संध्याकाळी तिथे सामूहिक प्रार्थना व्हायची. गीताईच्या दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञाचे श्लोक, एक भजन, एक धून. गच्चीच्या मध्यभागी उंचावर एक मोठी रिकामी खोली होती. एकांत गुहेसारखी. तिथे कोणी नसायचं. रोज पहाटे चार-साडेचार वाजता तिथे प्रार्थना व्हायची.
ओऽम. ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे.
पूर्णापासून पूर्ण निष्पन्न होते.
ईशावास्य उपनिषदाचा पद्यानुवाद म्हटला जायचा.
सगळीकडे अजून गाढ अंधार असायचा. गूढ शांतता पसरलेली असायची. कंदिलाच्या अंधुक प्रकाशात महिलाश्रमातील साठ-सत्तर विद्यार्थिनी व अध्यापक त्याहूनही गूढ भासणारे उपनिषद गायचे. ईशावास्यचा मराठीत अनुवाद करून औपनिषिदक चाल स्वत: विनोबांनी लावलेली. प्राचीन व अर्वाचीन दधिची ॠषींचा स्पर्श लाभलेली ही प्रार्थना भारावून टाकणारी होती. बरंचसं समजायचं नाही. थोडंसं कळतं आहे असं वाटायचं, पण तितक्यात निसटायचं. गूढ अंधाराची व अंधुक प्रकाशाची रहस्यमय ओढ त्या मंत्रांना होती.
इथेच ही प्रार्थना मी लहानपणी प्रथम ऐकली. म्हटली. तेव्हा कळलं नाही, पण खोलवर गेली. पुढे चाळीस वर्षांनी ती मला पुन्हा अचानक भेटणार होती.
तेव्हा लहानपणी मला हे माहीत नव्हतं की जिथे बसून आम्ही गीताई व उपनिषदातल्या या प्रार्थना म्हणत होतो त्याच इमारतीत, त्या गच्चीवरच्या त्या एकांत खोलीत विनोबांनी संपूर्ण गीताई रचली होती. गीताईच्या प्रत्यक्ष जन्मस्थानीच बसून आम्ही सकाळी उपनिषद व संध्याकाळी गीताई म्हणत होतो.
आणि या सकाळ आणि संध्याकाळच्या दरम्यान माझं बालपण घडत होतं...
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि ‘सर्च’चे संस्थापक आहेत.)
shodh.yatra@gmail.com