शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नटाच्या भावनिक स्पेसची काळजी घेण्यार्‍या सुमित्राबाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 18:11 IST

आपल्या नटाची नस ओळखणं, त्याची काळजी घेणं, योग्य वेळी त्याला चुचकारणं, थोपटणं, कौतुक करणं यानं कलाकार म्हणून नि माणूस म्हणून मी बदलत जातो. हे सुमित्राबाईंसारख्या दिग्दर्शिकेला ठाऊक होतं.

- किशोर कदम, अभिनेता

(शब्दांकन : सोनाली नवांगुळ)

गोष्ट जुनी आहे. मी पं.सत्यदेव दुबेंकडं काम पंधरा-सोळा वर्षे काम करून नुकताच बाहेर पडलो होतो. वामन केंद्रेंकडंही वेगवेगळं काम करत होतो. एकूण बाहेर पडून नवं काम शोधत होतो. त्याच वेळेला सहकर्मी सोनाली कुलकर्णीचा ‘दोघी’ सिनेमा आला. तो बघून मला कळलं, सुमित्रा भावे नि सुनील सुकथनकर हे काय अद्भुत प्रकरण आहे! मग त्यांचे सिनेमे यायला लागले. बऱ्याचदा त्यात अतुल कुलकर्णी असे. मला वाटायचं, तो चांगलाच अ‍ॅक्टर आहे, पण मीही तर आहे. हे लोक माझा का विचार करत नाहीयेत? मग मी इकडून-तिकडून त्यांच्यापर्यंत माझ्याबाबत निरोप पाठवायला लागलो. एकदा बहुतेक ‘वाडा चिरेबंदी’ त्रिनाट्यधारेला की ‘गांधी विरुद्ध गांधी’ला बालगंधर्वमध्ये प्रयोग संपल्यावर सुमित्रामावशी मला भेटल्या. माझा हात हातात घेऊन म्हणाल्या, “अरे, तू मला किती आवडतोस तुला माहितीय का? आपण नक्की काम करणार आहोत एकत्र.” - आणि त्यांनी हळूहळू मला काम द्यायला सुरुवात केली.

सुमित्राबाईंबद्दल एक खासपण हळूहळू जाणवत गेलं. माझ्यासाठी ती घराहून जवळची व्यक्ती होती.सुमित्राबाईंच्या सेटवर एक मोकळं खेळीमेळीचं वातावरण असायचं. तशाच मूडमध्ये ‘एक कप च्या’च्या सेटवर एकदा मधला चहा चालला होता. नेहमीप्रमाणे कला, सिनेमे, कथा, कादंबर्‍या अशा कितीतरी गप्पा रंगल्या होत्या. मी त्यांना सहज म्हणालो, “मला स्वत:ला सिनेमा डायरेक्ट करायचाय नि त्यात कामंही करायचं आहे. दि.बा.मोकाशींच्या ‘आता अमोद सुनासि आले’ या कथेवर विद्याधर पुंडलिकांनी एक कथा लिहिली आहे, ‘फुलेचि झाली भ्रमर’ नावाची. या दोन कथा एकत्र करून मी एक स्क्रीनप्ले लिहिलेला आहे. किती वर्षे मी पुन्हा-पुन्हा वाचून ठरवतोय हे.” भर दुपार ओसरून सूर्य किंचित कलला होता. त्याची तिरीप झाडातून सुमित्राबाईंच्या डोळ्यांवर पडली होती. त्या नवलानं माझ्याकडं बघत म्हणाल्या, “अरे, किशोर... मी लिहिलाय स्क्रीनप्ले त्यावर नि लोहाराच्या भूमिकेत तूच डोळ्यासमोर आहेस.” मी खूश झालो आणि माझ्या मनातलं बाजूला ठेवून दिलं. मला करायचं होतं त्यांच्यासोबत काम.

त्या दिवसापासून दर पावसाळ्यात सुमित्राबाई व मी कास्टिंग जमा करायचो. आम्ही दोघं, सुनील सुकथनकर आणि कॅमेरामन लोकेशन बघायला बाहेर पडायचो. त्याबरहुकूम सगळं नियोजन ठरवायचो नि ऐनवेळेला प्रोड्युसर पळून जायचा. दहा वर्षांत असं सात-आठ वेळा झालं. हळूहळू माझ्या मनाला मी पटवायला लागलो की, ‘एक कप च्या’च्या सेटवर प्रॉमिस केलेला रोल आता सुमित्राबाई मला नाही देऊ शकत. त्यांच्या डोळ्यासमोर असणारा किशोर आता बदललाय, जाडा झालाय, शिवाय सिनेमाची आर्थिक गणितंही बदलली आहेत. त्यानुसार, आता त्यांना पॉप्युलर मोठा नट लागेल, पण एकीकडे मनाचीही ही तयारी करत होतो की, तो विशिष्ट रोल गेला तरी मिळेल तो रोल मी करेन. येनकेन प्रकारे या फिल्मशी असोसिएट व्हायचं मला. अखेर निर्माता फायनल झाला. पहिल्या वाचनासाठी सुमित्राबाईंच्या घरी सगळे जमले. मी घाबरत घाबरत मुंबईतून तिथं पोहोचलो. कास्टिंग बर्‍यापैकी जमलं होतं. माझ्या मनात येत होतं, आता बाई त्यांच्या खालच्या विशिष्ट सुरात मला सांगतील, “किशोर, आता तू नाही यात.” ज्या वयाचा व पोक्तपणाचा नट त्यांना हवा होता, त्यातले सगळेच दिग्गज वाचनाला उपस्थित होते. डॉ.मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर आदी. सगळेच घारीसारखे त्या भूमिकेवर नजर रोवून बसले होते. तितक्यात बाई म्हणाल्या, “लोहाराचा रोल किशोर करणार आहे.” - सुमित्राबाईंनी शब्द पाळला.

रामजीचं तरण्याताठ्या मुलाचं पिळवटून टाकणारं दु:ख मी कसं दाखवणार, हे खरंच मला माहीत नव्हतं. दुबेंकडचा, सिनेमातला पंधरावीस वर्षांचा सगळा अनुभव पणाला लावून काम केलं. शेवटच्या दिवशी खेड्यातल्या त्या घरातला शॉट संपवून मी पायर्‍या उतरून खाली आलो. सुमित्राबाई नि दोन-तीन असिस्टंट जमले होते. बाई टाळ्या वाजवायला लागल्या, म्हणाल्या, “एखाद्या चांगल्या अभिनेत्याने जीव लावून रोल केला की, त्याचं काय होऊ शकतं याचं उत्कृष्ट उदाहरण आहे हे.” माझ्या डोळ्यांत खरंच पाणी आलं. महिनाभर मी स्वत:सोबत रामजीला घेऊन फिरत होतो. प्रत्येक कलावंताच्या आयुष्यात एक कुठली तरी कलाकृती अशी असते की ‘हे मी केलं, मला मिळायचं ते मिळालं, बास! यश, पैसा दुय्यम आहे यापुढे,’ असं वाटतं.

‘एक कप च्या’ शूटिंगच्या वेळचा एक किस्सा. मी बस कंडक्टर. माझा मुलगा चांगल्या मार्काने दहावी पास होतो, तेव्हा मला दोन-तीन कॅमेरा घेऊन आलेले पत्रकार विचारतात, कसं वाटतंय तुम्हाला? - मी तयारीत होतो. एसटी स्टँडवर बुकिंग ऑफिसच्या वर सुमित्राबाई नि सगळी यंत्रसामुग्री होती. मी उभा राहिलो तयारीत. त्यावेळी सुमित्राबाई ज्या तर्‍हेनं ‘अ‍ॅक्शन’ म्हणाल्या, माझ्या मनात वीज चमकावी, तसं काहीतरी बदललं. मनात विचार आला, ‘हा साधा गावचा कंडक्टर आहे. कधी त्याने कॅमेरा फेस केलेला नाही. आज त्याच्यासमोर तीन कॅमेरे आहेत. कसा काय हा आत्मविश्‍वासाने बोलेल. हा साधा माणूस आहे. त्याला सुचणारच नाहीत वाक्यं बोलायला.‘ आणि त्या क्षणी मी थोडं बिचकत, हळवं होतं, कोंबत, रडू दाबत, हसत तुटकं तुटकं बोलत गेलो. बरं वाटून मी खाली बसलो नि सुमित्राबाई तिथं आल्या. माझ्या खांद्यावर हात टाकत पाठीवर थोपटून म्हणाल्या, “फार सुंदर केलंस!”

आपल्या नटाची नस ओळखणं, त्याची काळजी घेणं, योग्य वेळी त्याला चुचकारणं, थोपटणं, कौतुक करणं यानं कलाकार म्हणून नि माणूस म्हणून मी बदलत जातो. हे सुमित्राबाईंसारख्या दिग्दर्शिकेला ठाऊक होतं.नटाला त्याची स्पेस देणं, त्यानं भावनांचा, अश्रूचा जो दाब आत कोंडला आहे तो फुटू न देणं, ही अशी भावनिक काळजी घेणार्‍या त्या दिग्दर्शिका होत्या.माणूस म्हणून सुमित्राबाईंचा माझ्यावर जीव होता नि माझा त्यांच्यावर विश्‍वास. ज्या दिवशी सकाळी कळलं की, त्या आता नाहीत, तेव्हा मला काय वाटलं, हे सांगूच शकत नाही. ‘अमोद..’मध्ये दि.बा.मोकाशींचं एक वाक्य आहे. सिनेमात ते गिरीश कुलकर्णीच्या तोंडी आहे, ‘एखाद्या माणसाचं दु:ख समोरच्याला कळतं, पण ते जसंच्या तसं नाही कळूच शकत नाही.’ अगदी तसंच सुमित्राबाईंच्या नसण्याच्या दु:खाबद्दल. दुपारी घर रिकामं असताना काही न सुचून भांडी घासताना जो हुंदका फुटला तो नंतर आवरता येईना. रिकामं वाटतंय. तिचं जाणं कसं मान्य करू? 

टॅग्स :Sumitra Bhaveसुमित्रा भावे