चोवीस तासांचा हिशेब
By Admin | Updated: March 1, 2015 16:10 IST2015-03-01T16:10:09+5:302015-03-01T16:10:09+5:30
दिवसाचे तास एकूण चोवीसच! त्यात झोपेचे वजा केले, तर उरतात जेमतेम सतरा तास! आंघोळ-चहापाणी, कामधाम, त्यासाठीचा प्रवास आणि जेवणखाण यात तेरा ते पंधरा तास जातातच! म्हणजे उरतात जेमतेम दोन तास! हा सगळा वेळ माणसे काय करतात ?

चोवीस तासांचा हिशेब
>कुमार केतकर
दिवसाचे तास एकूण चोवीसच! त्यात झोपेचे वजा केले, तर उरतात जेमतेम सतरा तास! आंघोळ-चहापाणी, कामधाम, त्यासाठीचा प्रवास आणि जेवणखाण यात तेरा ते पंधरा तास जातातच! म्हणजे उरतात जेमतेम दोन तास! हा सगळा वेळ माणसे काय करतात ? - तर मुख्यत: आपापल्या
मोबाइलला चिकटलेली असतात. रेडिओ, गाणी, शेकडो खेळ, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअँप
आणि हे कमी म्हणून की काय आता तर टीव्ही आणि वर्तमानपत्रेही!
-----------------
दिवसाचे तास फक्त चोवीस. त्यापैकी साधारणपणे सात तास झोपेचे. शरीर व मानसशास्त्रज्ञांच्या मते सात तास झोप अत्यावश्यक. झोप कमी झाली असेल तर माणसे चिडचिड करतात, अस्वस्थ राहतात. कामे नीट करीत नाहीत, धडपडतात. भांडणे करतात. इतकेच काय, बहुतेक मोटारी, बसेस, रेल्वे वा विमान अपघातही पुरेशी झोप न मिळाल्यानेच होतात. तेही कमी झोप झालेल्यांच्या हातात सारथ्य असते म्हणून! असो.
काही प्रसंगांमध्ये चार-पाच तासच झोप मिळणे अपरिहार्य होते. मुलांना परीक्षांच्या काळात, पुढार्यांना निवडणुकीच्या काळात, पोलिसांना विशेष सुरक्षा जबाबदारी दिली जाते तेव्हा, सैन्याला युद्धकाळात वगैरे.. शरीर व मन अशा आणीबाणीच्या काळात बरेच लवचिक बनते आणि कार्य सिद्धीस न्यायला मदत करते. परंतु, एकूणच कमी झोप अतिशय हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मुंबईचे लोक लोकल गाडीत, बसमध्ये (नशिबाने बसायला जागा मिळाल्यास), गावाकडची माणसे एसटी बसमध्ये, दुपारी बसल्याबसल्या डोळा लागला तर, शाळा-कॉलेजांतील विद्यार्थी लेक्चर सुरू असताना आणि कर्मचारी मध्येच डुलक्या घेऊन झोपेचा तुटवडा भरून काढतात.
परंतु, मुद्दा तो नाही. दिवसाचे तास चोवीसच. त्यात झोपेचे तास वजा केले तर उरतात सतरा तास. त्यात कामासाठी करावा लागणारा प्रवास किमान दीड तास (मुंबईत कित्येकांना तीन तास). प्रत्यक्ष कचेरीत वा कारखान्यात, व्यवसायात वा तत्सम सुमारे आठ तास. सकाळची सर्व आवराआवर, नाश्ता-चहापाणी, दोन वेळची जेवणे, दुपारचा चहा वगैरे मिळून चार तास. म्हणजे सतरा तासांतून साधारणपणे तेरा ते पंधरा तास गेले. उरले दोन ते चार तास. त्यात मोबाइल, फेसबुक, व्हॉट्सअँप असे सर्वकाही. तसेच इंटरनेट, चॅट, मेल या गोष्टी. या दोन-चार तासांत वर्तमानपत्र वाचणे, टीव्ही पाहणे, घरातल्या मंडळींबरोबर घरगुती गोष्टी, समस्या इत्यादींसंबंधात चर्चा-गप्पा वगैरे. याशिवाय, घरगुती समारंभ, मित्र परिवार, शेजारपाजार या गोष्टी दर दोन-तीन दिवसांनी असतातच.
म्हणजेच, टीव्हीच्या बातम्या पाहायला किती वेळ मिळतो? बातम्यांबरोबरच चर्चांचे फड असतातच. याव्यतिरिक्त वर्तमानपत्र कधी वाचणार? मोबाइलवर अनंत गोष्टींबरोबर गप्पा, वाद, संवाद शिवाय गाणी वगैरे ऐकायची असतातच.
सहज लक्षात येईल की, एकूण जगाच्या वा परिसराच्या बातम्यांच्या विश्वात फार तर एक तास मिळाला तर मिळतो. ज्यांना बातम्यांपेक्षा चित्रपट वा मालिका वा अन्य करमणुकीचे कार्यक्रम अधिक आकर्षक वाटतात, त्यांचा बातम्यांसाठीचा वेळ आणखीनच कमी होतो. वर्तमानपत्रांत तर बातम्यांबरोबरच अग्रलेख, लेख, अन्य विश्लेषण हेही असतेच. ते वाचायचे तर त्यातच किमान अर्धा तास आणि जास्तीतजास्त तास-दीड तास जातो. (पण अशा प्रगल्भ, गंभीर वाचकांची संख्या कमीच असते वा कमी होत आहे. जसे बातम्या पाहणारे सर्व जण, चर्चांचे वितंडवादी फड पाहणारे-ऐकणारे कमीच.)
वेळेचा असा तुटवडा, ही बाब तशी गेल्या वीस वर्षांतली. टीव्हीवरचे आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास चालणारे बातम्यांचे चॅनल्स (म्हणजे खासगी) हे वीस वर्षांपूर्वी सुरू झाले. त्यापूर्वी फक्त दूरदर्शनच्या बातम्या आणि त्याही ठरावीक अंतराने, विशिष्ट वेळांना. केव्हाही टीव्ही लावून बातम्यांचा धो-धो नळ वाहत नसे. तथाकथित पॅनल चर्चा जवळजवळ नसतच. त्यामुळे बहुसंख्य लोक वृत्तपत्रे वाचत. अगदी लेख, अग्रलेख, स्फुटे वाचत. रेडिओवरच्या बातम्या ऐकत. रात्रीच्या o्रुतिका ऐकत आणि आकाशवाणी आयोजित मैफलींसाठीही रात्री वेळ काढत. निदान, काही प्रमाणात वेळेचे नियोजन शक्य होते. पूर्वी प्रवासातच पेपर वाचत (काही जण चक्क पुस्तकेही वाचत). पुढे मोबाइल फोन आले. पण, १९९५ ते २000 या काळात मोबाइल फोनवरच्या एका मिनिटाला तब्बल सोळा रुपये पडत. साहजिकच, मोबाइल वापरणे हे o्रीमंतीचे व उच्चभ्रूपणाचे लक्षण होते.
पुढे हळूहळू मोबाइलवर बोलण्याचा दर कमी होत गेला. मोबाइलही वजनाला अगदी हलके होऊ लागले. लोक कित्येकदा बोलण्याऐवजी एसएमएस करू लागले. ‘मिस्ड कॉल’ देऊ लागले. त्यानंतरच्या टप्प्यात मोबाइलवर इतर अनेक गोष्टी येऊ लागल्या. लोकांचे कॉन्टॅक्ट्स हजारांत गेले. मोबाइलची फोन डिरेक्टरी कितीही वाढली तरी मोबाइल आकार मात्र उंची, रुंदी व जाडीने लहानच होत गेला.
मग मोबाइलवर रेडिओ, गाणी, शेकडो खेळ आले. इंटरनेट आले. फेसबुक, व्हॉट्सअँप, ट्विटर आले. आताचा मोबाइल फोन २0 वर्षांपूर्वीच्या पर्सनल कॉम्प्युटरपेक्षा अधिक सोयी-सुविधा देतो. आता मोबाइलवरच बातम्या, टीव्ही कार्यक्रम, ई-मेल्स, गुगल सर्व काही अगदी रेल्वे वा विमान तिकिटे, हॉटेल बुकिंग्जपासून सर्वकाही ‘दुनिया इस मुठ्ठीमे’.. असा हा २४ तास सेवेसाठी हजर असलेला मोबाइल सेवक हाताशी असेल तर टीव्हीवरच्या बातम्या आणि चर्चांचे फड कोण पाहणार? ऐकणार?
पूर्वी कुणाला टेलिफोन करायचा असेल आणि नंबर नसेल तर किलो, दोन किलो वजनाच्या फोन डिरेक्टरीत नंबर शोधत बसावे लागे. ती डिरेक्टरी प्राप्त करण्यासाठी टेलिफोन कंपनीकडे जाऊन रांगेत उभे राहून ते दोन-तीन व्हॉल्युम्स मिळवावे लागत. पुढे त्या डिरेक्टरी ‘सीडी’वर आल्या तेव्हा केवढी क्रांती झाल्यासारखे वाटत होते. आता तर मोबाइलमध्येच भली मोठी डिरेक्टरी! त्यात संबंधित नंबर, पत्ता, कंपनी, कार नंबर, इतकेच काय त्या व्यक्तीचा फोटोही.
आणि हे सर्व प्रत्यक्षात आले केवळ गेल्या पंधरा वर्षांत आणि तरीही वय वष्रे चार ते चौर्याऐंशी या सर्व आबालवृद्धांना हे सर्व अंगवळणी पडले आहे.
सर्व दृकo्राव्य माध्यमांना एका मुठीत बसविण्याचे हे तंत्रज्ञान पुढील पाच वर्षांत आणखी कितीतरी गोष्टी प्रत्येक व्यक्तीला देणार आहे. वर्तमानपत्रे आली, टीव्हीचे सर्व चॅनल्स जर मोबाइलवर आले तर सकाळी घरात पडणारे वृत्तपत्र कालबाह्य होईल आणि एलईडी टीव्हीसुद्धा!
असे असूनही नवेनवे टीव्ही चॅनल्स येत आहेत आणि वर्तमानपत्रेही. नुसत्या बातम्या व त्यासंबंधी चर्चा करणार्या चॅनल्सची संख्या सुमारे ३00 आहे. (स्थानिक, लोकल, सिटी, नेबरहूड चॅनल्सही आले.) सुमारे ३0 चॅनल्स इंग्रजी आहेत. एकूण बातम्या पाहणारे, ऐकणारे लोक दर्शकांच्या पाच टक्केही नाहीत. सर्वात जास्त दर्शक, o्रोते अर्थातच हिंदी भाषक.
वर्तमानपत्र वाचणारे नुसते साक्षर असून चालत नाही, तर बर्यापैकी शिक्षित असावे लागतात. टीव्हीला त्या अटींची गरज नाही. अगदी अस्सल निरक्षर व्यक्तीपासून अगदी विद्याविभूषित माणसापर्यंत सर्व जण टीव्हीला खिळून राहतात वा राहू शकतात. किंबहुना, त्यामुळे सुशिक्षितांचे वृत्तपत्र वा ग्रंथवाचन कमी झाले आणि त्याच वेगाने निरक्षरांना तितक्याच बातम्या वा चर्चांनी सघन केले आहे.
आपल्या देशात एकूण चॅनल्स सुमारे १२00 आहेत. पुढील पाच वर्षांंत आणखी ३00 येणार आहेत. त्यापैकी किमान ५0-७५ चॅनल्स २४ तास बातम्या देणारे असतील, पण त्यापैकी बहुतांश स्थानिक भाषांमधील असतील. गम्मत म्हणजे इंग्रजी वृत्तवाहिन्यांचा दर्शक o्रोता एकूण पाच टक्क्यांपैकी एकच टक्का असूनही प्रतिष्ठा व प्रभाव त्यांचाच राहिला आहे. हे विरोधाभासी दृश्य आहे.
देशातील १३0 कोटी लोकांपैकी सुमारे २५ कोटी लोकांना इंग्रजी वाचता, लिहिता-बोलता येते. म्हणजे १0५ कोटी लोक इंग्रजी कक्षेच्या बाहेर आहेत किंवा त्यांच्या भाषांमध्ये दृकo्राव्य व्यवहार करतात. जी गोष्ट टीव्हीची, तीच वृत्तपत्रांची. अजूनही देशभर दबदबा आहे, इंग्रजी वृत्तपत्रांचा. साहजिक, इंग्रजीत वाद-संवाद करणार्या विचारवंतांचा, पत्रकारांचा जसा प्रभाव आहे, तसा देशव्यापी प्रभाव स्थानिक भाषांचा नाही.
परंतु, त्याचबरोबर हेही खरे की, त्या-त्या राज्यात सर्वात जास्त दबदबा आणि प्रभाव असतो तो त्या-त्या ठिकाणच्या प्रादेषिक भाषा माध्यमांचा. त्यामुळे आपल्याला एक प्रकारचा माध्यम असमतोल दिसून येतो. हा माध्यम असमतोल देशातील विसंवादाचे, वितुष्टाचे आणि विद्रोहाचेही एक कारण झाले आहे. हा माध्यम असमतोल हे लोकशाहीसमोरचे मोठे आव्हानही आहे.
बटण दाबा, वडापाव हजर..??
लोक त्यांच्या दिवसाचे २४ तास कसे खर्च करतात, यासंबंधात झालेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की,
प्रत्येक जण दिवसाकाठी किमान सरासरी दोन तास आणि जास्तीतजास्त पाच तास मोबाइलवर (रेडिओ, गाणी, शेकडो खेळ, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअँप, ट्विटर अशा सर्व गोष्टींसाठी) खर्च करतात. यात सोशल मीडियावरचे तुफानी विनोद, विखारी टिप्पण्या, विषारी प्रचार असे सर्वकाही आले. - आता मोबाइल इतका चराचर व्यापून राहिला आहे की, एखादे बटण दाबून त्यातून वडापाव वा सॅण्डविचही का मिळू नये, असा प्रश्न कुणालाही पडू शकेल.