कर्तव्य साधकाची एक लाखभर पिंपळ पाने...
By शांतीलाल गायकवाड | Updated: August 24, 2025 10:51 IST2025-08-24T10:51:25+5:302025-08-24T10:51:40+5:30
कर्तव्य साधनेचे मापदंड नेमके आहेत तरी काय? कशी मोजायची कर्तव्य भावना? मराठवाड्यात ५० वर्षांपूर्वी कुणीतरी एक कफल्लक माणूस वडजी (ता. पैठण) या खेड्यातून पुढे येतो अन् प्रकाशन संस्था काढतो. पाहता पाहता ती व्यक्ती जिद्द व संशोधनाच्या जोरावर एक लाखाहून अधिक पाने प्रकाशित करते. त्यातील एकट्या बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवन चरित्रावर ६०,९७२ पाने असावीत, हे अद्भूत व असामान्य काम ही बाबा भांड या प्रतिभावानाची कर्तव्य साधनाच म्हणावी....

कर्तव्य साधकाची एक लाखभर पिंपळ पाने...
- शांतीलाल गायकवाड
(उपवृत्तसंपादक, छत्रपती संभाजीनगर)
मृतमहोत्सवी वर्ष नुकतेच पूर्ण करणारे बाबा भांड यांचा ध्येयनिष्ठ संकल्प अर्थात धारा-साकेत प्रकाशनला या स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट २०२५) ५० वर्षे पूर्ण झाली. या पन्नाशीचा उत्सव ते रविवारी (दि. २४) एकाच दिवसात ८ पुस्तकांचे प्रकाशन करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत आहेत. या ८ पुस्तकांसह साकेतने आतापर्यंत २,७१३ पुस्तके वाचकांच्या हाती दिली आहेत. त्यात बाबा भांड लिखित, संपादित व अनुवादित केलेली तब्बल १८२ पुस्तके आहेत. ललित, गद्य-पद्य, शास्त्रीय, आध्यात्मिक, प्रवासवर्णने, कादंबऱ्या, साक्षर, नवसाक्षरांसह किशोर व बालकांसाठीची ही ग्रंथसंपदा असून, त्यातील ‘धर्मा’ या किशोर कादंबरीच्या तब्बल २७ आवृत्त्या निघाल्या आहेत.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावर भांड यांनी २६ ग्रंथ लिहिले असून, राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष म्हणून १०१ व सयाजीराव ट्रस्टतर्फे संशोधन व प्रकाशन काम करताना १०६ ग्रंथ सिद्ध केले. प्रकाशनाच्या या घाेडदाैडीत त्यांनी लेखक व नवलेखकांचा मोठा गोतावळा जमवला. साकेतसाठी लिहिणारे तब्बल १०८५ जनमान्य साहित्यिक, लेखकांचा एक परिवार तयार झाला. विशेष म्हणजे यातील ४००हून अधिकांच्या लेखणीला सर्वप्रथम साकेतने संधी देऊन त्यांची घुसमट रोखली.
बुलढाण्यात अटक अन् विषय सुचले...
तंट्या कादंबरी आणि महाराजा सयाजीराव गायकवाड प्रकल्पाने माझ्या आयुष्याला मोठ्या उंचीवर नेले. उर्वरित आयुष्यात सयाजीरावांचे किमान १०१ खंड प्रकाशित करायचे आहेत, असे ठामपणे सांगून बाबा म्हणतात, हे दोन्ही विषय बुलढाणा पोलिसांनी मला अटक केल्यावर सुचले. अटकेत असताना कोठडीतील एकाने मला तंट्या भिल्लाबद्दल माहिती दिली. तेथेच भास्कर भोळे यांनी सयाजीराव महाराजांची माहिती दिली. मी भारावल्यासारखे काम केले व आज परिस्थिती समोर आहे. सामान्यांसाठी असामान्य काम करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वावर आणखी खूप काम करायचे आहे. डिजिटल युगाचा असर पाहता कृष्णा महाराज, तंट्या व सयाजीरावांचा प्रकल्प मोफत ई-बुक स्वरूपात आणायचा आहे.
अनेक उद्योगांत केली मुशाफिरी, पण रमले लेखन, संपादन, प्रकाशनात...
बालसाहित्यिक ते संशोधक लेखक अशी राज्य व देशभरात मान्यता मिळवणारे बाबा भांड यांनी केलेले उद्योग अनेकांना चकित करणारे आहेत. वीटभट्टी, पोल्ट्री फार्म ते साहित्यिक, प्रकाशकांची सहकारी सोसायटी असे एक नव्हे अनेक. पाणलोट क्षेत्र विकास, अपंग, मूकबधिर मुलांसाठी निवासी शाळा, सार्वजनिक वाचनालये आणि अध्यात्मातील आनंद धामसारखे सर्जनशील प्रयोग करत राहणे ही बाबांची खासियत. त्यांनी बालसाहित्य संमेलने भरवली; परंतु या बहुतांश प्रयोगात हाती अपयश आल्यावर लेखन, संपादन, प्रकाशन, मुद्रक, वितरक व ग्रंथालयात ते रमले. २० रुपयांवर सुरू झालेले धारा प्रकाशन-साकेत प्रकाशन आता प्रा. लि. कंपनी असून, मराठी, हिंदी इंग्रजीसह अन्य भाषांतून त्यांची प्रकाशने अनुवादित झाली आहेत, होत आहेत. जवळपास १२ संशोधकांनी भांड यांच्या पुस्तकावर पीएच.डी. आणि एम.फिल केले. ‘दशक्रिया’ कादंबरी रूपेरी पडद्यावर आली. अन्य काही कादंबऱ्यांवर चित्रण सुरू आहे. त्यांची अनेक पुस्तके विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहेत.
११ महिने काम, १ महिना सहल
१६ व्या वर्षी स्काउट-गाइडच्या जांबोरीनिमित्त अमेरिकेसह ९ देशांची वारी केलेल्या विद्यार्थिदशेतील बाबाने पुढे ९० हून अधिक देश व जगातील सातही आश्चर्य कॅमेऱ्यात टिपली. ११ महिने काम व एक महिना कुटुंबासह देश-विदेशातील सहलीवर हा त्यांचा नित्यक्रम. राज्य सरकारसह अनेक प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कार त्यांना व साकेत प्रकाशनला मिळाले. अनेक बालसाहित्य, युवक साहित्य व प्रतिष्ठानांतर्फे आयोजित संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले; परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्यापासून दूरच राहिले. या संमेलनाच्या अध्यक्षपदाची प्रक्रियेची आपली धाटणी नाही, एवढे साधे उत्तर देणाऱ्या बाबांना मात्र पुढे अनेक कांदबऱ्या, प्रवास वर्णने आणि सयाजीराव गायकवाड यांचा प्रकल्प नेटाने पूर्ण करायचाय. याचे आराखडे त्यांचे तयार आहेत. महत्त्वाची पुस्तकं ई -बुक स्वरूपात आणायची आहेत.