२८ फेब्रुवारी, ऑकलंड!

By Admin | Updated: March 8, 2015 17:06 IST2015-03-08T17:06:10+5:302015-03-08T17:06:10+5:30

वर्ल्डकपचा ऑकलंडमधला पहिला सामना! विशीच्या तरुणांपासून तर ऐंशीच्या ज्येष्ठांपर्यंत; आम्ही ‘व्हॉलण्टीयर’ होतो.

28 February, Auckland! | २८ फेब्रुवारी, ऑकलंड!

२८ फेब्रुवारी, ऑकलंड!

कल्याणी गाडगीळ

 
वर्ल्डकपचा ऑकलंडमधला पहिला सामना! विशीच्या तरुणांपासून तर ऐंशीच्या ज्येष्ठांपर्यंत; आम्ही ‘व्हॉलण्टीयर’ होतो. गर्दी होती, पण गोंगाट नव्हता. उत्सुकता होती, पण आक्रस्ताळेपणा नव्हता. 
बर्‍याच गोष्टी फुकट होत्या, तरीही हपापलेपणा नव्हता. इतक्या अटीतटीच्या सामन्यांत मैदानावर असतानाही स्वयंसेवकांचे लक्ष खेळापेक्षाही प्रेक्षकांच्या सोयीकडेच होते!
------------
वर्ल्डकपचा ऑकलंडमधील पहिला सामना २८ फेब्रुवारी २0१५ रोजी होता. लोकांमध्ये वर्ल्डकपचा फिवर चढावा म्हणून एक अफलातून कल्पना राबवण्यात आली. ब्रिटोमार्टपासून ईडनपार्क मैदानापर्यंत वाजत-गाजत, मजा करत चालत जाण्यासाठी फॅनट्रेल आयोजित करण्यात आला होता. अंतर एकूण चार किलोमीटर!
बरोबर १२ वाजता मिरवणूक निघाली. त्या दिवशी न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होता. चेहर्‍यावर त्या त्या देशाचे झेंडे अथवा झेंड्यातील रंग लावण्याचे काम ‘ड्रेसर्स’ (चेहरा रंगवणारे) मोफत करीत होते. 
सामन्याच्या वेळी दाखवण्यासाठी ‘चौकार’, ‘षटकार’, ‘विकेट’ असा मजकूर लिहिलेली पोस्टर्स, काळ्या किंवा ब्राउन रंगाच्या मिशा, कुरळ्या काळ्या व पांढर्‍या केसांचे टोप, टोप्या, हवा भरून दांड्यांसारखे आपटून आवाज काढता येणारे फुगे. असल्या अनेक गोष्टी. ज्याला जे आवडेल, ते त्याने घ्यावे. आणि त्याची किंमत काय? - तर फुकट!!
मार्गदर्शनासाठी, तसेच ऐनवेळी काही अडचण आलीच तर स्वयंसेवक व सिक्युरिटी गार्ड्सचा ताफाही जागोजागी सज्ज होता. दुपारच्या कडक उन्हात प्रेक्षकांना सनस्ट्रोकची बाधा होऊ नये म्हणून सनस्क्रीन व पिण्याचे पाणीही जागोजागी उपलब्ध होते. पिपाण्या वाजवत, आनंदाने चित्कार करीत सुमारे दीड तासाने ही मिरवणूक ईडनपार्कला पोहोचली.  
विश्‍वचषकाच्या सामन्यातल्या स्वयंसेवकगिरीचा माझा पहिलाच अनुभव!
सामना दुपारी २ वाजता होता. प्रेक्षकांसाठी बरोबर साडेबारा वाजता दरवाजे उघडले गेले. ईडनपार्कच्या आसपासच्या सर्व रस्त्यांवर दुपारी १२ नंतर प्रेक्षकांना आणणार्‍या बसेस सोडून इतर सर्व वाहनांना बंदी होती. प्रेक्षकांनी सगळा परिसर भरून गेला होता. या सामन्यासाठी हजारो स्वयंसेवकांची फौज तत्पर होती. सामन्याच्या आदल्या दिवशी पुन्हा दीड तासाचे प्रशिक्षण झाले. उजळणी घेण्यात आली. प्रत्येक स्वयंसेवकाला तो कोणत्या ग्रुपमध्ये आहे, त्याच्या कामाचे स्वरूप, त्यांच्या टीमलीडरचे नाव व ओळख. ही सारी माहिती पुन्हा घोटवून घेण्यात आली.
सामन्याच्या दिवशी शहरातील अनेक भागातून स्वयंसेवक साडेदहालाच मैदानावर हजर झाले. दोन जेवणांचे पास, फळे, चहा-कॉफी-बिस्किटे घेऊन आपापल्या टीमलीडरबरोबर ते जागोजागी रुजू झाले. प्रेक्षकांना विमानतळ, हॉटेल व शहरातील ठरावीक ठिकाणांहून आणण्याची जबाबदारी काही स्वयंसेवकांवर होती. काही जण मैदानाशेजारच्या बसथांब्यांवर, तर काही जण रेल्वेस्टेशनवर उभे राहून प्रेक्षकांना ‘वेलकम’ करीत होते. काहीजण मैदानाजवळील रस्त्यावर उभे होते. प्रेक्षकांची तिकिटे पाहून त्यांनी कोणत्या दरवाजाने प्रवेश करावा याची माहिती देत होते. खूप गर्दीतही सहज दिसतील असे  ‘फोम हॅँड्स’ घातलेले स्वयंसेवक गर्दी योग्य दिशेने वळवीत होते. पैसे आधीच भरलेल्या व प्रत्यक्ष तिकिटे हातात घेण्यासाठी रांगा केलेल्या प्रेक्षकांजवळ काही स्वयंसेवक उभे होते. प्रत्यक्ष स्टेडियममधे जाताना सर्वांचे सामान तपासण्यासाठी सुरक्षा कंपन्यांचे लोक चेकिंग करीत होते. स्टेडियममधील प्रेक्षकांचे सीट्स दाखवण्यासाठी जागोजागी शेकडो स्वयंसेवक उभे होते. स्टेडियममधील प्रेक्षकव्यवस्था, रेस्टॉरंट, स्वच्छतागृहे, अपंग तसेच अगदी लहान बाळांचे डायपर्स बदलण्याची सोय असलेली स्वच्छतागृहे, एटीएम मशिन्स, लहान मुलांसाठी मैदानाच्याच एका भागात केलेला ‘फॅन झोन’, मीडिया, फोटोग्राफर्स व खास पाहुण्यांसाठीची सोय इत्यादि सर्व गोष्टींची माहिती देणारे मोठे पत्रक सर्व स्वयंसेवकांना दिलेले होते. त्यानुसार स्वयंसेवक प्रेक्षकांना मदत करीत होते.  
‘कोणतीही शंका असल्यास टीमलीडरला विचारा, चुकीची माहिती देऊ नका’ हे स्वयंसेवकांवर दहादा बिंबवले होते. एकमेकांच्या मदतीने, वेळप्रसंगी फोन करून योग्य ती माहिती मिळवून टीमलीडर्स ती स्वयंसेवकांना पुरवीत होते.  
बहुतांश प्रेक्षक विनासायास आपापल्या जागेपर्यंत पोहोचले होते. नाणेफेक झाली आणि बरोबर दोन वाजता सामना सुरू झाला. मला ‘फॅमिली झोन’च्या प्रेक्षकांमधे ‘अशर’चे काम होते. काही प्रेक्षक उशिरा पोहोचतात. सामना सुरू झाल्यावर पोहोचतात. कमीतकमी गैरसोय होत त्यांना त्यांच्या सीटपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखविण्याचे माझे काम होते. व्हील चेअरवरून अपंग प्रेक्षकही दाखल होत होते. ‘फॅमिली झोन’ हा खास कुटुंबीयांसमवेत सामना पाहण्याचा विभाग असल्याने तिथे लहान मुलांबरोबर आलेले पालक, आजी-आजोबा होते. या भागात बिअर पिण्याला बंदी होती. शेजारच्या झोनमधील लोक बिअर घेऊन फॅमिली झोनच्या मागच्या बाजूला उभे राहिले तरी त्यांना नम्रतेने ‘इथे उभे राहून बिअर घेता येणार नाही’ हे सांगण्याची तसेच स्टेडियममधील वर-खाली जाणार्‍या  जिन्यांच्या तोंडाशी उभे राहून मार्ग बंद करण्यापासून प्रेक्षकांना परावृत्त करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. सुरुवातीला हे सांगताना जरा कठीण वाटत होते, पण परदेशातील नागरिक नियम समजून घेतात व लगेच ‘सॉरी’ म्हणून बाजूला होतात हा अनुभव काम सोपे करीत होता. ‘तुम्ही सामना पाहायला हरकत नाही, पण स्वत:चे काम प्रथम व अधूनमधून खेळ पाहायला हरकत नाही’ हे स्वयंसेवकांना दहादा बजावल्यामुळे प्रेक्षकांचा आरडाओरडा, टाळ्या सुरू झाल्या की चौकार/षट्कार किंवा विकेट असणार याची आम्हाला कल्पना यायची. त्यानंतर आम्ही मैदानावर प्रत्यक्ष काय चालले आहे हे पाहायचो. जवळच्या स्टॉलवरून सॅण्डविच, आइस्क्रीम, बटाटा चिप्स, बर्गर, फळे घेऊन खाणे चालू होते. एका मुलाच्या हातातली कोल्डड्रिंकची बाटली रस्त्यात सांडल्यावर लगेच फोन करून स्वच्छता कर्मचार्‍याला बोलावले गेले. जमीन कोरडी केली गेली. उगाच त्यावरून पडून कोणाला काही इजा व्हायला नको. प्रत्येक, अगदी बारीकसारीक गोष्टींची काळजी घेतली जात होती. परिसरात अर्थात बिअरच्या बाटल्याही विकत मिळत होत्या, पण त्या होत्या प्लॅस्टिकच्या! बाटल्या फुटून दुखापत व्हायला नको म्हणून ही खबरदारी! थंडगार पाण्याचे कूलर्स खांद्यावर अडकवून व सनस्क्रीनच्या बाटल्या घेऊन स्वयंसेवक प्रेक्षकांमधून फिरत होते. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियातून आलेल्या ‘फ्रूट फ्लाय’ या कीटकाचा संसर्ग न्यूझीलंडमधील फळबागांवर होऊ नये म्हणून सरकार फारच काळजी घेत आहे. प्रेक्षकांनी घरून आणलेली फळे खायला त्यांना परवानगी होती, पण अर्धवट खाल्लेली किंवा न खाल्लेली फळे ‘फ्रूट फ्लाय गार्बेज’च्या कचरापेटीतच टाकण्याची सक्ती होती. 
  बरोबर अध्र्या तासाची जेवणाची सुट्टी घेऊन सर्व स्वयंसेवक पुन्हा आपापल्या जागी! न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान सामन्याला हजर होते.  
कोणताच गैरप्रकार न होता, खिलाडूपणे, अत्यंत चुरशीचा व अनपेक्षित वळणे घेणारा सामना न्यूझीलंडने जिंकला. स्टेडियम रिकामे होऊ लागले. स्वयंसेवकांना घरी जाण्यापूर्वी पुन्हा टीमलीडरने बोलावून कोणत्या गोष्टी सुधारण्याची गरज आहे, कोणत्या गोष्टी अजून वाढवायला हव्यात, कुठे सूचनांचे फलक हवेत, काही गैरप्रकार घडले का इत्यादिंविषयी चर्चा करून नोट्स घेतल्या, सर्वांचे मनापासून आभार मानले व ‘पुढच्या सामन्याला भेटूच’ म्हणत निरोप घेतला.  
सामन्यांचे नियोजन कौशल्य, प्रेक्षकांचा उत्साह, नियमांचे पालन करण्याची समाजाची वृत्ती, जीवनातील खेळाचे महत्त्व, समाजासाठी स्वत:चा वेळ देण्याची सेवावृत्ती व जीवन आनंदाने उपभोगण्याची कला सर्वच दृष्टीने हा अनुभव खूपच प्रत्ययकारी होता. यातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे अनेक स्वयंसेवक ज्येष्ठ नागरिक असून, काहीजण ८५ वर्षांच्या पुढचेही होते! क्रीडांगणावरून परतताना सापडलेल्या वस्तू ‘लॉस्ट अँण्ड फाउंड’ काउंटरवर परत करून घरी निघाले तेव्हा सकाळी साडेदहापासून रात्री आठपर्यंत उभे राहिल्यामुळे पाय बोलत होते; पण एका महत्त्वाच्या, ‘ऐतिहासिक’ सामन्याच्या संयोजनात खारीचा वाटा उचलल्याच्या समाधानाने व समृद्ध अनुभवाने मन उत्साहाने, आनंदाने फुलून आले होते..
 
एक कॅच, 
एक मिलिअन डॉलर्स!
सामना रंगात आला होता. सामन्यातल्या चुरशीच्या क्षणांनुसार कधी ऑस्ट्रेलियन, तर कधी न्यूझीलंडचे प्रेक्षक जल्लोष करीत होते. पोलिसांची गस्त चौफेर सुरू होती. कुठे काही गैरप्रकार तर होत नाहीयेत ना यावर त्यांची बारीक नजर होती. पोलिसांविषयी नागरिकांमध्ये आदर जरूर होता, पण त्यांची कुणाला दहशत वाटत नव्हती. ‘कॅच अ मिलिअन’ असा मजकूर छापलेले टी-शर्ट हजारो लोकांनी घातले होते. एका कंपनीनं एक अफलातून आयडिया काढली होती. वर्ल्डकप फिवरचा उत्तम उपयोग करून घेताना या कंपनीने प्रेक्षकांना टी-शर्ट पुरवले होते. सामन्याच्या वेळी षटकार मारल्यावर चेंडू प्रेक्षकांत आला, तो प्रेक्षकाने एका हाताने झेलला व त्याने हा टी-शर्ट घातला असेल तर त्याला तब्बल एक मिलिअन डॉलर्सचे बक्षीस मिळेल अशी ही स्कीम! आजपर्यंत तीन जणांनी असा झेल झेललेला आहे.
 
 
 

Web Title: 28 February, Auckland!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.