२०१७ डिजिटल लढाईसाठी
By Admin | Updated: December 24, 2016 19:23 IST2016-12-24T19:23:30+5:302016-12-24T19:23:30+5:30
नोटाबंदीच्या निर्णयानंतरचा ‘चलनकल्लोळ’ हा सरत्या वर्षाचा मुख्य चेहरा झाला आहे.

२०१७ डिजिटल लढाईसाठी
- बाळसिंह राजपूत (पोलीस अधीक्षक, सायबर सेल, महाराष्ट्र)
नोटाबंदीच्या निर्णयानंतरचा ‘चलनकल्लोळ’ हा सरत्या वर्षाचा मुख्य चेहरा झाला आहे. इतका, की जुने वर्ष सरत असताना नव्याचे स्वागत होणार तेही धास्तावलेल्या गोंधळातच! नोटा न वापरता करायच्या डिजिटल व्यवहारांची सक्ती आणि धास्ती यांच्यामध्ये उत्सुकता आहे आणि अज्ञानही! या कातावलेल्या अवस्थेत जे पहिल्यांदाच मोबाइलचे अथवा संगणकाचे बटण दाबून पैसे देतील-घेतील त्यांनी नव्या वर्षासोबत काही नवे शहाणपण स्वीकारले पाहिजे...
पोस्ट कार्ड, मनिआॅर्डर, तारा जाऊन पेजरही गेले. गेल्या दहा वर्षांत आता प्रत्येक हातात मोबाइल आले. काही लोकांच्या दोन्हीही हातात मोबाइल आलेत. कधीकाळी पत्राद्वारे भेटणारी भावंडं निवृत्त झाल्यावर आपल्या अमेरिकेतल्या किंवा त्याच शहरातल्या भावा-बहिणींशी व्हॉट्सअॅपवर दिवसभर चॅट करतात. फोन, मेसेज, व्हॉट्सअॅप, ई-मेल हा मोबाइलवरचा प्रवास आता ई-बँकिंग आणि आॅनलाइन व्यवहारावर आला आहे. हे व्यवहार आपल्यासाठी अगदीच नवे आहेत अशातला भाग नाही. या साऱ्या गोष्टी गेल्या दशकभरापासून आपल्याकडेही होतच होत्या, फक्त त्यात सुशिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीयांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होता. नोटबंदीनंतरच्या या दोन महिन्यात कॅशलेसची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली आणि आता या व्यवहारांमध्ये समाजातील निम्न उत्पन्न गट प्रवेश करण्याच्या टप्प्यामध्ये आपण आलो आहोत.
या दोन महिन्यांमध्ये कोणतीही आर्थिक किंवा तांत्रिक क्रांती झालेली नाही, तर एक मोठा वर्ग आता वेगळे माध्यम वापरून व्यवहार करणार आहे हे समजून घेण्याची गरज आहे. कॅशलेस व्यवहारांची संख्या येत्या वर्षापासून अधिक वाढीस लागेल यात शंका नाही; पण ते करताना काही मर्यादा, जबाबदारी ओळखून दक्षता घ्यावी लागेल.स्मार्टफोन हातात आला म्हणजे तो वापरणारी व्यक्ती स्मार्ट होत नसते. त्यासाठी कोणत्याही नव्या तंत्राप्रमाणे तो वापरण्याची पद्धती आणि धोके यांची माहिती घेणे आवश्यक असते.
आॅनलाइन व्यवहारांमध्ये शिस्त आणि ‘डिजिटल हायजिन’ पाळले गेले नाही तर समस्या येऊ शकतात किंवा अशा व्यक्तींच्या व्यवहारात अडथळे येण्याची शक्यता वाढते. आॅनलाइन घोटाळे आणि फसवणूक करणारे हॅकर्स हे शिक्षित आणि तंत्रकुशल असतात. असे घोटाळे करण्यासाठी तंत्रज्ञानातील सर्वात ताजी माहिती असावी लागते आणि ती त्यांच्याकडे असते. त्याचप्रमाणे हे गुन्हेगार जगाच्या पाठीवर कोठेही असू शकतात. त्यांना बसल्या जागी तुमच्या व्यवहारामध्ये घुसखोरी करता येते. त्यामुळे त्यांना पकडणे हे आव्हानच असते. पण म्हणून सर्व आॅनलाइन व्यवहार धोकादायक आहेत असा समज पसरवणे सर्वथा चूक आहे. इतर कोणत्याही व्यवहारांप्रमाणे यामध्येही गुणदोष आहेत. त्यासाठी फक्त आपण शिस्त पाळण्याची गरज आहे.
आॅनलाइन व्यवहार, ई-बँकिंग भारतासारख्या मोठ्या देशाच्या कानाकोपऱ्यात पसरवण्यासाठी पायाभूत सुविधांबरोबर त्या वापराच्या शिक्षणावरही आपल्याला भर द्यावा लागेल. एखाद्या गावात मोबाइल आहे, पण तो चार्ज करण्यासाठी वीज नसेल किंवा इंटरनेटची उपलब्धता नसेल तर कॅशलेसच्या दिशेने आपला प्रवास फारच मंदगतीने होईल. हे नवमाध्यम कसे वापरायचे, कोणती काळजी घ्यायची याचे शिक्षण लोकांना द्यावे लागेल. ते देण्यासाठीही प्रशिक्षित लोकांची गरज आपल्याला भासेल. आर्थिक व्यवहारांबाबत जे सायबर गुन्हे होतील त्याच्या पुढील कार्यवाहीसाठी वेगवान आणि आश्वासक यंत्रणा आपल्याकडे तयार व्हायला हवी. ती काळानुसार होईलच, पण तोपर्यंत थांबून राहण्यापेक्षा अशा सायबर गुन्ह्यांचे निदान आपण तरी बळी ठरू नये, याची किमान काळजी तर आपल्याला घेता येईल..