मालेगाव : नाशिक महापालिकेत भाजपने अखेर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) नाशिकमध्ये एकत्रित निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातदेखील अनेक ठिकाणी युतीसंदर्भातील चर्चा बरीच पुढे गेली आहे तर काही ठिकाणी शिक्कामोर्तबही झाले आहे; मात्र मालेगाव महापालिकेचे अडले कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथील महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून, त्या पार्श्वभूमीवर सत्ता समीकरणे जुळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. दररोज नवी राजकीय समीकरणे समोर येत असली तरी भाजप आणि शिंदेसेना यांची युती अद्यापही गुलदस्त्यातच असल्याने नेमके काय होणार, याकडे कार्यकर्त्याचे लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे शहरातील पूर्व भागात युतीचे गुन्हाळ सुरू असताना पश्चिम भागात मात्र इतर पक्षांच्या उमेदवारांची दुसरी यादीदेखील प्रसिद्ध झाली आहे. पूर्व भागात मात्र होणार होणार म्हणून जाहीर केलेल्या युती-आघाडी अशा दोन्ही पक्षांत अजूनही त्रांगडे आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी थेट प्रचाराला सुरुवात केली असून, उमेदवारीची अपेक्षा सोडलेले काही जण दुसऱ्या पक्षांकडून संधी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर काही इच्छुक अजूनही पक्ष नेतृत्वाकडून मिळालेल्या आश्वासनांची प्रतीक्षा करत आहेत.
निर्णय प्रक्रियेला विलंब
मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. जागावाटपावरून मतभेद, भाजपला अधिक जागा मिळाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी, तसेच वरिष्ठ पातळीवरून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना मान्यता द्यावी, असा अंतर्गत दबाव, यामुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होत आहे. युती हवी की नको, याबाबतही अंतर्गत मतप्रवाह सुरू आहेत. इच्छुकांचा वाढता आकडा बघता काही उमेदवारांनी थेट युतीला विरोध केल्याचे समजते.
युतीसाठी सावध पावले
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक असतानाही भाजप-शिंदेसेना युतीची अधिकृत घोषणा मात्र अद्याप झालेली नाही. बंडखोरीच्या भीतीमुळेच सावध पाऊले टाकत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. काही प्रभागांमध्ये एकाच वेळी अनेक उमेदवार इच्छुक असल्याने जागावाटपावरून नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या वाढल्या आहेत.
स्थानिक पातळीवर चर्चा निष्फळ
"शिंदेसेना व भाजप युती संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठक घेण्यात आली. मात्र बैठकीत एकमत न झाल्याने युतीबाबतचा अंतिम निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे सोपविण्यात आला आहे." - संजय दुसाने, जिल्हा प्रमुख, ग्रामीण, शिंदेसेना