नाक्या नाक्यावर पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. याद्वारे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडाची कारवाई केली जात आहे. हा दंड बसू नये म्हणून अनेकजण वेगवेगळ्या क्लुप्त्या आजमावत आहेत. आजच्याघडीला वेगवेगळ्या ईकॉमर्स कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय वाहतुकीचे नियम सर्वाधिक मोडत असतात. परंतू, त्यांना एकही चलन येत नाही. त्यांच्याऐवजी दुसऱ्याच वाहन चालकाला दंड बसत आहे. झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ आला आहे.
कल्याण, मुंबईसह पुण्यातही हे प्रकार होत आहेत. पोलिसांना नंबर दिसत नसल्याने ते सीसीटीव्हीद्वारे या डिलिव्हरी बॉयना चलन करू शकत नाहीत. यासाठी हे डिलिव्हरी बॉय स्कूटर, मोटरसायकलच्या नंबरप्लेटवर पांढऱ्या रंगाची पट्टी मारत आहेत. ही पट्टी मधल्या मधल्या नंबरवर, अक्षरांवर मारत असल्याने कोणाच्याही ही बाब लक्षात येत नाही. ना पोलिसांना दिसत ना लोक ते गांभीर्याने घेत. परंतू, अपघात झाला तर कोणाला पकडायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
झोमॅटो, झेप्टोसारख्या कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी वेगाशी आणि वेळेशी स्पर्धा करत आहेत. ७ मिनिटांत डिलिव्हरी, १० मिनिटांत डिलिव्हरी असे सांगून डिलिव्हरी बॉयना देखील या वेळेत पोहोचण्याचा दबाव टाकत आहेत. यामुळे हे डिलिव्हरी बॉ़य १५-२० रुपयांसाठी जीव धोक्यात घालून उलट्या सुलट्या गाड्या घुसवत, सिग्नल तोडत डिलिव्हरी देत आहेत. एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण, त्या डिलिव्हरी बॉयमुळे दुसरा वाहनचालक जायबंदी झाला किंवा जिवास मुकला तर काय, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
वाहतुकीचे नियम मोडताना पोलिसांनी फोटो काढला तर त्यात नंबर दिसू नये, सीसीटीव्हीवरून देखील नंबर दिसून नये म्हणून या पट्ट्या मारल्या जात आहेत. कल्याणमध्ये डिलिव्हरी बॉयचे प्रताप उघडकीस आले आहेत. डिलिव्हरी बॉयकडून दुचाकीचा नंबर लपवून प्रवास सुरु आहे. चलन वाचवण्यासठी नंबर प्लेटवर स्टिकर लावले जात आहेत. निलेश जगदाळे या तरुणाने व्हिडीओच्या माध्यमातून प्रकार समोर आणला आहे. कोणत्याच प्रकरची कारवाई का होत नाही? पत्राच्या माध्यमातून कारवाईची मागणी करणार, असे त्यांनी म्हटले आहे. ही घटना समोर येताच डिलिव्हरी बॉयच्या गाड्या तपासण्याच्या वाहतूक विभागाने सूचना दिल्या आहेत.