बोगस तिकीट निरीक्षकासह युवती गजाआड
By Admin | Updated: August 17, 2014 00:18 IST2014-08-16T23:29:23+5:302014-08-17T00:18:49+5:30
हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसमधील घटना,अकोला रेल्वे स्थानकावर अटक; सोमवारपर्यंंत पोलिस कोठडी.

बोगस तिकीट निरीक्षकासह युवती गजाआड
अकोला - मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसमधील वातानुकूलित बोगीमध्ये प्रवास करीत असलेल्या बोगस तिकीट निरीक्षकास जीआरपी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. सदर तिकीट निरीक्षकाला बनावट दस्तऐवज तयार करून देणार्या बडनेरा येथील युवतीलाही गजाआड करण्यात आले असून दोघांनीही न्यायालयाने त्यांना १८ ऑगस्टपर्यंंंत पोलिस कोठडी सुनावली.
मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस शुक्रवारी अमरावतीवरून अकोल्याकडे येत असताना या एक्स्प्रेसमधील एसी टू-टायरमध्ये तिकीट निरीक्षक प्रवाशांचे तिकीट व आरक्षणाची तपासणी करीत होते. यावेळी एका सीटवर बसलेल्या युवकास त्यांनी तिकीट मागितले असता त्याने तिकीट निरीक्षक असल्याचे सांगून सोबत असलेल्या ओळखपत्राची झेरॉक्स दाखविली. हे ओळखपत्र बनावट असल्याचे तिकीट निरीक्षकांच्या निदर्शनास आले. त्यांनी या प्रकाराची माहिती तत्काळ अकोला रेल्वे स्थानकावरील मुख्य तिकीट निरीक्षक संजय इंगळे यांना दिली. दुपारी १२ वाजून ३0 मिनिटांच्या सुमारास गितांजली एक्स्प्रेस अकोला रेल्वे स्थानकावर येताच तिकीट निरीक्षक इंगळे यांनी जीआरपी पोलिसांच्या सहाय्याने या युवकाला ताब्यात घेतले.
संजय इंगळे यांनी युवकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सुजीत राहन झांझड असल्याचे सांगून झांझडपुरा बडनेरा येथील रहिवासी असल्याचे सांगितले.तिकीट निरीक्षकाचे ओळखपत्र व इतर दस्तऐवजाची तपासणी केल्यानंतर या विषयी त्याला विचारपूरस केली असता त्याने सदर दस्तऐवज बडनेरा येथील युवती मनाली प्रकाश पहुरकर हिने बनवून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने मनाली पहुरकर हिला अकोल्यात बोलावून तिची चौकशी केली असता सदर प्रकरणातील दस्तऐवज तिनेच बनविल्याचे उघड झाले. यावरून मुख्य तिकीट निरीक्षक इंगळे यांनी जीआरपी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी युवक व युवतीविरुद्ध कलम ४२0 (फसवणूक), ४६८ (बनावट दस्तऐवज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तऐवज उपयोगात आणणे) आणि १७0 (बनावट दस्तऐवजाद्वारे सरकारी नोकर बनण्याचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही १८ ऑगस्टपर्यंंंत पोलिस कोठडी सुनावली.