पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले युवकाचे प्राण; आत्महत्या करणाऱ्याला मिळालं जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 19:29 IST2022-11-04T19:28:54+5:302022-11-04T19:29:06+5:30
युवक हा बहुळा धरणाच्या परिसरात असल्याचे लक्षात आले. पोलीस कॉन्स्टेबल बेहेरे व विश्वास देशमुख यांनी मोटरसायकलवर पाठलाग केला.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले युवकाचे प्राण; आत्महत्या करणाऱ्याला मिळालं जीवदान
पाचोरा - पती पत्नीच्या घरगुती वादामुळे त्रस्त झालेला युवकास आत्महत्येचा प्रयत्न करीत असताना कर्तव्यतत्पर पाचोरा पोलिसांनी शिताफीने बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. ही घटना पाचोरा येथे दि. २७ रोजी सकाळी ११ चे सुमारास घडली आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा शहरातील एका कॉलनी भागातील रहिवासी असलेल्या युवकाचे त्याच्या पत्नीशी टोकाचे वाद झाले. या वादाचे पर्यावसान थेट आत्महत्यापर्यंत झाले. हा युवक त्याची कार घेऊन रागाच्या भरात घराच्या बाहेर पडला व त्याने त्याच्या मोबाईलवर आत्महत्या करीत असल्याचे स्टेटस ठेवून आईला मेसेज टाकला. तात्काळ त्याच्या आईने पाचोरा पोलीस स्टेशन गाठले व मुलाचे प्राण वाचवण्याची विनवणी केली. यावेळी पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेहरे व पोलीस कॉन्स्टेबल विश्वास देशमुख यांनी तातडीने त्या युवकाचे मोबाईल लोकेशन घेऊन मोबाईलच्या दिशेने मागे काढला.
युवक हा बहुळा धरणाच्या परिसरात असल्याचे लक्षात आले. पोलीस कॉन्स्टेबल बेहेरे व विश्वास देशमुख यांनी मोटरसायकलवर पाठलाग केला. बहुळा धरण परिसरात असलेल्या मच्छिमार युवकांना व पट्टीच्या पोहणाऱ्यांना तातडीने युवकाचे वर्णन सांगून त्याच्या मागावर राहण्याचे सुचित केले. तात्काळ पोलीस धरणाच्या जवळ पोहोचले असता युवकाने धरणात उडी घेतली. तात्काळ मच्छीमार युवकांनी या युवकास पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले. या युवकाने विषारी गोळ्या सेवन केलेल्या असल्याने त्यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व शरीरातील पाणी काढले. पुढील उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करून युवकांचे प्राण वाचविले. आता या युवकाची प्रकृती सुधारत आहे. घरगुती कारणातून घडलेल्या वादामुळे आत्महत्या करणाऱ्या या युवकाचे प्राण वाचवणाऱ्या पोलिस आणि मच्छीमार तरुणांचे युवकाच्या आईने आभार मानले आहेत. बुडालेल्या युवकास आत्महत्येपासून परावृत्त केल्याच्या घटनेने पाचोरा पोलिसांचे कौतुक होत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"