क्षयरोगाला हरवण्यासाठी हवा तरुणांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:03 IST2016-07-10T01:03:00+5:302016-07-10T01:03:00+5:30
क्षयरोगाला रोखण्यासाठी ज्यांच्यापर्यंत अजूनही पोहोचू शकलो नाहीत, अशांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. क्षयरोगाला हरवून देशाला जिंकून देण्यासाठी

क्षयरोगाला हरवण्यासाठी हवा तरुणांचा सहभाग
मुंबई : क्षयरोगाला रोखण्यासाठी ज्यांच्यापर्यंत अजूनही पोहोचू शकलो नाहीत, अशांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. क्षयरोगाला हरवून देशाला जिंकून देण्यासाठी संशोधनावर भर देऊन तरुणांना या मोहिमेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे. जनजागृती, योग्य आणि लवकर निदान, पूर्ण औषधोपचार यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे मत आज मुंबईत आयोजित केलेल्या संशोधन आणि शिक्षण तज्ज्ञांचे संमेलनात उमटला.
केंद्रीय क्षयरोग विभाग (सीटीडी), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (एनएमयू) यांनी ‘दि इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्युबरक्युलॉसिस अँड लंग डिसीज’ (द युनियन) आणि संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय विकास संस्था (यूएसएआयडी) यांच्या सहयोगाने या संमेलनाचे आयोजन केले होते. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
क्षयरोग हा गंभीर विषय आहे. देशातच नाही, तर जगात हा रोग वाढतो आहे. याला वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी योग्य आणि वेळीच निदान होणे आवश्यक आहे.
समाजात अजूनही क्षयरोगाविषयी अनेक गैरसमज आहेत, हे दूर करण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी सामाजिक न्यायविभाग आरोग्य विभागाच्या बरोबरीने काम करणार आहे. त्यामुळे क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी नक्कीच मदत होईल, असे मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मांडले.
पोलिओ मोहिमेत तरुणांचा सहभाग होता. महाविद्यालयातील एनएसएस ग्रुप्स यात सक्रिय होण्याची आवश्यकता आहे. पथनाट्याद्वारे अधिक लोकापर्यंत पोहोचता येईल. क्षयरोग रुग्णांची आकडेवारी, बऱ्या झालेल्या रुग्णांची आकडेवारी गोळा करणे आवश्यक आहे.
संशोधनात याचा नक्कीच फायदा होईल, असे मत केंद्रीय क्षयरोग विभागाच्या डॉ. सुनील खापर्डे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
क्षयरोगाच्या संशोधनात शैक्षणिक संस्थाची भूमिका
- विद्यार्थ्यांना क्षयरोग निर्मूलनासाठी कार्यकर्ता बनवणे आणि शून्य क्षयरोग मृत्यू, शून्य क्षयरोग त्रास आणि शून्य क्षयरोग आढळ या उद्देशाने सक्रिय राहणे. देश क्षयरोग मुक्त मोहिमेत सहभागी होणे
- विविध अभ्यास क्षेत्रात क्षयरोग निदान, तपासणी, औषध अशा विषयांत संशोधन सुरू करणे
- उपयांचे मूल्यांकन करणे, पुरावा विकसित करणे, देशासाठी सुयोग्य उत्तम पद्धतींची शिफारस करणे
- क्षयरोगाविषयी कर्मचारी, विद्यार्थी, सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करणे
- जनजागृतीसाठी विद्यालयांत गु्रप्स तयार करणे
- संस्थेच्या संशोधनात प्राधान्यक्रमांचे टीबी निगडित सार्वजनिक आरोग्याचे मुद्दे समाविष्ट करणे
- भागीदार, प्रतिष्ठान, संस्था आणि त्यांच्या प्रतिनिधींना क्षयरोग आणि त्या निगडित मुद्द्यांवर जागृत करणे
क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. क्षयरोगाच्या निदान लवकर आणि योग्य होण्यासाठी संशोधनावर भर दिला पाहिजे. यासाठी भागीदारी महत्त्वाची आहे. सामाजिक विज्ञान, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र आणि इंजिनीयरिंग यांसारख्या विविध अभ्यास क्षेत्रांमध्ये क्षयरोग संशोधनातील आपले प्रयत्न भक्कम करण्यासाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षयरोग मुक्त भारतासाठी वचनबद्ध आहे. विद्यापीठाने ‘सीटीडी’, ‘द युनियन’ आणि ‘यूएसएआयडी’ यांच्यासोबत क्षयरोग जागरूकता आणि छाननीकरिता भागीदारीमध्ये ५ दत्तक गावांमध्ये एक कार्यक्रम यापूर्वीच सुरू केला आहे.
- डॉ. सुधीर मेश्राम, कुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ