यंग ब्रिगेडची मतदानात आघाडी
By Admin | Updated: October 16, 2014 00:58 IST2014-10-16T00:58:43+5:302014-10-16T00:58:43+5:30
लोकसभा निवडणुकीत दिसलेली सुप्त लाट यावेळी दिसली नाही. राजकीय पक्षांवर रोषही कुणी व्यक्त करताना दिसले नाही. उलट पावसामुळे सुरुवातीच्या काळात संथ झालेल्या मतदानाने दुपार नंतर

यंग ब्रिगेडची मतदानात आघाडी
लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष
नागपूर : लोकसभा निवडणुकीत दिसलेली सुप्त लाट यावेळी दिसली नाही. राजकीय पक्षांवर रोषही कुणी व्यक्त करताना दिसले नाही. उलट पावसामुळे सुरुवातीच्या काळात संथ झालेल्या मतदानाने दुपार नंतर कसर भरून काढली. तरुण मतदार, महिलांच्या रांगा अनेक केंद्रावर रांगा होत्या. मतदान यंत्रात बिघाड होणे, केंद्रावरील विद्युत पुरवठा खंडित होणे, दुसऱ्याच्या नावाने मतदान करणे आदी प्रकार याही वेळेस काही केंद्रांवर घडले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदारसंघात सरासरी ५९ टक्के मतदान झाले. एकूण ३४०९०५ मतदारांपैकी २०११३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार देवेंद्र फडणवीस या मतदारसंघातून रिंगणात असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. मतदानाच्या आदल्या रात्री झालेल्या हिंसक घटनेमुळे या लढतीला गालबोट लागले खरे. पण बुधवारी मतदानादरम्यान कुठल्याही केंद्रावर तणावाचा लवलेशही नव्हता. उलट काही ठिकाणी उत्साह होता. महिला, तरुण, वृद्ध सर्वच वयोगटातील मतदार रांगेत उभे असल्याचे या मतदारसंघाचा फेरफटका मारला असता दिसून आले. हा मतदारसंघ मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मानला जातो. भाजपचा बालेकिल्ला म्हणूनही त्याची ओळख आहे. एरवी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात भाजपचा प्रभाव असणाऱ्या वस्त्यांमध्ये मतदानाला जोर येतो. पण यावेळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही केंद्रावर तारांबळ उडाली, त्याचाही परिणाम सकाळच्या मतदानावर झाला. नंतर मात्र ही कसर भरून निघाली. सायं. ५ पर्यंत १ लाख ७६ हजार २४७ मतदारांनी मतदान केले होते. त्यात ९३ हजार ४०५ (५४.०३ टक्के) पुरुष आणि ८२ हजार ७९७ (४९.३० टक्के) महिला मतदारांचा समावेश आहे.
जयताळ्यात तगडा बंदोबस्त
मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी रात्री जयताळ्यात झालेल्या हिंसक घटनेची या भागात प्रत्येकाच्या तोंडी चर्चा होती. टप्प्याटप्प्यावर पोलीस बंदोबस्त होता. मतदान केंद्रावरही पोलिसांची गस्त तुलनेने अधिक होती. पोलिसांच्या वाहनाचा ताफा येथे तळ ठोकून होता. फिरत्या पथकाचीही दर अर्ध्या तासाने या भागाला भेट होत होती. मात्र मतदानाच्या प्रक्रियेवर याचा कुठेही परिणाम दिसून आला नाही. उलट या भागातील सर्वच केंद्रावर दुपारी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या..विशेषत: महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. निवडणुकीची धावपळ काय असते याचे चित्र या भागात पाहायला मिळाले. मतदाना दरम्यान सायंकाळपर्यंत अनुचित घटना घडली नव्हती.
ईव्हीएममध्ये बिघाड
प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ईव्हीएममध्ये बिघाड होण्याची परंपरा याही वेळी कायम होती. खामल्यातील सिंदी हायस्कूल, लक्ष्मीनगर आणि धरमपेठेतील एका केंद्रासह जयताळ्यातील सेंट जोसेफ केंद्रावरील ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही वेळासाठी मतदान प्रक्रिया थांबवावी लागली. नंतर ती पुन्हा सुरळीत सुरु झाली
मतदान केंद्रावरची वीज गेली
रामेश्वरी रिंगरोडवरील सनराईज कॉन्व्हेंट या केंद्रावरील वीज दोन वेळा अल्पकाळासाठी गेली. तेवढा वेळ मतदान थांबवावे लागले. वीज पुरवठा सुरळीत झाल्यावर मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरु झाली.
पती-पत्नीचे असेही ‘अंडरस्टँडिंग’
निवडणुकीत नेहमीप्रमाणे होणारे इतरांच्या नावाने होणारे मतदान याही वेळी काही या मतदारसंघात काही ठिकाणी घडले. एका केंद्रावर पती-पत्नीने परस्परांच्या नावाने मतदान केले. जयताळा मार्गावरील सावित्रीबाई फुले शाळेच्या केंद्रावर स्मिता संदीप गायकवाड आणि संदीप गायकवाड या दाम्पत्याच्या बाबत हा प्रकार घडला. स्मिताच्या नावाने संदीपने सकाळी मतदान केले. दुपारी स्मिता मतदानासाठी गेली तेंव्हा तिचे मतदान झाल्याचे सांगण्यात आले. तिने भाजपचे कार्यकर्ते नंदू मानकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी चौकशी केल्यावर स्मिताचे पतीनेच मतदान केल्याचे उघड झाले. त्यामुळे नंतर स्मिताने पती संदीपच्या नावाने मतदान करून आपसातील सामंजस्य कायम राखले. त्याचप्रमाणे खामल्यातील सोमलवार केंद्रावर धर्मेश पाटील याच्या नावाने दुसऱ्यानेच मतदान केले. तो मतदानाला गेल्यावर बोगस मतदानाचा प्रकार उघड झाला. त्यानंतर त्याचे मतपत्रिकेवर मत नोंदवून घेण्यात आले. आय.टी. पार्कजवळील प्रादेशिक कामगार केंद्राच्या मतदान केंद्रावर अश्विनी गायकवाड यांच्या नावाने दुसऱ्याच महिलेने मतदान केले.
व्होटर्स स्लीपचे गठ्ठे
व्होटर्स स्लीप वाटपाचे काम लोकसभा निवडणुकीपासून जिल्हा प्रशासनाकडे सोपवण्यात आले. मात्र यादीतील मतदारांचे चुकीचे पत्ते असल्याने आणि अनेक मतदारांनी त्यांचे निवासस्थान बदलले असल्याने १०० टक्के व्होटर्स स्लीपचे वाटप होऊ शकले नाही. ज्या स्लीप शिल्लक होत्या त्या मतदान केंद्रावर ठेवण्यात आल्या होत्या. पण तेथेही मोजक्याच लोकांनी त्या घेतल्या. अनेकांची नावे यादीत होती पण त्यांच्या नावाच्या स्लीप नव्हत्या. काहींना स्लीप घेतल्या पण त्यांचे केंद्र इतरत्र असल्याचे त्यांना वेळेवर कळाले. त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली. ओळखपत्र नसल्यानेही मतदारांची गैरसोय झाली.
सीडीएस केंद्रावर संथ गती
हिंगणा टी-पॉर्इंटजवळील सीडीएस शाळेच्या मतदान केंद्रावरील एका बुथवर मतदानाची प्रक्रिया संथपणे होत असल्याने मतदारांना त्याचा फटका बसला. तास-दीड तास रांगेत उभे राहिल्यांतर मतदारांना मतदान करायला मिळत होते. ज्येष्ठ नागरिक, वृद्ध महिलांना याचा फटका बसला. विशेष म्हणजे याच केंद्रावरील दुसऱ्या बुथवर मात्र गर्दी नव्हती. दोन्ही बुथवरील मतदारांची संख्या जवळपास सारखी होती.