लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलं का?’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी बारामतीत कार्यकर्त्यांवर संतापले. तर दुसरीकडे बुलढाण्याचे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचीही जिल्ह्यातील एका कार्यक्रमात मतदारांवर टीका करताना जीभ घसरली. 'अशांपेक्षा वारांगना बऱ्या' असे ते म्हणाले. या दोन्ही विधानांवरून सोमवारी विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.
बारामतीत उपमुख्यमंत्री पवार यांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी कामे झाली नसल्याची तक्रार केली. यावेळी संतप्त होत उपमुख्यमंत्री पवार यांनी वरील शब्दांत कार्यकर्त्यांना सुनावले. पवार यांच्या विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. एवढी सत्ता कुणामुळे मिळाली. मग तुम्ही राजे आहात काय? असे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.
- शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जयपूर कोथळी (ता. मोताळा) येथे सत्काराच्या कार्यक्रमात ३ जानेवारीला जीभ घसरली. मतदार विरोधकांच्या मद्य, मांस व पैशाला मतदार भाळल्याची टीका करत 'अशांपेक्षा वारांगना बऱ्या' असे ते म्हणाले.
- मतदाराबद्दल गायकवाड यांनी काय भूमिका मांडली यावर मला बोलायचे नाही, पण मतदार आमच्यासाठी सर्वोपरी आहेत, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तर 'अशा' लोकांना आपण निवडून दिले, त्याचा जनतेने अंतर्मुख होऊन विचार करावा, असे उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.
- संजय गायकवाड मतदारांना वेश्या म्हणत असतील तर हे कोण? असा प्रश्न माजी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी उपस्थित केला.
- एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली.
- तर, लोकप्रतिनिधी उलटा बोलला तर त्याची बातमी होते, सामान्य नागरिक उलटा बोलला तर त्याची बातमी होत नाही, असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले.