योगाभ्यासातून मोक्षप्राप्तीकडे
By Admin | Updated: June 19, 2015 23:46 IST2015-06-19T23:46:02+5:302015-06-19T23:46:02+5:30
दुखणे उद्भवले की सगळे उपचार करून झाल्यावर लोक योगसाधनेचा आधार घेतात. यासाठी योगासनांकडे वळणाऱ्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. माझ्याही बाबतीत तसेच काहीसे झाले.

योगाभ्यासातून मोक्षप्राप्तीकडे
दुखणे उद्भवले की सगळे उपचार करून झाल्यावर लोक योगसाधनेचा आधार घेतात. यासाठी योगासनांकडे वळणाऱ्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. माझ्याही बाबतीत तसेच काहीसे झाले. आधुनिक जीवनशैली, बैठे काम या सगळ्यांमुळे पाठीचे दुखणे आले. २००३ साली मी माझे शारीरिक दुखणे घेऊन वाशी येथील योग विद्यानिकेतनचा मार्ग धरला. तीन महिन्यांच्या माझ्या योगाभ्यासानंतर मला वाशी योग विद्यानिकेतनचे विजय चिटणीस या योगशिक्षकांनी टिचर ट्रेनिंग कोर्स करण्याचा आग्रह धरला. माझ्यामध्ये असलेली जिद्द, मेहनत पाहून मी एक चांगला योगशिक्षक होऊ शकतो असे त्यांना वाटले आणि इथून खरा माझा योगविद्येचा प्रवास सुरू झाला.
२००४ साली मी योगशिक्षक झालो. योगशिक्षक झाल्यानंतर या योगविद्येचा अभ्यास करतानाच मला यामधील तत्त्वज्ञानही जाणून घ्यायचे होते. एकीकडे मी स्वत: योगविद्या शिकवत होतो तर दुसरीकडे मी स्वत: योगविद्येचा सखोल अभ्यास करीत होतो. योगाभ्यासाचे संपूर्र्ण ज्ञान मिळविण्यासाठी मी मुंबई युनिव्हर्सिटी आणि नाशिकमध्ये जाऊन योगशिक्षण घेतले. योग म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्यासाठी मला सहा वर्षांचा कालावधी लागला. एम.ए. (योगशास्त्र) हे पदवीचे शिक्षण घेतले आणि माझा या क्षेत्रातला अभ्यास पूर्ण केला. प्रत्येक वेळी वाशीतील योग विद्या निकेतनचे अनमोल सहकार्य लाभले. ज्या योग विद्येने असंख्य फायदे झाले तेच इतरांनाही व्हावे याच उद्देशाने मी नेरूळमध्ये योगसाधना मंदिराची स्थापना केली. सुरुवातीला १८-१९ लोक येथे योगाभ्यासासाठी येत होते, मात्र हाच आकडा आता १५०च्या घरात पोहोचला आहे. माझे गुरू पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांचा आदर्श घेऊन ‘योग विद्या घरोघरी’ हे उद्दिष्ट्य समोर ठेवून घराघरात योगाभ्यास पोहोचविण्याचे काम करण्याचे ठरविले. योगाभ्यासातूनच मोक्षप्राप्तीपर्यंतचा प्रवास गाठता येतो. सुदृढ शरीराबरोबर सुदृढ मन असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मन शांत असेल तरच मनुष्य सुखाने जीवन व्यतीत करू शकतो. जन्म, मृत्यू या प्रवाहातून प्रत्येकालाच प्रवास करायचा असतो, पण अध्यात्माच्या जोडीने केलेला हा प्रवास अधिक सुखकर असतो. सध्या मी के.जे. सोमय्या कॉलेजच्या भारतीय संस्कृती पीठम् या ठिकाणी तत्त्वज्ञान या विषयाचा प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आहे.
- साबीर शेख
योगगुरू, नेरूळ योग साधना मंदिर
(शब्दांकन : प्राची सोनवणे)