योग निरामय जीवनासाठी!
By Admin | Updated: June 19, 2015 23:43 IST2015-06-19T23:43:17+5:302015-06-19T23:43:17+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगाला जगव्यापी प्रशासकीय स्वरूप दिलेले असले तरी योगमार्ग अनुसरणारे ते पहिले पंतप्रधान नाहीत. इंदिरा गांधीदेखील योगसाधक होत्या.

योग निरामय जीवनासाठी!
राहुल रनाळकर, मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगाला जगव्यापी प्रशासकीय स्वरूप दिलेले असले तरी योगमार्ग अनुसरणारे ते पहिले पंतप्रधान नाहीत. इंदिरा गांधीदेखील योगसाधक होत्या. धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्याकडून त्यांनी योगसाधनेचे धडे गिरवले. देश-परदेशात प्रवास करतानाही गांधी कुटुंबीयांसोबत धीरेंद्र ब्रह्मचारी हे असत. त्यामुळे त्यांना ‘फ्लाइंग गुरू’ म्हणूनही संबोधले जात असे. १९७०च्या दशकात इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने आणि धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या मार्गदर्शनाने काही शाळांमध्ये योग विषयाचा समावेश करण्यात आला होता.
नरेंद्र मोदी यांचे लौकिक अर्थाने कोणी गुरू नसले तरीदेखील योग विषयाची अधिक खोलवर माहिती त्यांनी बंगळुरूस्थित डॉ. एच.आर. नागेंद्र यांच्याकडून घेतली. नागेंद्र यांची योगसाधना ध्यानमार्गाकडे अधिक झुकणारी आहे. नागेंद्र यांनी सखोल संशोधन केलेला आवर्तन ध्यान हा नरेंद्र मोदी यांचा आवडता ध्यानप्रकार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची खरी कल्पना पोर्तुगीज योगगुरू सूर्यनंद यांची. सूर्यनंद यांनी त्यांचे गुरू स्वामी कृष्णनंद यांच्याकडून हृषीकेशमध्ये योगाचे धडे गिरवले. त्यानंतर त्यांनी पोर्तुगालमध्ये योगाचा आश्रम स्थापन केला. बंगळुरूचे डॉ. नागेंद्र यांनी सूर्यनंद यांच्याकडून योग दिनाची कल्पना नरेंद्र मोदी यांना सांगितली. पुढे सप्टेंबर २०१४मध्ये मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत ही संकल्पना मांडली.
अमेरिकेत झुम्बा क्लासेसची मोठी क्रेझ आहे. पण या क्रेझलाही योग छेद देत आहे. अमेरिकेत सध्याच्या घडीला दीड कोटी लोक नियमित योग करतात. यापैकी ४५ टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न ७५ हजार डॉलरहून अधिक आहे. यातही महिलांचा समावेश सर्वाधिक आहे. योगा जनरेशन नावाची संकल्पनाही अमेरिकेत रुळू पाहत आहे.
योग : का, कशासाठी?
योग ही प्राचीन भारताने जगाला दिलेली सर्वांत मोठी देणगी. योगाच्या माध्यमातून जसा शरीर आणि मनाचा संयोग साधला जातो, तसेच विचार आणि कृती यांच्यातही समन्वय, ताळमेळ साधण्याचे काम योगाभ्यासाच्या माध्यमातून होते.
मानव आणि निसर्ग यांच्यात अतूट असे नाते निर्माण करणे, हेदेखील योगाच्या माध्यमातून शक्य आहे. योग केवळ व्यायाम प्रकार नाही, तर एकात्मभाव निर्माण करणारे अत्यंत सशक्त असे माध्यम असल्याने जगभर योगाचा स्वीकार झाला.
ही तर जीवनपद्धती!
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या टप्प्यातून अष्टांग योग जातो. पाश्चिमात्यांचा योगविषयक अभ्यास हा ८० टक्क्यांहून अधिक आसनांशी संबंधित आहे. ते योगाकडे एक व्यायामपद्धती म्हणून पाहतात. त्यामुळे पाश्चिमात्यांनी योगाचे मूळ स्वरूपही बऱ्याच प्रमाणात बदलले आहे. पण सध्या अमेरिकेतील शाळांमध्ये जो योग शिकवला जातो, तो भारतीय शिक्षकांनी तयार करून दिलेला आहे.
चीन : योग कॉलेज सुरू
- चीनच्या कनमिंग शहरात पहिले योगा कॉलेज
सुरू झाले आहे. हे कॉलेज भारत आणि चीनच्या
नव्या मैत्रीचा अध्याय असेल. केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग
यांच्या हस्ते या कॉलेजचा शुभारंभ झाला आहे.
- योगा शिकण्यासाठी प्रवेश घेणाऱ्या चिनी विद्यार्थ्यांना नवी दिल्लीतील मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ योगामध्ये कोर्सेस करण्याचीही संधी मिळणार आहे.
- शिवाय त्यांना दिली जाणारी प्रमाणपत्रे ही आंतरराष्ट्रीय कोर्सेस केल्याची असतील. योगविषयातील दर्जा गाठायला चीनला अजून वेळ लागणार असला तरी भारतीय योगशिक्षकांच्या मदतीने ते योग विषयात आघाडी घेतील, असा विश्वास युनान विद्यापीठातील शिक्षकांना वाटतोय.
चीन : योग कॉलेज सुरू
- चीनच्या कनमिंग शहरात पहिले योगा कॉलेज
सुरू झाले आहे. हे कॉलेज भारत आणि चीनच्या
नव्या मैत्रीचा अध्याय असेल. केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग
यांच्या हस्ते या कॉलेजचा शुभारंभ झाला आहे.
- योगा शिकण्यासाठी प्रवेश घेणाऱ्या चिनी विद्यार्थ्यांना नवी दिल्लीतील मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ योगामध्ये कोर्सेस करण्याचीही संधी मिळणार आहे.
- शिवाय त्यांना दिली जाणारी प्रमाणपत्रे ही आंतरराष्ट्रीय कोर्सेस केल्याची असतील. योगविषयातील दर्जा गाठायला चीनला अजून वेळ लागणार असला तरी भारतीय योगशिक्षकांच्या मदतीने ते योग विषयात आघाडी घेतील, असा विश्वास युनान विद्यापीठातील शिक्षकांना वाटतोय.
अमेरिकेतील २०० ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. यात विविध ७० संस्थांचा सहभाग आहे; तर सिंगापूरमध्ये विविध ५० ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे.
सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त विजय ठाकूर यांच्या पुढाकाराने हे कार्यक्रम होत आहेत. बेल्जियममध्येही योग दिनाचे कार्यक्रम होत आहेत. हजारो योगप्रेमी यात सहभागी होत आहेत. ब्रुसेल्सच्या कॅम्ब्रे पार्कमध्ये हे भव्य आयोजन होत आहे.
जपानमध्येही ३० ठिकाणी योग दिनानिमित्त योग कार्यक्रम होत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनी न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत भरगच्च कार्यक्रम होत आहेत.