होय, आम्हीच केली मंजुळाला मारहाण!

By Admin | Updated: July 7, 2017 05:11 IST2017-07-07T05:11:44+5:302017-07-07T05:11:44+5:30

कैदी मंजुळा कैद्यांवर वर्चस्व गाजवत होती. आमचे ऐकत नव्हती. तिच्या उर्मट वागण्यामुळे आम्ही मारहाण केली, अशी कबुली

Yes, we have beaten Manjula! | होय, आम्हीच केली मंजुळाला मारहाण!

होय, आम्हीच केली मंजुळाला मारहाण!

मनीषा म्हात्रे/लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कैदी मंजुळा कैद्यांवर वर्चस्व गाजवत होती. आमचे ऐकत नव्हती. तिच्या उर्मट वागण्यामुळे आम्ही मारहाण केली, अशी कबुली मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सहापैकी दोन आरोपींनी दिली. मात्र तिची हत्या करण्याचा आमचा उद्देश नव्हता, असेही त्यांनी सांगितले. भायखळा कारागृहातील सीसीटीव्हीमध्ये मंजुळाचे केस ओढत तिला होत असलेल्या मारहाणीचा थरार कैद झाला आहे.
या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेली जेलर मनीषा पोखरकर, अंमलदार बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे या सहाही जणींचे जबाब नोंदविण्यात आले. सुरुवातीला या सर्वांनी आपण काहीच केले नसल्याचा आव आणला. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच बिंदू नाईकडे आणि आरती शिंगणेने मारहाण केल्याची कबुली दिली. दोघींच्या जबाबानुसार, ‘जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मंजुळाचे इतर कैदी ऐकत असत; पण ती आम्हाला जुमानत नव्हती. त्यामुळे राग होताच. घटनेच्या दिवशी दोन अंडी आणि पाच पावांच्या हिशेबावरून वाद झाला. ती हिशेब देत नव्हती, त्यामुळे आम्ही तिला मारहाण केली. पॅसेजमध्ये मारहाण करत असताना ‘कैद्यांसमोर मारू नका... नाही तर ते माझे ऐकणार नाहीत,’ असे ती सांगत होती. तिचा अपमान व्हावा म्हणून मुद्दाम बरॅकपर्यंत नेले आणि इतर कैद्यांसमोर मारहाण केली. मात्र तिचा जीव घेण्याचा उद्देश नव्हता, असे त्यांनी जबाबात म्हटले. रात्री तिचा मृत्यू झाल्याचे त्यांनी जबानीत सांगितले.
या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज गुन्हे शाखेच्या हाती लागले आहे. या भक्कम पुराव्याच्या आधारे सहाही जणांकडे कसून चौकशी सुरू आहे.
दंडाधिकाऱ्यांचा जबाब नोंदविणार
मंजुळाला मारहाण झाली त्याच दिवशी दुपारी दंडाधिकाऱ्यांनी कारागृहाला भेट दिली होती. त्यामुळे या प्रकरणात त्यांचाही जबाब नोंदविण्यात येणार आहे.

...तर ती वाचली असती

वॉर्डन मंजुळाला सकाळी मारहाण झाली. त्यात बेशुद्ध झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता ती शुद्धीत आली. शौचालयात नेले तेव्हा तेथे ती कोसळली. या वेळी तिला वेळीच उपचारासाठी रुग्णालयात नेले असते तर ती वाचली असती. मात्र तेव्हाही तिच्याकडे दुर्लक्ष झाले. सायंकाळी साडेसात वाजता तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Yes, we have beaten Manjula!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.