येळकोट येळकोट जय मल्हार! खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 08:49 PM2020-11-23T20:49:30+5:302020-11-23T20:49:45+5:30

मंदिर उघडल्याने कुलधर्म कुलाचारासाठी खंडोबा गडावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.  

Yelkot Yelkot Jay Malhar! Crowd of devotees visit Khandoba at Jejuri fort | येळकोट येळकोट जय मल्हार! खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर भाविकांची गर्दी

येळकोट येळकोट जय मल्हार! खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर भाविकांची गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देकुलधर्म कुळाचारासाठी भाविकांची भली मोठी रांग : नवविवाहीत दांपत्याची गर्दी

जेजुरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे जेजुरीचे खंडोबा मंदिर पाडव्याला उघडण्यात आले. त्यावेळेपासून भाविकांनी जेजुरीत खंडोबा दर्शनासाठी गर्दी केली आहे. एकावेळी मंदिरामध्ये फक्त शंभर लोकांना सोडले जात आहे. गेल्या सोमवारी पहाटे पुरंदरचे आमदार संजय जगताप व   राजवर्धिनी जगताप यांच्या हस्ते पूजा करून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यास सुरुवात झाली.  जेजुरीकर आणि काही संघटना व संस्थांकडून भाविकांचे स्वागत करण्यात आले. तर खंडोबा मंदिर उघडल्याने जेजुरीतील ग्रामस्थ व भाविकांनी भंडार उधळून आनंद साजरा केला. तब्बल आठ महिन्यांनी जेजुरीतील लॉज, हॉटेल्स, उपाहारगृहे उघडली असून भाविकांची वर्दळ सुरू झाल्याने जेजुरीची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गडावर पूर्ण सुरक्षितता घेतली जात आहे. गडावरील पूजा अभिषेक बंद आहेत.
 

मंदिर उघडल्याने कुलधर्म कुलाचारासाठी खंडोबा गडावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.  प्रामुख्याने नवविवाहीत दांपत्याची गर्दी पहावयास मिळत आहे.  लॉक डाऊनमध्ये लग्न झालेले अनेक जोडपी देव दर्शनाला येऊ लागली आहेत. राज्यभरातील भाविक ही माहिती घेऊन देव दर्शनाला येऊ लागले आहेत. काल रविवार असल्याने एकाच दिवसात वीस ते पंचवीस हजार भाविकांनी जेजुरीत गर्दी केली होती. यामुळे सोशल डिस्टसिंग पाळणे अडचणीचे होऊ लागले आहे. शासकीय नियमांचे पालन करणे भाविकांची जबाबदारी आहे मात्र भाविक मात्र हे पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत मार्तंड देव संस्थान कडून नियोजन करावे लागणार आहे.
......................
अनेक भाविक लहान मुले किंवा वयोवृद्ध ही दर्शनाला येत आहेत. मंदिर उघडल्यापासून दररोज किमान दीड ते दोन हजार भाविक येत आहेत. एका वेळी  १०० भाविकांना देव दर्शनासाठी गडकोटात सोडले  आणि योग्य डिस्टन्स पाळले तर दिवसभरात दीड ते दोन हजार भाविकांना दर्शन मिळू शकते. मात्र, गर्दीवर नियंत्रण आणणे अडचणीचे ठरत आहे. रविवार देवाचा वार असल्याने भाविकांची जेजुरीत मोठी गर्दी होती. दर्शनासाठी नियोजन करणे हाताबाहेर जाणारे आहे. पुढील रविवारी तर सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने मोठी गर्दी राहण्याची शक्यता आहे. याबाबत देव संस्थान कडून नियोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  यासाठी विश्वस्त मंडळाची त्वरित  बैठक बोलावली असून नियोजन करावेच लागणार असल्याचे प्रमुख विश्वस्त प्रसाद शिंदे यांनी म्हटले आहे.

Web Title: Yelkot Yelkot Jay Malhar! Crowd of devotees visit Khandoba at Jejuri fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.