यंदाचे संमेलन हे शेतकऱ्यांचे !

By admin | Published: January 17, 2016 12:49 AM2016-01-17T00:49:31+5:302016-01-17T00:49:31+5:30

या संमेलनात शेतकऱ्यांची मुलं सहभागी आहेत. न्या. रानडे यांचे अभिजनवादी वर्ग आणि प्रवाह आणि महात्मा फुले यांचा बहुजनवादी विचार दोन्ही प्रवाह एकत्र आले आहेत. त्यामुळे हे

This year's convention! | यंदाचे संमेलन हे शेतकऱ्यांचे !

यंदाचे संमेलन हे शेतकऱ्यांचे !

Next

- संजय माने,  पिंपरी
या संमेलनात शेतकऱ्यांची मुलं सहभागी आहेत. न्या. रानडे यांचे अभिजनवादी वर्ग आणि प्रवाह आणि महात्मा फुले यांचा बहुजनवादी विचार दोन्ही प्रवाह एकत्र आले आहेत. त्यामुळे हे शेतकऱ्यांचे संमेलन आहे, अशी स्पष्टोक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी त्यांना विचारलेल्या ‘संमेलन सर्वसमावेशक आहे काय?’ या प्रश्नाला उत्तर देताना केली.
साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षांच्या मुलाखतीची प्रथा या वर्षीपासून सुरू झाली. सबनीस यांची मुलाखत ‘लोकमत’च्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक चक्रधर दळवी, तसेच ज्येष्ठ पत्रकार संतोष शेणई, प्रसन्न जोशी यांनी घेतली. त्या वेळी सबनीस म्हणाले, संमेलनाध्यक्षपदाच्या भाषणात शेतकऱ्यांबद्दल बोलायचे राहून गेले. या संमेलनात लेखक, कवी म्हणून सहभागी झालेल्यांमध्ये अनेक शेतकरी आहेत. सरकार कोणाचेही असो, शेतकऱ्यांच्या यशोगाथा त्यांनी पुढे आणल्या पाहिजेत. त्यांना उपेक्षित ठेवू नये. सर्वांचा पोशिंदा असलेला शेतकरी रोज आत्महत्या करतो, ही लाजिरवाणी बाब आहे, असे ते म्हणाले.
कवींनी आपल्या काव्यात वर्णन केलेले हिरवेगार गालिचे आता कुठे आहेत? पाणी खोल गेले आहे. सुमारे सहा लाख हेक्टर जमीन ठिबक सिंचन पाण्याखाली, तर आठ लाख हेक्टर जमिनीला पाणी मिळत नाही. किमान एक एकर जमिनीला बारमाही पाणी देण्याची व्यवस्था करा. सामान्य शेतकऱ्यांना पाणी मिळू द्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यघटनेतील कलम ३२३ बनुसार कृषी ट्रिब्युनल सुरू करा. शेतीमालाच्या खर्चावर अधारित शेतीमालाला भाव द्या. शेतकऱ्यांसाठी संसदेत कायदा बनवा, तर आत्महत्या थांबतील. साहित्य ही संकल्पना अभिजनापुरती मर्यादित न राहता बहुजनांपर्यंत पोहोचावी. दलित, शेतकरी, आदिवासी यांचाही सहभाग असावा, अशी भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठवाड्यात जातीयवाद असताना आपण त्या भागातील असूनही परिवर्तनवादी विचार कसे जोपासले? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, बालपणापासून घरातच आध्यात्मिक विचार रुजले गेले. मुस्लिम, दलित समाजाचे लोक अवतीभवती होते. बहुजन समाजात वाढलो. त्यातूनच मानवतावादी विचार रुजले.
महापुरुष साध्य की साधन, हे ठरवणे महत्त्वाचे आहे. सर्व मानवजातीची उत्तरे एकाच महापुरुषाकडे असती, तर वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे महापुरुष तयार झाले नसते. त्यामुळे भूतकाळातील आणि वर्तमानकाळातील विद्वान यांच्यात व माझ्यात सीमारेषा आहे. मानवी कल्याण हेच साधन मानणारे सर्वच महापुरुष मला आदरणीय आहेत. महापुरुषांच्या कर्तृत्वाला श्रद्धा आणि अंधश्रद्धेने झाकोळले आहे. स्वार्थासाठी महापुरुषांची वाटणी केली जाते. त्यामुळे महापुरुषांचा ध्येयवाद काळवंडला जातो, असे त्यांनी नमूद केले.
त्यांचे अनुयायीच त्यांचा ध्येयवाद काळवंडतात. नेते दुकानदारी करतात. एका महापुरुषाची एक चळवळ एक गट, तर दुसऱ्या महापुरुषाचा दुसरा गट, मठ तयार होतो. स्वार्थासाठी महापुरुष वापरले जात असल्याने महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
संमेलनापूर्वी आणि संमेलनानंतर सबनीस कोण, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर काय सांगाल?, असे विचारले असता ते म्हणाले, संमेलनाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सबनीस कोण, हे स्पष्ट केले आहे. राजकारण्यांबद्दल माझ्या मनात रोष होता. त्यात शरद पवारही होते. परंतु, त्यांच्याबद्दलची माझी भूमिका बदलली आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीवरून होणारे वाद कसे मिटवता येतील, यावर पवार यांनी तोडगाही सुचवला आहे.
मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांतून साहित्य क्षेत्रातील योगदान, समीक्षा , एकांकिका, वगनाट्य, शाहिरी, तसेच आदिवासी समाजासाठी केलेले काम, कामगार चळवळीशी आलेला संबंध यांतून त्यांचा जीवनपट उगलगडत गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने मानवतावादी विचार हाच सेक्युलर विचार म्हणून ठामपणे सांगत आहे. ब्राह्मण, ब्राह्मण्यवादाची नाळ तोेडली गेली पाहिजे. संघर्ष की संवाद, हा आपल्या पिढीपुढे पडलेला प्रश्न आहे.

Web Title: This year's convention!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.