कोरोनाचा काळोख दूर करत यंदा आतषबाजीने उजळणार आकाश!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 09:09 AM2021-10-22T09:09:25+5:302021-10-22T09:09:47+5:30

कोरोना सरतोय, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आता बाजारही फुलू लागलाय... तब्बल दीड वर्षांनी राज्यातील बाजारपेठांत पुन्हा चैतन्य निर्माण होऊ लागलंय... याचाच वेध आजपासून -

This year the sky will light up with fireworks removing the darkness of Corona! | कोरोनाचा काळोख दूर करत यंदा आतषबाजीने उजळणार आकाश!

कोरोनाचा काळोख दूर करत यंदा आतषबाजीने उजळणार आकाश!

googlenewsNext

-मुकुंद चेडे   

वाशी (जि. उस्मानाबाद) : कोविडच्या सावटाखाली गेली दिवाळी अंधारातच साजरी झाली. त्यामुळे महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेरखेड्यातील फटाका उद्योगाला जबर फटका बसला. मात्र, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने येथील उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अगदी अलीकडे अतिवृष्टीचा फटका बसला असला तरी पुन्हा हा उद्योग त्यातून सावरत उभारी घेत आहे.

तेरखेडा येथील फटाक्यांना देशभरात मागणी आहे. गतवर्षी कोविडच्या निर्बंधामुळे हा उद्योग काहीसा कोलमडला. मात्र, यावेळी निर्बंधातून सवलत मिळाल्याने पुन्हा येथील उद्योजकांनी जोमाने कामाला सुरुवात केली आहे. यंदा किमान पाच कोटीपर्यंत उलाढाल होईल, अशी अपेक्षा कारखानदारांना आहे.     

ग्रीन फटाका निर्मितीवर भर 
येथील फटाका उद्योजक हे सुतळीबाॅम्ब, फुलबाजा, लक्ष्मीतोटे, तेरखेडी तोटे, आदल्या, मातीचे नळे या पारंपरिक फटाक्याची निर्मिती करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके तयार करण्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे कमी आवाजाचे फटाके तयार करण्यावर भर दिला जात आहे.    

रोजगार घटले, भाव वाढला 
तेरखेड्याच्या फटाका उद्योगातून सुमारे तीन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होत होता. मात्र, उत्पादन घटल्याने यावर अवलंबून असलेले कामगार, सुतार, कुंभार, ऑफसेट प्रिंट यावरही परिणाम झाला आहे.  

निजामकाळात झाली सुरुवात  
जवळपास १०० वर्षांपूर्वी येथील काही नागरिक निजामाच्या तोफखान्यावर कामाला होते. जेव्हा निजाम राजवट संपून मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला, तेव्हा या नागरिकांनी उदरनिर्वाहासाठी विहीर कामात दारूगोळ्याचा वापर सुरू केला. यातूनच पुढे फटाका निर्मिती उद्योगाने आकार घेतला. आजघडीला सुमारे ३० कारखाने फटाक्याचे उत्पादन करतात. 

डिझेल दरवाढ व कागद वधारल्यामुळे फटाक्याचे दर वाढले आहेत. उत्पादनातही घट झाली असून, त्याचा परिणाम फटाक्याच्या दरवाढीवर नाईलाजास्तव होत आहे.  
- फरीद पठाण, अध्यक्ष, फटाका असोसिएशन       

अतिवृष्टीमुळे फटाका निर्मितीत बाधा निर्माण झाली होती. दरवर्षी कोणते ना कोणते संकट या व्यवसायापुढे उभे ठाकत आहे. या व्यवसायास चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनुदान व कर्ज स्वरूपात मदत करणे गरजेचे आहे.   
- इलियास दारुवाले, 
फटाका उद्योजक

Web Title: This year the sky will light up with fireworks removing the darkness of Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.