याकूब रात्रभर जागाच होता

By admin | Published: July 31, 2015 04:17 AM2015-07-31T04:17:28+5:302015-07-31T04:17:28+5:30

कारागृहाच्या फाशी यार्डात बंदिस्त असलेला याकूब रात्रभर जागाच होता. सकाळी ५.५० वाजताच्या सुमारास सुरक्षारक्षकाने त्याला आंघोळ करून पूजा-प्रार्थनेची सूचना केली.

Yakub was awake at night | याकूब रात्रभर जागाच होता

याकूब रात्रभर जागाच होता

Next

नागपूर : कारागृहाच्या फाशी यार्डात बंदिस्त असलेला याकूब रात्रभर जागाच होता. सकाळी ५.५० वाजताच्या सुमारास सुरक्षारक्षकाने त्याला आंघोळ करून पूजा-प्रार्थनेची सूचना केली. त्यानुसार याकूबने आंघोळीनंतर नवीन कपडे घालून नमाज पठण केले. नंतर त्याला नाश्ता देण्यात आला. डॉक्टरने तपासणी केल्यानंतर याकूबने धार्मिक पुस्तकाचे वाचन केले. यादरम्यान एका अधिकाऱ्याने याकूबशी संवाद साधत त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली. त्यानंतर त्याला कोणत्या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा दिली जात आहे, त्याची आठवण करून देण्यात आली. त्याच्या हातून घडलेल्या गुन्ह्याचा पश्चात्ताप करून अल्लाह/ईश्वराकडे क्षमायाचना करण्याचेही सुचविण्यात आले. त्यानंतर याकूबला कारागृहातील सुरक्षारक्षकांनी फाशी यार्डातून बाहेर काढून त्याचे दोन्ही हात पाठीमागे बांधण्यात आले. वधस्तंभाकडे नेताना पुन्हा एकदा डॉक्टरांनी याकूबची वैद्यकीय तपासणी केली. त्याच्या तोंडावर काळा बुरखा घालून गळ्याभोवती फास टाकण्यात आला. या वेळी वधस्तंभाजवळ कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, न्यायदंडाधिकारी गिरीश जोशी, कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामने, अधीक्षक योगेश देसाई तसेच मेडिकलचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे आणि काही सुरक्षारक्षक उपस्थित होते. त्यांनी ठरल्या वेळेनुसार सकाळी ७ वाजता याकूबचा फास आवळण्यासाठी अधीक्षक देसाई यांनी ‘जल्लाद‘च्या भूमिकेतील कर्मचाऱ्याला इशारा केला. त्या कर्मचाऱ्याने वधस्तंभाचा खटका ओढताक्षणीच याकूबच्या पायाखालचा पाटा झटक्यात बाजूला झाला. त्यामुळे गळ्यातील फास आवळला गेल्याने याकूब वधस्तंभाच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात लोंबकळला. काही क्षणांतच तो शांत झाला. सुमारे ३० मिनिटांनंतर डॉक्टरांनी याकूबची तपासणी करून तो मृत झाल्याचे घोषित केले.

दोन मिनिटांचे मौन
३० जुलै हा याकूबचा वाढदिवस. जन्मदिवशीच याकूबचा मृत्यू झाल्यानंतर तेथे उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारतीय संस्कृतीनुसार त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दोन मिनिटे मौन पाळले. त्यानंतर गृहमंत्रालयाला आणि याकूबच्या नातेवाइकांना फाशी देण्यात आल्याचे कळविण्यात आले.

मुलीशी बोलला मोबाइलवर
मृत्युदंडाची शिक्षा देण्यापूर्वी संबंधित आरोपीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यात येते. याकूबला बुधवारी मध्यरात्री कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी त्याची अंतिम इच्छा विचारली. मुलगी जुबेदा हिच्याशी बोलायचे आहे, असे याकूब म्हणाला. कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी लगेच जुबेदाच्या मोबाइलवर संपर्क करून तिच्याशी याकूबचे बोलणे करून दिले. बापलेकीच्या या अंतिम संवादादरम्यान याकूबने जुबेदाला खूप शिकून मोठी हो, नाव कमव, असे आशीर्वाद दिल्याचे समजते.

एक फुलका, चिकनचे दोन लेगपीस : बुधवारी रात्री चिकनचे लेगपीस अन् फुलका खायची इच्छा याकूबने व्यक्त केली. तातडीने गरमागरम चिकन अन् फुलके आणण्यात आले. याकूबने दोन लेगपीस अन् एक फुलका असे जेवण घेतले. सुलेमानही सुखावला. अधिकारीही आश्वस्त झाले. दोन्ही भाऊ अस्खलित इंग्रजीत एकमेकांशी बोलले.

Web Title: Yakub was awake at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.