पार्थ पवार यांच्या कंपनीने सरकारी जमीन खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणात कंपनीत भागीदार असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्थ पवारांचे नाव आरोपींमध्ये नाही. त्यावरच बोट ठेवत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवारचे कंपनीत ९९ टक्के शेअर असून कंपनीवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यांनी अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण देवेंद्र फडणवीस फार साधनशुचितेच्या गोष्टी करतात, असेही म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, "कंपनीत ९९ टक्के शेअर्स पार्थ पवारांचे आहेत आणि १ टक्के शेअर पाटलांचे आहेत. १ टक्के शेअर असणाऱ्यावर गुन्हा दाखल होतो, पण ज्याचे त्या कंपनीत ९९ टक्के शेअर आहेत, त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. मग या कंपनीवरच गुन्हा दाखल व्हावा."
३०० कोटी कोठून आले, याची चौकशी करा
"या कंपनीकडून ३०० कोटी रुपये कोठून आले याची चौकशी झाली पाहिजे. ही सरकारी जमीन आहे. सरकारी जमीन कशी विकली गेली? गुंठाभरही सरकारी जमीन विकता येत नाही. यांनी ४० एकर सरकारी जमीन विकली, तीही पुण्यातील. कोरेगाव पार्कमधील. हे कसं होऊ शकते. मोदींचं सरकार म्हणत होतं की, ना खाऊंगा, ना खाने दुंगा. इथे काय प्रकार आहे", अशा शब्दात दानवे यांनी भाजपला डिवचले.
"समजा हे उघड झालं नसतं, तर...? पचवली असती, तर पार्थ पवार मालक झाला असता. त्या एक टक्केवाल्या पाटलाला त्याने जमीन दिली असती का? राज्य सरकार लपवा छपवी करत आहे. फसवेगिरी करत आहे. यात पार्थ पवारांवर कारवाई झाली पाहिजे आणि अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीस फार साधनशुचितेच्या गोष्टी करतात", असा टोला अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
पार्थ पवारांच्या कंपनीसोबतचा भूखंडाचा व्यवहार रद्द
दरम्यान, कोरेगाव पार्कमधील जी जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केली होती, तो व्यवहार रद्द करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याची माहिती दिली. "मला आज संध्याकाळी कळालं की, या व्यवहाराबद्दल जे कागदपत्रे झाली होती, ती रद्द करण्यात आली आहे. जो व्यवहार झाला होता, तो रद्द करण्यात आला आहे", असे अजित पवार यांनी सांगितले.
Web Summary : Controversy erupts over Parth Pawar's company acquiring government land. Danve demands action, questioning the source of funds and alleging cover-up. Ajit Pawar confirms the land deal cancellation amid the uproar.
Web Summary : पार्थ पवार की कंपनी द्वारा सरकारी भूमि अधिग्रहण पर विवाद। दानवे ने कार्रवाई की मांग की, धन के स्रोत पर सवाल उठाया और कवर-अप का आरोप लगाया। अजित पवार ने हंगामे के बीच भूमि सौदे को रद्द करने की पुष्टि की।