Worship of the frog in the basket top for rain! | पावसासाठी डोक्यावरच्या टोपल्यात केली बेडकाची पूजा !
पावसासाठी डोक्यावरच्या टोपल्यात केली बेडकाची पूजा !

ठळक मुद्देपाऊस पडावा म्हणून देव पाण्यात ठेवून निसर्गदेवतेकडे साकडे घातले जातेगावागावांमध्ये बेडकाची पूजा करुन पावसासाठी प्रार्थनाही केली जातेपकडून आणलेल्या बेडकाची दिवसभर विधिवत पूजा केल्यानंतर सायंकाळी उलट्या परातीत बांधलेल्या बेडकाची सुटका केली

शंभूलिंग आकतनाळ 

चपळगाव : रोहिणीनंतर तीन नक्षत्रे कोरडी गेली... पावसाने पाठ फिरविल्याने साºयांचीच चिंता वाढली... जेव्हा चिंता निर्माण होते, तेव्हा ग्रामीण भागात बेडकाचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. रविवारी सकाळी अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील महिलांनी बेडकाची विधिवत पूजा करुन पाऊस पडावा म्हणून निसर्गदेवतेकडे साकडे घातले.

भटक्या विमुक्त समाजातील महिलाही पावसासाठी प्रार्थना करीत आहेत. केवळ प्रार्थनाच नव्हे तर आपल्या मुलाला पाठवून बेडकाचा शोध घेण्यास सांगितले. जसा बेडकाचा शोध लागला तसं त्या मुलाने त्यास पकडून त्याचे मागील दोन्ही पाय बांधले. पाय बांधलेल्या बेडकाला घरी आणल्यावर त्या महिलांनी उलट्या केलेल्या परातीवर शेतातील काळ्या मातीचा ढिगारा रचून त्याला देवळाच्या शिखरावरील आकार दिला. त्यावर बांधलेल्या बेडकाला ठेवून त्याची आधी पूजा करण्यात आली.

 घराघरांसमोर गृहिणींनी बेडकाची पूजा केली तर पाऊस पडतो, ही श्रद्धा आजही कायम आहे. त्या श्रद्धेपोटी मुलाच्या डोक्यावर परात घेऊन या महिला गावात येताच शेतकºयांसह ग्रामस्थ नव्हे तर महिलांचाही उत्साह अधिकच वाढला. प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या घरासमोर बेडकाची विधिवत पूजा करताना ‘गिरीजी गिरीजी हरद्याडी बा.. हळ्ळा क्वळ्ळा हरद्याडी बा..’ असं गाणं म्हणत परातीतील त्या बेडकावर पाणी शिंपडून अन् तिची ओटी भरण्यात येत होते. वास्तविक यंदा आश्लेषा आणि चित्रा ही दोन नक्षत्रं बेडकावर स्वार झाली आहेत. रविवारी दिवसभर अक्कलकोट तालुक्यातील काही गावांमध्ये बेडकाची पूजा करुन पावसाला साकडे घालताना शेतकरी कुटुंबातील महिला दिसत होत्या. 

यंदा रोहणी नक्षत्रापाठोपाठ मृग, आर्द्रा, पुनर्वसू ही नक्षत्रे कोरडी गेली. समाधानकारक पाऊस न झाल्याने आहे त्या नक्षत्रांमध्ये चांगला अन् समाधानकारक पाऊस व्हावा म्हणून ठिकठिकाणी मंदिरात अभिषेक करण्यात येत आहे. बेडकाची पूजाही महिला करताना दिसताहेत. 

अन् बेडकाची सुटकाही !
- पाऊस पडावा म्हणून देव पाण्यात ठेवून निसर्गदेवतेकडे साकडे घातले जाते. गावागावांमध्ये बेडकाची पूजा करुन पावसासाठी प्रार्थनाही केली जाते. पकडून आणलेल्या बेडकाची दिवसभर विधिवत पूजा केल्यानंतर सायंकाळी उलट्या परातीत बांधलेल्या बेडकाची सुटका केली जाते. 


Web Title: Worship of the frog in the basket top for rain!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.