- सुकृत करंदीकर -
दैव बदलावं म्हणून माणूस देवाकडे धाव घेतो. पण, साक्षात देवाचं आणि त्याच्या देवळाचंही ‘दैव’ एखादी सटवाई गोंदून ठेवत असावी. '' एखाद्या चौकातली उत्सवी मूर्तीसुद्धा नवसाला पावणारी ठरते. तिच्यापुढची गर्दी हटता हटत नाही आणि दुसरीकडे कलाकौशल्यानं नटलेलं, पुरातन राऊळ कळसाविना शतकानुशतकं दुर्लक्षित राहतं. हे देवाचंसुद्धा दैवच म्हणायचं...''
‘कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली?’ ही म्हण शाळेतल्या दिवसांत हिंदीच्या तासाला कधीतरी कानी पडली होती. ‘राजा भोजा’ची ती पहिली ओळख. अर्थात म्हणीपुरतीच. हा राजा कोण, कुठला वगैरे खोलात जाण्याची तेव्हा गरज पडली नव्हती. त्यानंतर कितीतरी वर्षांनी अगदी अलीकडं म्हणजे गेल्याच वर्षी पुन्हा एकदा ‘राजा भोज’ समोर आले. एका अधुºया, भग्न निमित्तानं. कामनिमित्त मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळला जावं लागलं होतं. कामाची लगबग संपल्यावर आसपासचा परिसर न्याहाळण्यासाठी वेळ काढायचा, ही माझी नेहमीची सवय. त्याप्रमाणे भोपाळवासीयांशी बोलत गेलो आणि ‘राजा भोज’ पुन:पुन्हा माझ्यासमोर येत गेले. राजा भोज यांची भेट घडणार होती तर...
अपूर्णतेच्या लोककथाअप्रतिम सौष्ठवाची वळसेदार, ओलेती स्त्री संगमरवरात कोरणाऱ्या शिल्पकाराच्या हातून शेवटचा टाका घालताना त्या शिल्पाच्या चाफेकळी नाकाचा टवका उडावा. करारी योद्ध्याचं पीळदार शरीर रेखाटताना कसबी चित्रकाराला त्या चित्राचे डोळे जिवंत करता येऊ नयेत. आसमंत भारून टाकणाऱ्या पहाडी आवाजाच्या गवयाला शेवटचा सूरच गवसू नये. अशीच काहीशी अपूर्णता भोजपुरातल्या शिवालयात दिसली. या अपूर्णतेची कारणं देणाऱ्या लोककथा भोजपुरात ऐकल्या. कोणी म्हणालं, ‘महाभारतातल्या कुंतीला शिवभक्ती करता यावी म्हणून पांडवांनी वनवासात असताना एका रात्रीत हे मंदिर बांधून काढलं; पण शिखराचं काम सुरू असतानाच सूर्यनारायण उगवले आणि पांडवांनी काम थांबवलं.’ याच बेतवा (वेत्रवती) नदीच्या तीरावर कुंतीनं कर्णाचा त्याग केला, असंही ऐकायला मिळालं.तिसरी कथा राजा भोजाच्या संबंधातली. हा राजा भोज सर्वार्थानं संपन्न होता. कला, स्थापत्य आणि विद्येची त्याला कदर होती. त्यानं स्वत:ही विविध विषयांवरची ११ पुस्तकं लिहून ठेवली आहेत म्हणे. कशाचीच ददात नसलेल्या या राजाच्या आयुष्यात एक मोठं दु:ख होतं. त्यापायी तो रोज झुरत चालला होता. राजा भोजाच्या अंगावर कोड होते. सगळे उपाय करून राजा थकला; पण अंगावरचं कोड काही केल्या गेलं नाही. नितळ सुंदरतेसाठी शेवटचा उपाय म्हणून भोजानं देवाची पायरी गाठली. जगातलं सर्वांत मोठं शिवालय बांधण्याचा संकल्प त्यानं सोडला.वैभवशाली राजानं नेटानं काम सुरू केलं. आख्यायिका अशी सांगितली जाते, की गाभाऱ्यावरच्या कळसाचं काम सुरू असताना छत कोसळलं आणि ते शिवलिंगावर कोसळलं. तब्बल सत्तर टनी वजनाच्या छताच्या अवशेषांमुळे ‘शिवलिंग’चं भंगलं. तेव्हा भंगलेल्या पिंडीतली भेग आजही दिसते. भेगाळलेल्या मूर्त्या-पिंडी हिंदू संस्कृतीत पुजल्या जात नाहीत. अनर्थच घडला म्हणायचा हा. प्रचलित संकेतानुसार हा अपघात अपशकुन ठरला. राजा भोजाचा संकल्प अधुरा राहिला. नितळ त्वचेची त्याची आस पूर्ण होऊ शकली नाही. भोजाला याचा धक्का बसला. त्याच्या आयुष्यात राउळावर कळस चढला नाही. भोजाच्या वंशातल्या पुढच्या राजांनीही या ‘अपशकुनी वास्तू’चं रूपांतर देवळात करण्याचा विचारही केला नाही. जगातली एक भव्य वास्तू पूर्ण होता-होता राहिली.भोज हा परमारवंशीय राजा. ईसवी सन १०१० ते १०५० हा त्याचा काळ होता. मध्य प्रदेशाच्या या भागात १३३९ पर्यंत परमारवंशीयांची सत्ता होती. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर माळवा प्रांत मुस्लिम आक्रमकांच्या ताब्यात गेला. भोजपूरचं अपूर्ण शिवमंदिर विस्मरणात गेलं. भग्नावस्थेकडे झुकलं. राजा बदलला. राजशकट बदललं. दहाव्या शतकातलं दगड सौंदर्य आणखी मुकं झालं.
'दर्दी’ भाविकांचा देव
भोजपुरातल्या शिवलिंगाची कथा ही अशी हुरहुर लावणारी. या तुलनेत उज्जैनमधले देव भलतेच नशिबवान म्हणायचे. क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेलं उज्जैन प्राचीन शहर. कालिदासाच्या मेघदुतात उज्जैनचं वर्णन आहे. विक्रमादित्याचं उज्जैन तसं मंदिरांच गाव. पाहावं तिकडं देवळं. या सर्वात लोकप्रिय आहे ते महाकालेश्र्वराचे देऊळ. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक म्हणून याचे स्थान माहात्म जास्त आहे. साहजिकपणे इथे भाविकांचा अखंड ओघ असतो. या महाकालेश्र्वराला चक्क भांगेचा नैवेद्य दाखवला जातो. देवळाच्या बाहेरच भांग घोटणारी दुकानं थाटली आहेत. महाकालेश्र्वराच्या नावानं भक्त भांगेत ‘तल्लीन’ होतात. या भक्तीरसातलं डुंबणं पुरेसं पडत नसावं म्हणून की काय आणखी ‘दर्दी’ भक्तांसाठी पुढची सोयसुद्धा उज्जैन परिसरातच आहे.
उज्जैनची वेस ओलांडून थोडं बाहेर पडलं की काळभैरवनाथाचं देऊळ समोर येतं. ‘दर्दी’ भाविक याचं दर्शन चुकवूच शकत नाहीत. कालभैरवनाथ म्हणजे योद्धा. दैवांच्या सैन्याचा सेनापती. त्याच्या गाभाऱ्याबाहेर श्वान उभा दाखवलाय. दुष्टांच्या निर्दालनासाठी हिंसा करायला काळभैरवनाथ पुढे-मागे पाहात नाही. रक्ता-मांसाचा चिखल त्याला त्याज्य नाही. या प्रचंड रक्तंबबाळ कार्यात मग्न असताना चित्त विचलित होऊ नये म्हणून काळभैरवनाथाला मद्याचा आधार लागतो. या मद्याची सोय भक्तांनी नाही तर कोणी करायची ? बिचारे भाविक मोठ्या श्रद्धेने काळभैरवनाथाला मद्याचा प्रसाद अर्पण करतात. भाविकाची आर्थिक ताकद जशी त्याप्रमाणे प्रसादाची गुणवत्ता ठरते. देवळाबाहेरच नारळ-फुलांबरोबर देशी-विदेशी, स्कॉच-व्हिस्की वगैरे विकत घेण्याची सोय आहे. पण देवळात गेल्यावर दुजाभाव नाही. भक्ताने आणलेली बाटली पुजारी लगेच फोडतो आणि स्वयंभू काळभैरवनाथाच्या तोंडाला लावतो. भक्त धन्य पावतो. तो आणखी तल्लीन व्हावा म्हणून पुजारी उरलेली अर्धी बाटली त्याला परत करतो. गाभाऱ्याजवळच घमघमाट सुटलेला असतो. मन प्रसन्न...नव्हे गुंग होऊन जाते.
स्वतःचं भाग्य बदलून घेण्यासाठी देवाच्या दारात जाणारा माणूस देवाच्या आवडीनिवडी ठरवतो. स्वतःचे चोचले पुरवण्यासाठी देवाला वेठीला धरतो. एकाच देवाचं महात्म्य, थोरपण त्याच्या स्थानानुसार कसं बदलतं आणि का बदलावं ? भोजपुरच्या शिवालयाचा भाग्योदय कधीच होऊ शकला नाही. स्मशानवैराग्याचा स्वामी असलेल्या महादेवाच्या नशिबी भोजपुरच्या राऊळात स्मशानशांतता येते आणि तोच महादेव उज्जैनमध्ये महाकालेश्र्वर झाला की त्याच्या नावानं भांगेचे प्याले रिते होतात. काळभैरवनाथाला मद्य चाखवले जाते. देवाचंही दैव घडवतो की माणूस.