जागतिक संग्रहालय दिन; मुंबईत येताय तर ही संग्रहालये पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 07:36 AM2018-05-18T07:36:00+5:302018-05-18T07:36:00+5:30

मुंबईत विविध वस्तूसंग्रहालये आहेत, जागतिक संग्रहालय दिनानिमित्त तुम्ही संग्रहालयांना नक्की भेट देऊ शकाल.

World Museum Day; You must visit these Museums | जागतिक संग्रहालय दिन; मुंबईत येताय तर ही संग्रहालये पाहाच

जागतिक संग्रहालय दिन; मुंबईत येताय तर ही संग्रहालये पाहाच

googlenewsNext

मुंबई- 18 मे जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. संग्रहालये ही त्या शहरांचा, गावांचा इतिहास, संस्कृती जपणारी केंद्रंच असतात. विविध विषयांना वाहून घेतलेली संग्रहालयेही आज जगभरात पाहायला मिळतात. सुटीच्या काळामध्ये संग्रहालयांना मोठी गर्दीही होते. मुंबईमधील काही प्रसिद्ध संग्रहालयांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

1) छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय- मुंबईतील हे सर्वात प्रसिद्ध आणि मोठे संग्रहालय आहे. विविध वस्तू आणि ग्रंथ, चित्रे, पुतळे येथे पाहायला मिळतात. मुंबईतील फोर्ट भागामध्ये हे संग्रहालय आहे. या संग्रहालयाची इमारतही विशेष पाहाण्यासारखी आहेत. याला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असे पूर्वी म्हणत असत.

2) भाऊ दाजी लाड संग्रहालय- याला पूर्वी व्हीक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम असे म्हटले जात असे. याची स्थापना 1872 साली ब्रिटिशांनी केली. मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय म्हणून प्रसिद्ध आहे. या संग्रहालयाच्या जवळच राणीची बाग आहे. ब्रिटिशकालीन विविध पुतळे या संग्रहालयाच्या परिसरात ठेवलेले आहेत.

3) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी- 1883मध्ये या संग्रहालयाची स्थापना झाली. जुन्या मुंबई प्रांतापासून आतापर्यंतच्या सर्व दुर्मिळ प्रजातींचे नमुने येथे पाहायला मिळतील.

4) मणिभवन- याला महात्मा गांधीजींचे मुंबईतील स्मारकच म्हणता येईल. महात्मा गांधींच्या पावन स्पर्श झालेल्या या इमारतीला स्वातंत्र्यचळवळीत विशेष महत्त्व होते. असहकार आंदोलन, सत्याग्रह, स्वदेशी चळवळ अशा विविध चळवळी गांधीजींनी येथूनच मांडल्या. मुंबई भेटीत या संग्रहालयाला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.

5) नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट- 1996 साली याची स्थापना झाली. आधुनिक कलाप्रवाहांना उत्तेजन देण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली. दक्षिण मुंबईत कुलाबा येथे याची इमारत आहे.

6) नेहरु प्लॅनेटोरियम- 1977मध्ये या नेहरु प्लॅनेटोरियमची स्थापना झाली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याहस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईत वरळी भागामध्ये असलेल्या घुमटाकार इमारतीची रचना जे.एम. काद्री यांनी केली आहे.

7) सीएसटी हेरिटेज गॅलरी अॅंड रेल्वे म्युझियम- छ. शिवाजी महाराज टर्मिनस येथे हे संग्रहालय असून रेल्वेविषयी सर्व माहिती, फोटो आणि वस्तू येथे पाहायला मिळतील. रेल्वेची मॉडेल्स, जुन्या तिकिटांचे नमुनेही येथे ठेवलेले आहेत.

8)  बेस्ट ट्रान्सपोर्ट संग्रहालय- मुंबईत वाहतुकीचा इतिहास मांडणारं हे संग्रहालय वडाळा येथे आहे. ट्रामच्या काळापासून आदुनिक बसपर्यंतचा काळ तुमच्या डोळ्यांसमोर उभं करणारं हे  संग्रहालय लहान मुलांना नक्की दाखवलं पाहिजे. बेस्ट बसची मॉडेल्स, बसची जुनी तिकिटेही येथए पाहायला मिळतील.

Web Title: World Museum Day; You must visit these Museums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.