कल्याण उपकेंद्राच्या कामाला मुहूर्त मिळेना
By Admin | Updated: August 16, 2014 02:25 IST2014-08-16T02:25:53+5:302014-08-16T02:25:53+5:30
१५ आॅगस्टला उपकेंद्राच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आले होते

कल्याण उपकेंद्राच्या कामाला मुहूर्त मिळेना
भार्इंदर : १५ आॅगस्टला उपकेंद्राच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आले होते. परंतु या कामाला सुरुवात झाली नसल्याच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते रवींद्र पाटील यांनी शुक्रवारी उपोषण छेडले होते. यावर विद्यापीठ प्रशासनाकडून लवकरच काम सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले असून काम सुरू न झाल्यास भूखंड परत घेऊ, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली आहे.
कल्याणसह उल्हासनगर, अंबरनाथ, कसारा, कर्जत, टिटवाळा येथून दररोज लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठात जातात. कल्याणमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र झाले तर विद्यार्थ्यांच्या खर्चात आणि वेळेतही बचत होईल, या उद्देशाने येथील गांधारी परिसरातील भूखंडावर उपकेंद्राचे भूमिपूजन झाले. परंतु अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही या उपकेंद्राच्या कामाला सुरुवात झालेली नाही. काम त्वरित सुरू करावे, यासाठी विद्यार्थी संघटनांसह विविध राजकीय पक्षांनी अनेक आंदोलने छेडली आहेत. दरम्यान, शिवसेनेचे पालिका गटनेते पाटील यांनीही मध्यंतरी उपोषणाचा इशारा दिला होता.
यावर १५ आॅगस्टला या कामाला सुरुवात करू, असे आश्वासन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी दिले होते. याउपरही काम सुरू न झाल्याने अखेर पाटील यांनी उपकेंद्राच्या ठिकाणी शुक्रवारी उपोषण छेडले. (प्रतिनिधी)