हिलटॉप येथे महिलांना स्वयंरोजगाराचे धडे

By Admin | Updated: August 18, 2014 00:32 IST2014-08-18T00:32:16+5:302014-08-18T00:32:16+5:30

हिलटॉप येथील होलीफोर्ट पब्लिक स्कूलमध्ये महिलांकरीता स्वयंरोजगार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून नगरसेवक प्रफुल्ल गुडधे उपस्थित होते.

Women's self-employment lessons at Hilltop | हिलटॉप येथे महिलांना स्वयंरोजगाराचे धडे

हिलटॉप येथे महिलांना स्वयंरोजगाराचे धडे

नागपूर : हिलटॉप येथील होलीफोर्ट पब्लिक स्कूलमध्ये महिलांकरीता स्वयंरोजगार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून नगरसेवक प्रफुल्ल गुडधे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मनपाच्या समाजकल्याण अधिकारी सुधा इरसकर, मिटकॉनचे प्रबंधक चौधरी, जनसंग्रामचे सचिव नरेंद्र जिचकार, जयदीप दास आणि ग्राम मार्टचे मार्केटिंग प्रमुख विद्याधर मिरजकर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन परिणय फुके यांनी केले होते.
हा कार्यक्रम विशेष म्हणजे शहरातील महिला बचत गटाकरिता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश बचत गटांनी स्वयंरोजगार करावा, असा होता. कार्यशाळेत परिणय फुके यांनी, ग्राम मार्ट बचत गटाकरिता काय करणार आहे, याची संपूर्ण माहिती दिली. ग्राम मार्ट ही संस्था ग्रामीण भागातील बचत गटाकरिता काम करते. परंतू नगरसेवक परिणय फुके यांनी शहरातील महिला बचतगटांकरिता काही करावे, असा आग्रह केला. आपल्याला कुठलीही मदत करण्यास आम्ही तयार आहोत, असा विश्वास त्यांनी दिला. त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव व त्यांनी दिलेल्या विश्वासामुळे आम्ही शहरातील महिला बचत गटांना मदत करणार असल्याचे विद्याधर मिरजकर यांनी यावेळी सांगितले. ग्राम मार्ट ही बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देते.
मिटकॉनचे चौधरी यांनी मिटकॉन बचत गटांना कशी मदत करेल याबाबत सांगितले. सुधा इरसकर यांनी बचतगटासाठी मनपाच्या काय योजना असतात याची माहिती दिली. याप्रसंगी बोलताना प्रफुल्ल गुडधे म्हणाले की, हा उपक्रम अगदी सरळ आणि सोपा आहे. या संधीचे सोने करण्याची वेळ आपल्या दारापर्यंत आली आहे. याचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. या कार्यशाळेला शहरातील विविध भागातून महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिणिता फुके, नितीन फुके, आशिष मनकवडे, कमलेश चाडोकर, दीपक सावळे, स्वप्निल मेंढे, मनीष राऊत, मंगेश तागडे, प्रितम राऊत, प्रदीप वाकोडे, चंचल नमिसडे आदींचा सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन सचिन डोये यांनी केले. आभार जयदीप दास यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Women's self-employment lessons at Hilltop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.