महिलांनी तोकड्या कपड्यात उत्तेजक नाचणे ‘अश्लील’ नाही; मुंबई हायकोर्टाने केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 14:48 IST2023-10-14T14:46:12+5:302023-10-14T14:48:50+5:30
प्रेक्षक या महिलांवर डमी चलनी नोटांचा वर्षाव करत होते.

महिलांनी तोकड्या कपड्यात उत्तेजक नाचणे ‘अश्लील’ नाही; मुंबई हायकोर्टाने केले स्पष्ट
डॉ. खुशालचंद बाहेती
मुंबई : कमी कपड्यांमध्ये प्रक्षोभकपणे नाचणाऱ्या किंवा हातवारे करणाऱ्या स्त्रिया हे असे ‘अश्लील’ किंवा ‘अनैतिक’ कृत्य करत नाहीत की, ज्यामुळे एखाद्याला त्रास होईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
३० मे २०२३ रोजी टायगर पॅराडाइज रिसॉर्ट आणि वॉटर पार्क, तिरखुरा (जि. नागपूर) येथे पोलिसांनी छापा टाकला. शॉर्ट स्कर्ट आणि कमी कपडे घातलेल्या सहा महिला अश्लील नृत्य करत होत्या. प्रेक्षक या महिलांवर डमी चलनी नोटांचा वर्षाव करत होते.
पोलिसांनी प्रेक्षक आणि महिलांविरोधात एफआयआर दाखल केला. एफआयआरला हायकोर्टात आव्हान देण्यात आले. आयपीसीचे कलम २९४ चा गुन्हा घडलेला नाही. नाचण्याचा कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी नव्हता. तो विशिष्ट ग्राहकांसाठी राखीव असलेल्या बँक्वेट हॉलमध्ये होते. त्यामुळे कोणालाही त्रास झाला नाही. केवळ एका पोलिस अधिकाऱ्याला ते अश्लील वाटले म्हणून तो गुन्हा ठरत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.
ज्या हॉलमध्ये नृत्य सादर करण्यात आले ते सार्वजनिक ठिकाण ठरते; परंतु नृत्य अश्लील किंवा कोणाला त्रास देणारे नव्हते, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने एफआयआर रद्द केला.
लहान स्कर्ट घातलेल्या महिला नृत्यांगनाचे उत्तेजक रीतीने नाचणे किंवा त्यांचे हातवारे करणे याला पोलिस अधिकारी अश्लील मानतात. यामुळे जनतेला त्रास होऊ शकतो मानतात, म्हणून याला अश्लील म्हणता येणार नाही.
- भारतीय समाजात नैतिकतेचे सामान्य नियम प्रचलित आहेत, हे मान्य आहे.
- सध्याच्या काळात स्त्रिया असे कपडे, पोहण्याचा पोशाख किंवा इतर तोकडे पोशाख परिधान करू शकतात हे अगदी सामान्य आणि स्वीकार्य आहे.
- सेन्सार प्रमाणित चित्रपट, सार्वजनिकरीत्या आयोजित सौंदर्य स्पर्धांमध्ये अशा प्रकारच्या पेहरावाचे आपण अनेकदा साक्षीदार असतो, हे पाहून प्रेक्षकांना चीड येत नाही.
-न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मीकी मिनेझिस
(मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ)