कुटुंब कल्याण नसबंदी करण्यात महिला आघाडीवर !
By Admin | Updated: August 17, 2016 18:36 IST2016-08-17T18:36:14+5:302016-08-17T18:36:14+5:30
नसबंदी आणि दोन अपत्यांच्या जन्मात अंतर राखण्यासाठी शासनाने महिला व पुरुष दोघांसाठी कुटुंब कल्याण नसबंदी कार्यक्रम हाती घेतला.

कुटुंब कल्याण नसबंदी करण्यात महिला आघाडीवर !
नितीन गव्हाळे/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 17 - लोकसंख्या स्थिर करणे, नसबंदी आणि दोन अपत्यांच्या जन्मात अंतर राखण्यासाठी शासनाने महिला व पुरुष दोघांसाठी कुटुंब कल्याण नसबंदी कार्यक्रम हाती घेतला. शस्त्रक्रिया करणाऱ्या महिला व पुरुषांना ६00 व २५0 रुपये अनुदान दिले जाते; कुटुंब कल्याण नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्यात महिला आघाडीवर आहेत. २0१५ व १६ या वर्षामध्ये राज्यात ३ लाख १८ हजार ८00 महिलांनी कुटुंब कल्याण नियोजनाची शस्त्रक्रिया केली. परंतु याबाबत पुरुषांमध्ये प्रचंड उदासीनता आहे. १ लाख १0 हजारांचं पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले.
देशातील वाढत्या लोकसंख्येस आळा बसावा आणि मुलाच्या आग्रहापोटी गर्भातील मुलींच्या हत्या होऊ नये, या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया योजना सुरू केली; परंतु या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद पुरुषांकडून मिळत नाही. कुटुंब नियोजनाबाबत महिला मात्र सजग असल्याचे दिसून येते. दोनपेक्षा अधिक मुले असू नयेत, असा महिलांचा आग्रह असतो; परंतु पुरुष त्यासाठी फारसे गंभीर नसतात. मुलाच्या आग्रहापोटी घरातील पाळणा लांबत जातो. मुलगा काय नि मुलगी काय, दोघेही सारखेच; परंतु अनेक कुटुंबांना वंशाचा दिवा हवा असतो. त्याचाही परिणाम कुटुंब नियोजनावर होतो. एका मुला, मुलीवर किंवा दोन मुला, मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी, यासाठी शासनाची योजना आहे. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमातीमधील महिला, पुरुषांना अनुक्रमे ६00 व २५0 रुपयांचा धनादेश देण्यात येतो; परंतु ही रक्कम अल्पशी असल्यामुळे अनेक महिला, पुरुष त्याकडे पाठ फिरवितात. पाहिजे त्या प्रमाणात कुटुंब कल्याण योजनेस प्रतिसाद मिळत नाही.
कुटूंब कल्याणवर १४९ कोटींचा खर्च
कुटूंब कल्याण नसबंदी कार्यक्रमांवर दरवर्षी शासनाच्या आरोग्य विभागाकडून कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात येतो. परंतु पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. गत पाच वर्षांमध्ये आरोग्य विभागाने कुटूंब कल्याण नसबंदी कार्यक्रमावर १४९ कोटी ८८ लाख रूपये खर्च केला. यावर्षी सुद्धा १८ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. कुटुंब कल्याण नसबंदी करण्यासाठी महिलेला आठवडाभर रुग्णालयात भरती व्हावे लागते. शस्त्रक्रिया केल्यानंतर पुन्हा टाके काढण्यासाठी रुग्णालयात यावे लागते. त्यातुलनेत पुरुषांना त्रास कमी आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर पुरूष अर्ध्या तासात घरी जाऊ शकतात. असे असतानाही पुरुषांमध्ये कुटुंब नियोजनाविषयी प्रचंड उदासीनता आहे.
-डॉ. अविनाश लव्हाळे, आरोग्य उपसंचालक