मारहाणीत मृत समजून फेकून दिलेली महिला जीवंत
By Admin | Updated: August 1, 2016 20:53 IST2016-08-01T20:53:59+5:302016-08-01T20:53:59+5:30
पतीने जबर मारहाण केल्यानंतर पत्नी मयत झाल्याचा समज करुन तिला एका शेतात फेकून देण्यात आले. रात्रभर शेतात पडून असलेली महिला जीवंत असल्याचे निदर्शनास

मारहाणीत मृत समजून फेकून दिलेली महिला जीवंत
ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. १ - पतीने जबर मारहाण केल्यानंतर पत्नी मयत झाल्याचा समज करुन तिला एका शेतात फेकून देण्यात आले. रात्रभर शेतात पडून असलेली महिला जीवंत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिस व गावकऱ्यांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.
जिंतूर तालुक्यातील चारठाणा शिवारात रविवारी रात्री पाऊस झाल्याने शेतात चिखल झाला होता. सोमवारी सकाळी सकाळी ६ च्या सुमारास रस्त्यावरुन जात असताना एका शेतकऱ्यास चारठाणा शिवारात प्रकाश देशमुख यांच्या शेतात सविता संजय गिरी (२३) ही महिला जखमी अवस्थेत पडली असल्याचे दिसून आले. त्यानंतर ही माहिती चारठाणा पोलिसांना देण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक रत्नाकर घोळवे, बीट जमादार एस.आर.वायाळ, पोलिस नाईक मंचक जाधव, पोकॉ.बी.एस.इघारे, प्रकाश देशमुख आदींनी घटनास्थळी जावून जखमी महिलेला बाहेर काढले. तेव्हा ती शुद्धीवर होती. चारठाणा पोलिसांनी आपल्या वाहनातून तिला जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने प्रथमोपचार करुन तिला परभणी येथे हलविले. सध्या परभणीतील एका खाजगी रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, सदर महिला ही २३ वर्षाची असून तिचे मूळगाव परभणी तालुक्यातील सिंगणापूर हे आहे. नगर जिल्ह्यातील संजय उत्तम गिरी याच्याशी तिचा विवाह झाला होता. संजय गिरी याने सविता हिला लोखंडी रॉडने व गजाने मारहाण केली. त्यानंतर श्रीरामपूर येथून एका वाहनाने ३१ जुलैच्या मध्यरात्री तिला घेऊन तो निघाला. पत्नीचा मृत्यू झाल्याची शंका त्याला आल्याने त्याने चारठाणा शिवारात सविता हिला फेकून दिले. रात्रीपासून ती या शेतात पडून होती. १ जुलै रोजी चारठाणा ग्रामस्थ व पोलिसांनी सविता हिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पती पोलिस ठाण्यात
इकडे चारठाणा पोलिस आणि ग्रामस्थांनी या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. तर दुसरीकडे सदर महिलेचा पती संजय गिरी हा औरंगाबाद येथील पोलिस ठाण्यात स्वत:हून दाखल झाला. त्या ठिकाणी त्याने पोलिसांना केलेल्या कृत्याची माहिती दिली. चारठाणा परिसरात पत्नीला फेकल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर औरंगाबाद पोलिस ठाण्यातून चारठाणा पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली. दरम्यान, चारठाणा पोलिस ठाण्याचे जमादार एस.आर.वायाळ, बी.एस.इघारे हे औरंगाबाद येथे रवाना झाले असून आरोपी संजय गिरी यास चारठाणा पोलिस ठाण्यात आणले जाणार असल्याची माहिती मिळाली.