दुष्काळ, मराठा आरक्षणावरून हिवाळी अधिवेशन तापणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 08:50 IST2023-12-07T08:50:16+5:302023-12-07T08:50:37+5:30
सरकारला अयशस्वी आणि असंवेदनशील म्हणत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला

दुष्काळ, मराठा आरक्षणावरून हिवाळी अधिवेशन तापणार
योगेश पांडे
नागपूर : तीन राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या जनादेशानंतर आता नागपुरात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून दुष्काळ, मराठा आरक्षण व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याची रणनीती तयार करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी केलेल्या आरोपांवर आकडेवारीसह उत्तरे देत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी ते विरोधकांचा सामना करण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले.
सरकारला अयशस्वी आणि असंवेदनशील म्हणत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला. दुसरीकडे विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करतानाच यासंदर्भात विरोधकांनी दिलेल्या पत्रावरच सरकारने प्रश्न उपस्थित केले. एकूणच अवघ्या दोन आठवड्यांच्या अधिवेशनातील पहिले दोन दिवस गोंधळातच जाणार असल्याची चिन्हे आहेत.