मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:54 IST2025-12-10T12:54:20+5:302025-12-10T12:54:51+5:30
२०१० मध्ये तिथे एका समाजाची लोकसंख्या २० टक्के होती, ती आता ३३ टक्क्यांपर्यंत आली आहे. ते कुठून आले. २ एकर सरकारी जमिनीवर त्यांनी कब्जा केला असं मंत्री लोढा यांनी म्हटलं.

मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
नागपूर - मालाड मालवणी येथील प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून स्थानिक आमदार अस्लम शेख आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचे पडसाद आज विधानसभेत पाहायला मिळाले. मालाडमधील एका शाळेच्या खासगीकरणावरून अस्लम शेख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून अस्लम शेख आणि मंगलप्रभात लोढा यांच्यात खडाजंगी झाल्याचे दिसून आले.
आमदार अस्लम शेख म्हणाले की, मुंबई महापालिकेने दत्तक शाळा धोरण काढले होते. माझ्या मतदारसंघात एक शाळा व्यवस्थित चालत होती, त्यात शिक्षक होते, मुलेही होती. मात्र इथल्या शिक्षकांना तिथून काढण्यात आले. या शाळेत सीबीएसईचे वर्ग चालत असतात. या शाळेत १० वी आणि १२ वीचे शिक्षक शिकवत आहेत हे तिथल्या पालकांना कळले तेव्हा त्यांनी आंदोलन केले होते. मात्र शाळेत फी आकारली जाणार असा पालकांचा गैरसमज झाला होता. परंतु या शाळेत कुठलीही फी आकारली जात नाही. जेव्हा पालकमंत्री लोढा याठिकाणी आंदोलनस्थळी गेले त्यांनी पालकांची समजूत काढली आणि त्यांचा गैरसमज दूर झाला असं उत्तर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. मात्र राज्यमंत्री चुकीचे उत्तर देत आहेत. ज्या शाळेबद्दल त्या सांगत आहेत ती दुसरी शाळा आहे असं शेख यांनी म्हटलं.
तर या विषयावर मी सुरुवातीपासून पालकमंत्री म्हणून सहभागी आहे. पालकांचे जे आंदोलन झाले त्यावेळी पालकमंत्री म्हणून मी तिथे पोहचलो होते. महापालिकेच्या खासगीकरणाचा निर्णय महापालिकेने २००७ साली घेतला होता. त्यानंतर दत्तक पॉलिसी पुढे आली. त्यात ज्या खासगी संस्थांनी पुढाकार घेतला त्यांना ३६ शाळा चालवायला दिल्या. मालवणीतील ही शाळा फज्लानी ट्रस्टला चालवायला दिली होती. त्यांच्याकडे एक नव्हे सहा शाळा चालवायला दिल्या होत्या. मात्र या ट्रस्टने मार्च एप्रिल महिन्यात मुलांच्या परीक्षा होणार होत्या त्याआधी फेब्रुवारी महिन्यात महापालिकेला पत्रक पाठवून आम्ही ही शाळा चालवणार नाही असं कळवले. त्यानंतर प्रयास फाऊंडेशनकडे ही शाळा गेली अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहात दिली. मात्र त्याचवेळी अस्लम शेख यांनी आक्षेप घेतला असता लोढा आणि शेख यांच्यात खडाजंगी झाली.
लोढा-शेख यांच्यात शाब्दिक चकमक
तुमच्या प्रश्नावर मी बोलतोय, मला उत्तर देऊ द्या. यांना फज्लानी चालतो, प्रयास चालत नाही. मालवणीत काय चाललंय हे सगळ्यांना माहिती आहे. अस्लम शेख यांच्या प्रश्नाचा हेतू काय, त्यांना फज्लानी चालेल, प्रयास नको. २०१० मध्ये तिथे एका समाजाची लोकसंख्या २० टक्के होती, ती आता ३३ टक्क्यांपर्यंत आली आहे. ते कुठून आले. २ एकर सरकारी जमिनीवर त्यांनी कब्जा केला. प्रयास फाऊंडेशनने शाळा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल सुधारला. मी पालकांच्या आंदोलनात पालकमंत्री म्हणून गेलो. तिथे गेल्यानंतर अस्लम शेख यांनी आंदोलन केले. तिथे पोलिसांनी कारवाई केली. माझ्याशिवाय इथे कुणी येऊ शकत नाही. सरकार इथे चालणार नाही. फक्त अस्लम शेख चालेल. माझ्याकडे व्हिडिओ आहेत. पालकमंत्री म्हणून मी तिथे गेलो, त्यात माझी चूक काय होती? मला धमकी देण्यात आली असा आरोप मंत्री लोढा यांनी केला. त्यावर माझा प्रश्न त्या शाळेत ज्या शिक्षकांची भरती केली ती कायद्याने केली आहे का, टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले ते शिक्षक आहेत का असा होता त्यावर सरकारने उत्तर द्यावे असं आमदार शेख यांनी म्हटलं.