आंदोलनाची हवा, गेली कोण्या गावा?
By Admin | Updated: March 19, 2015 23:51 IST2015-03-19T22:02:10+5:302015-03-19T23:51:23+5:30
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प : शिवसेनेतील एक गट आंदोलनापासून पूर्णत: अलिप्तच...

आंदोलनाची हवा, गेली कोण्या गावा?
रत्नागिरी : शिवसेनेकडून अन् जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेकडूनही आठवडाभर जैतापूर प्रकल्पविषयक आंदोलनाची जोरदार तयारी सुरू होती. शिवसेनेच्या गनिमी काव्याचाही वारा वाहत होता. मात्र, शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली आज गुरूवारी झालेल्या आंदोलनाची हवा, गेली कोण्या गावा, अशी स्थिती कुवारबावमध्ये दिसून येत होती. या आंदोलनात शिवसैनिकांपेक्षा प्रकल्पग्रस्तच अधिक असल्याची चर्चा होती. या आंदोलनात शिवसेनेतील रत्नागिरी तालुक्यातील एक गट पूर्णत: अलिप्तच असल्याचे चित्र होते.शिवसेना नेतृत्त्व करीत असलेल्या कोणत्याही आंदोलनाचे नियोजन अत्यंत चोख असते, असा आजवरचा अनुभव आहे. शिवसैनिक तळमळीने आंदोलनात सहभागी होतात हे नेहमीचे चित्र आहे. मात्र, आज कुुवारबाव येथे झालेल्या आंदोलनात असे चित्र दिसून आले नाही. सायंकाळी चार वाजल्यानंतर कुवारबावमध्ये आंदोलनाच्या तुरळक खुणा दिसून येत होत्या. रस्त्यावरील दुभाजकरुपी पिंपेही गायब झाली होती. पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात हटवण्यात आला होता. वातावरण सामान्य बनले होते. या आंदोलनात नेत्यांसह केवळ ६१२ आंदोलक सहभागी झाले, हे प्रतिबंधात्मक कारवाईनंतर उघड झाले. आंदोलनाची हवा ज्याप्रकारे करण्यात आली होती, ते पाहता या आंदोलनात चार ते पाच हजार लोक सहभागी होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, तो अंदाज फोल ठरला आहे. ती हवाच ठरली, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील हे आंदोलन होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत येथील सेनेचा उमेदवार ३२ हजार मताधिक्याने विजयी झाला. तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी तालुक्यात सेनेची संघटनात्मक बांधणीही चांगली केली आहे. असे असताना या आंदोलनातील कार्यकर्त्यांची कमी संख्या ही आंदोलनात सहभागी झालेल्या प्रकल्पग्रस्त बाया बापड्यांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. त्यामुळे ही स्थिती नेमकी का निर्माण झाली, आंदोलनाबाबतचे नियोजन चुकले कसे आणि कुणामुळे? शिवसैनिक या आंदोलनापासून दूर का राहिले, त्यामागे याबाबत शिवसेनेतील नेते व कार्यकर्ते आत्मपरिक्षण व आत्मचिंतन करणार की नाही, हाच खरा प्रश्न आहे. कुवारबाव येथे झालेल्या आजच्या जैतापूर प्रकल्पविरोधी आंदोलनात जैतापूरमधील ज्यांना या प्रकल्पाची झळ बसणार आहे, असे लोक सहभागी झाले होते. या आंदोलनासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवनाजवळ शिवसैनिक व प्रकल्पग्रस्त यांची मोठी गर्दी दिसून येत होती. किमान दीड हजार लोक तेथे उपस्थित होते. मात्र पावणेबारा वाजता मोर्चा तेथून कुवारबावकडे निघाला अन् स्थानिक शिवसैनिकांची संख्या कमी झाली.
मधल्यामधे अनेकांनी मोर्चातून काढता पाय घेतला. त्यामुळे मोर्चा कुवारबावपर्यंत पोहोचला तेव्हा एक तृतियांश लोक मोर्चातून बाहेर पडल्याचे दिसूून येत होते. जेव्हा कुवारबाव येथील सेना शाखेसमोर रस्त्यावर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले तेव्हाही मोर्चातील काहीजण मोबाईलवर फोटो काढण्याच्या निमित्ताने बाहेर आले व तेथूनच निसटले अशीही चर्चा आहे. त्यामुळेच तेथे आंदोलकांच्या दुप्पट पोलीस, अशी स्थिती निर्माण झाली.
या आंदोलनात सहभागी झालेल्या काही प्रकल्पग्रस्त महिलांनी सांगितले की, या आंदोलनात तर शिवसैनिक कमीच आहेत. आम्ही प्रकल्पग्रस्तच अधिक आहोत. हे काही बरोबर घडले नाही. आम्हाला हा प्रकल्प नको आहे. पण या मोर्चामुुळे आमचा रोजगार बुडणार असल्याची प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्तांनी दिली. मच्छिमार नेते अमजद बोरकर यांच्यामुळे या आंदोलनात मच्छीमार मात्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
जोर ओसरला?
गुरुवारी झालेल्या भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्यांमुळेही कुवारबावमधील प्रकल्पविरोधी आंदोलनातील सहभाग कमी होता, अशी चर्चा सुरू होती. मात्र, त्यात फारसे तत्थ्य नव्हते. कारण सामन्याची धावसंख्या क्षणाक्षणाला मोबाइलवर कळत होती. परंतु, पोलिसांना मात्र या सामन्याचा आनंद घेता येत नव्हता. त्यामुळे आंदोलनादरम्यानही पोलीस स्कोअरची चौकशी करीत होते.