नाशिकमध्ये कुंभमेळा होणार की नाही?
By Admin | Updated: July 15, 2014 03:01 IST2014-07-15T03:01:10+5:302014-07-15T03:01:10+5:30
अवघ्या दहा महिन्यांवर सिंहस्थ कुंभमेळा आला असताना त्याची कोणतीही कामे एकीकडे झालेली नाही तर दुसरीकडे प्रमुख महंतांना काय कामे सुरू आहेत,

नाशिकमध्ये कुंभमेळा होणार की नाही?
नाशिक : अवघ्या दहा महिन्यांवर सिंहस्थ कुंभमेळा आला असताना त्याची कोणतीही कामे एकीकडे झालेली नाही तर दुसरीकडे प्रमुख महंतांना काय कामे सुरू आहेत, याचीच माहिती नसल्याने गोंधळाची स्थिती आहे. परिणामी कुंभमेळा भरणार की नाही, याचीच आता शाश्वती राहिलेली नाही, असे मत महंत ग्यानदास महाराज यांनी व्यक्तकेले.
नाशिकमध्ये शैव आणि वैष्णवांसाठी वेगळी व्यवस्था असते. २००२-०३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यास सुमारे दीड लाख साधू-महंत आले होते. त्यावेळी सुमारे चारशे खालसे होते. आता तीन ते चार लाख साधू असून, खालशांची संख्या ७०० वर गेली आहे. मात्र त्यांच्या व्यवस्थेची माहिती महंतांना अजून मिळालेली नाही.
गेल्या वेळी कुंभमेळ्यासाठी नाशिकला आल्यानंतर सुविधांची वानवी होती. त्यामुळे मी दोन दिवस कोणाशी बोललो नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांना जवळपास येऊही दिले नाही. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधला आणि सुविधा दिल्या होत्या. यंदाची परिस्थती तशीच आहे, अशी खंत ग्यानदास महाराजांनी व्यक्त केली.
साधुग्रामसाठी जागाच ताब्यात मिळालेली नाही. त्यातच प्रस्तावित जागा तपोवनापासून दूर अंतरावर असून, दर कुंभमेळ्याला साधू-महंतांना एक- दीड किलो मीटर दूर नेले जात आहे. त्यामुळे साधू-महंतांची गैरसोय होते. प्रस्तावित साधुग्रामच्या जागेत, तर गोदा-कपिला संगमाच्या पलीकडील जागा घेतली जात आहे, संगमापलीकडे साधू-महंत आणि संन्यासी जात नाही, मग ही जागा घेऊन काय उपयोग, असा सवाल त्यांनी केला. मुळात साधू-महंतांचा हा उत्सव असताना त्यांना विश्वासात न घेता कामे होणार असतील तर कुंभमेळ्याचा काय उपयोग? जिल्हा प्रशासन एवढे साधे सौजन्य दाखवत नसल्यानेच दहा महिन्यांवर आलेला कुंभमेळा होईल याची शाश्वती नसल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)