राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 14:36 IST2025-10-31T14:36:27+5:302025-10-31T14:36:50+5:30
थोड्याच दिवसांमध्ये मनसे पूर्णपणे उबाठात विलीन होतेय याचा पुरावा समोर आला आहे असं शिंदेसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी म्हटलं.

राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर उभं राहणाऱ्या नमो पर्यटन केंद्राला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार विरोध केला. यावेळी राज ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत मला मुख्यमंत्री करा, म्हणून किती लाचारी करणार असा सवाल विचारला. त्यावर आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारले, मनसे आता उबाठामध्ये विलीन होणार आहे असा दावा शिंदेसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केला आहे.
याबाबत राजू वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, मनसे उबाठात विलीन होण्याची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. थोड्याच दिवसांमध्ये मनसे पूर्णपणे उबाठात विलीन होतेय याचा पुरावा समोर आला आहे. सामना वृत्तपत्रात एक बातमी छापून आली आहे. त्यात उद्धव ठाकरेंची आसनव्यवस्था आणि राज ठाकरे एखाद्या कार्यकर्त्यासारखे कुठे बसलेत ते पाहा. त्याचा अर्थ मनसेने नेतृत्व स्वीकारले आहे असा दावा त्यांनी केला.
तर आता मनसेने थांबले पाहिजे, त्यांनी उबाठात सामील झालं पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचं काम अनेकजण करतात त्यात आणखी एक भर पडली आम्हाला फरक पडत नाही. शिंदे यांनी जी हिंमत दाखवली ती महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यांच्या ताकदीचा आम्हाला गर्व नाही तर अभिमान आहे असा टोला मंत्री संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांना लगावला.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
आपला स्वाभिमान किती गहाण टाकायचा याला काही मर्यादा? मनात यांच्या विचार येतो कसा? मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त पर्यटन विभाग काही ठिकाणे शोधणार आणि त्यांचे नाव असणार नमो पर्यटन केंद्र", असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला. मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं हे वरती पंतप्रधानांदेखील माहिती नसेल की, खाली काय चाटूगिरी चालू आहे. हे कशातून येतं, सत्ता डोक्यात गेली की. आम्ही वाटेल ते करू. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असूदे नाहीतर आणखी काही असूदे. मला मुख्यमंत्री पद मिळाले पाहिजे. मला सत्ता मिळाली पाहिजे" असे म्हणत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले होते.