खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
By अतुल कुलकर्णी | Updated: December 19, 2025 07:48 IST2025-12-19T07:48:05+5:302025-12-19T07:48:37+5:30
नव्या विमानतळामुळे फरक पडणार का?

खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
'एनएमआयए'चे फायदे/अपेक्षा : भाग ५
अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विमानतळावर खासगी विमानांना स्लॉट न मिळणे, पार्किंगसाठीची जागा उपलब्ध न होणे आणि जागा मिळालीच तरी त्याचे वाढते भाडे यामुळे मुंबईत नव्याने खासगी विमानांचा व्यवसाय येणे जवळपास बंद झाले आहे. त्याउलट मिळणाऱ्या सोयींमुळे दिल्ली, गुजरातसह इतर ठिकाणी हा व्यवहार खासगी विमान वाहतूक व्यवसाय वाढीला लागला आहे.
देशात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ एकाच शहरात असणारे मुंबई एकमेव शहर आहे. इथे खासगी विमान वाहतुकीचा व्यवसाय वाढवण्यासाठी सर्व पूरक गोष्टी आहेत. मात्र, पार्किंग आणि विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे
कठीण होत असल्यामुळे नव्या कंपन्यांना अनुकूल वातावरण उरले नसल्याची भावना आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. वर्षानुवर्षांतून इथे एक इकोसिस्टीम तयार झाली आहे. त्यामुळे उद्योगपती, कार्पोरेट कार्यालये यांच्या प्रमुखांना मुंबईतून जाणे-येणे सोयीचे आहे. मात्र, हीच सोय दिवसेंदिवस महागडी होत आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीसोबतच मोठे व्यावसायिक, उद्योजक अन्य राज्यात जाऊ लागले तर त्याचा परिणाम मुंबईच्या आर्थिक सत्ता केंद्रावर होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
व्यावसायिक तत्त्वावर खासगी वापरासाठी उपलब्ध विमाने / हेलिकॉप्टर
राज्य एकूण कंपन्या विमाने हेलिकॉप्टर
दिल्ली ३९ ८७ ५८
महाराष्ट्र २८ २५ २१
गुजरात १३ ३२ २
'डीजीसीए' नुसार देशात १३३ खासगी विमान कंपन्यांकडे २१४ खासगी विमाने व २२१ हेलिकॉप्टर आहेत. त्याशिवाय ११ हॉट एअर बलून आहेत. यापैकी महाराष्ट्रात खासगी विमानाद्वारे व्यवसाय करणाऱ्या मोजक्याच कंपन्या आहेत. भारतात जवळपास ३५० विमानतळे आहेत. याउलट अमेरिकेत सुमारे ४२ हजार खासगी विमाने असून, १५ ते १८ हजार खासगी विमानतळे आहेत. अमेरिका श्रीमंत आहे म्हणून त्यांच्याकडे मोठे हायवे नसून, त्यांच्याकडे मोठे हायवे आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे, असे अमेरिकेबद्दल सांगितले जाते. हाच संदर्भ घेतला तर कुठलेही विमानतळ हे राज्याच्या प्रगतीचे, उद्योगाच्या विकासाचे माध्यम म्हणून त्याकडे बघितले पाहिजे. त्यासाठी
खासगी उद्योजक, कार्पोरेट कंपन्या यांना लागणारी इकोसिस्टीम उपलब्ध करून दिली तर ती राज्ये विकासात पुढे जातात. आपल्याकडे नेमके हेच क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होत चालले आहे.
ज्या मुंबईत खासगी विमानांच्या व्यवसायाची सुरुवात झाली, त्याच मुंबईत आता खासगी विमानांना येण्याजाण्यासाठी वेळ मागितली तर पहिले प्राधान्य प्रवासी विमान वाहतुकीला दिले जाते. मुंबई विमानतळावर स्लॉट मिळत नाहीत या कारणामुळे खासगी विमान वाहतुकीचा व्यवसाय आता दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू येथे जात आहे. (सोबतच्या चार्टवरून तपशील लक्षात येईल.) मुंबई विमानतळावर पार्किंग आणि येण्या-जाण्याचे स्लॉट मिळत नाहीत.
पुण्याचे विमानतळ डिफेन्सचे आहे, म्हणून तिथे खासगी विमान वाहतूक करणाऱ्यांना जागा मिळत नाही. मध्यंतरी नागपूर मिहानकडे या व्यावसायिकांना वळविण्याचे प्रयत्न झाले; पण त्याला फारसे यश मिळाले नाही. ज्या शहरात उद्योजकांना यावे वाटते तेथे सुविधा मिळायला हव्यात. मुंबई, पुण्यातून व्यवसाय करण्याची इच्छा असताना इथे जर सुविधा मिळत नसतील तर नाइलाजाने अनेकांनी हा व्यवसाय अन्य राज्यांमध्ये नेणे सुरू केल्याचे या क्षेत्रातील उद्योजक सांगतात.
नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईत खासगी विमान आले की त्यांना पाकिंगसाठी नवी मुंबईत जायला सांगितले जाईल अशी चर्चा आहे. तसे झाले तर प्रवाशांना घेण्यासाठी पुन्हा मुंबई विमानतळावर यावे लागेल. त्यामुळे नवी मुंबई आणि मुंबई विमानतळावर त्यांना उतरण्याचे, उडण्याचे व पार्किंगचे अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. परिणामी असा प्रवास करणाऱ्यांचे दर तिप्पट होऊ शकतात. त्यामुळे भविष्यात असे खासगी प्रवासी उद्योग व उद्योजक अन्य राज्यात गेले तर त्यात मुंबईचे व पर्यायाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान होऊ शकते, असेही अनेकांचे मत आहे.