माझ्याविरोधात कट रचला, लवकरच गौप्यस्फोट करणार; शिवसेना नेते रामदास कदमांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 23:44 IST2021-11-17T23:43:54+5:302021-11-17T23:44:37+5:30
बाळासाहेबांमुळेच मराठी माणूस आज ताठ मानेने जगतोय. आमच्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना बाळासाहेबांनीच मोठे केले असं रामदास कदम म्हणाले.

माझ्याविरोधात कट रचला, लवकरच गौप्यस्फोट करणार; शिवसेना नेते रामदास कदमांचा इशारा
Ramdas Kadam: मागील काही दिवसांपासून शिवसेनेत बाजूला पडलेले रामदास कदम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रामदास कदम यांनी बुधवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जात त्यांना अभिवादन केले. मंत्री अनिल परब यांच्याविरोधात रामदास कदम यांनीच पुरावे दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाल्यानंतर रामदास कदम यांच्याविरोधात नाराजी पसरली होती. दसरा मेळाव्यातही रामदास कदम अनुपस्थित होते. पण बुधवारी माध्यमांसमोर रामदास कदम यांनी विरोधकांना इशारा दिला.
रामदास कदम म्हणाले की, आगामी काळात मी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहे. माझी बाजू मांडताना अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट होईल. माझ्याविरोधातील बातम्या कुठून येतात. हा कुणाचा कट आहे. हे मला माहिती आहे. मी कडवट शिवसैनिक असून भगव्याची साथ सोडणार नाही असं त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे रामदास कदम नक्की कोणाच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
तसेच बाळासाहेबांमुळेच मराठी माणूस आज ताठ मानेने जगतोय. आमच्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना बाळासाहेबांनीच मोठे केले असंही रामदास कदम म्हणाले आहेत. विशेष म्हणजे रामदास कदम शिवसेना सोडणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. त्यावर कदमांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय आहे वाद?
काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांची एक कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये अनिल परब यांच्याविरोधात रामदास कदम यांनी किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा करण्यात आला होता. ही ऑडिओ क्लिप रामदास कदम यांच्यासाठी अडचणीची ठरली. मनसे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत दावा केला होता. त्यानंतर रामदास कदम यांच्यावर शिवसेनेचे पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहितीही समोर आली होती. रामदास कदम मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत आणि त्यांची मुदत जानेवारीत संपतेय. तिथे त्यांचा पत्ता साफ करण्यासाठीचं आयतं कोलित कदमांच्या विरोधकांना मिळालं.