Devendra Fadnavis Latest News: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा विशिष्ट कालावधीनंतर डोकं वर काढते. आताही जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि या चर्चेला राजकीय वर्तुळात तोंड फुटले. राजकारणात सातत्याने होणाऱ्या या चर्चांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त करत स्पष्ट भूमिका मांडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी 'हिंदी सक्ती हवीच कशाला' अशी लेख संग्रह पुस्तिका भेट दिली. याच मुद्द्यावर बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काल मला हिंदी सक्ती हवीच कशाला, असा मला वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह प्राप्त झाला. यात काही कात्रणे लावण्याची आवश्यकता आहे. त्या कात्रणांमध्ये शासनाच्या समितीने जो अहवाल दिला होता आणि समितीने पहिली ते १२वी पर्यंत हिंदी सक्ती करण्याची शिफारस केली होती."
देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंकडे कोणती मागणी केली?
"तो अहवाल उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळासमोर आला. भाषेच्या उपसमितीमध्ये फक्त तज्ज्ञ नव्हते, तर शिवसेनेचे उपनेते होते, त्यांनीही शिफारस केली होती की, पहिली ते १२वी हिंदी सक्ती करावी. तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला. फक्त स्वीकारलाच नाही, तर आठवड्यानंतर मिनिट्सला मंजूरी दिली. सरकारने स्वीकारल्यानंतर त्याचा शासनादेश असतो. त्यावर माझा आक्षेप नाहीये. फक्त त्यात ठाकरे सरकारला अहवाल सुपूर्द करतानाची बातमी लावा. तो स्वीकारल्याच्या बातम्या लावाव्या. मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर केलेली अधिकृत पोस्टचे कात्रण त्यात लावावे, अशी माझी माफक मागणी आहे", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याच मुद्द्यावर बोलत असताना विरोधकांकडून टिप्पणी केली गेली. त्यावर देवेंद्र फडणवीस जयंत पाटलांना म्हणाले, "हो. आपल्या पुढची भेट घ्यावीच लागेल, नाहीतर यांना (माध्यमांना) खाद्य कसं मिळेल?"
जयंत पाटील भाजपमध्ये जाणार?
"हे एक कठीणच झाले आहे. जयंतराव, तुम्ही माझ्याकडे येऊन गेले की तुम्ही भाजपमध्ये येणार. हे आमच्याकडे येऊन गेले की, हे भाजपसोबत येणार. आपण संवादाच्या गोष्टी करतो आणि आता... मी माध्यमांना दोष देत नाही; पण माझी त्यांना विनंती आहे की, संवाद राहू द्या. कुणी कुणाला भेटले म्हणजे तो त्याच्या पक्षातच चाललाय, त्याची युतीच होतेय, असं नाही", असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पक्षातराच्या चर्चांना उत्तर दिले.