'लाडकी बहीण योजने'च्या गैरवापराची चौकशी सुरू आहे. ज्या लाभार्थ्यांनी चुकीच्या मार्गाने या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचा लाभ बंद केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.रविवारी सातनवरी येथे एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांमध्ये सुमारे २६ लाख महिलांनी या योजनेचा गैरवापर केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात सरकारकडून चौकशी सुरू आहे. जे लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत, त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मतांची चोरी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे, याबाबत विचारले असता यावर मुख्यमंत्री म्हणाले, "गालिब म्हणतो, ‘दिल बहलाने को गालिब खयाल अच्छा है’. ते स्वतःला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना समाधान देण्याचा प्रयत्न करत आहेत की ते जिंकत होते आणि त्यांचा पराभव एका कटामुळे झाला. पण जोपर्यंत ते स्वतःच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करणार नाहीत, तोपर्यंत ते कधीच जिंकू शकणार नाहीत." असेही ते म्हणाले.
खरगेंना आम्ही गांभीर्याने घेत नाहीकाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अलीकडेच एक विधान केले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप बोलतात पण काम कमी करतात.या बाबत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले "खडगेजींबद्दल माझ्याकडे का विचारता? ते बऱ्याच गोष्टी बोलतात, पण आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही. ते गांभीर्याने घेण्यासारखे व्यक्ती नाहीत."
राजकारण भेटींवरून ठरत नाहीराज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात सतत होणाऱ्या भेटींमुळे जनतेत निर्माण झालेल्या राजकीय संभ्रमाबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले "जनतेला गोंधळून जायची काहीच गरज नाही. आमची ‘महायुती’ अखंड आहे. आम्ही निवडणूक ‘महायुती’च्या अंतर्गतच लढवू. कोण कोणाला भेटतं यावरून युती ठरत नाही. राजकारण भेटींवरून ठरत नाही. महायुती निवडणूक लढवेल आणि महायुतीच विजयी होईल."