मिरज : गुंतागुंतीच्या व गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी शासनाच्या आरोग्य योजनेंतर्गत पॅकेजचे दर वाढवण्याची मागणी आमदार इद्रिस नायकवडी यांनी विधान परिषदेत केली. आरोग्य योजनेच्या पॅकेजचे सुधारित दर जाहीर करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्रीप्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिले.अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया विविध शासकीय योजनेत बसत नसल्याने रुग्णांची आर्थिक अडचण होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत इद्रिस नायकवडी यांनी जनआरोग्य व विविध योजनेसंदर्भात लक्षवेधी उपस्थित करून या योजनेतील त्रुटींकडे लक्ष वेधले. महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांसाठी पॅकेजला मंजुरी दिली जाते. मात्र, काही वेळेस शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत झाल्यास खर्च वाढतो. अशावेळी जादा खर्चाची रक्कम भरू शकत नसल्यास रुग्ण व नातेवाईकांची मोठी अडचण होते. वैद्यकीय उपचाराचे दरही जुने असल्याने पॅकेजमध्ये सुधारणा करण्याची मागणी नायकवडी यांनी केली. यावर प्रकाश अबिटकर यांनी या योजनेतील त्रुटींची दखल घेऊन डॉक्टर व शासन प्रतिनिधींसोबत चर्चा करून पॅकेजचे सुधारित दर जाहीर करू असे सांगितले.
यामुळे गुंतागुंतीच्या व गंभीर आजारांवर शस्त्रक्रियेसाठी शासनाच्या आरोग्य योजनेंतर्गत जादा रक्कम मिळण्याची शक्यता असल्याचे नायकवडी यांनी सांगितले. यामुळे रुग्ण व वैद्यकीय व्यावसायिकांनाही याचा फायदा होणार आहे.