डोंबिवलीत जन्म झाला म्हणून अध्यक्ष होणार का?

By Admin | Updated: October 18, 2016 03:42 IST2016-10-18T03:42:16+5:302016-10-18T03:42:16+5:30

एखादा लेखक डोंबिवलीला जन्माला आला म्हणून काय तो तेथील साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणार का

Will Dombivli be born as president? | डोंबिवलीत जन्म झाला म्हणून अध्यक्ष होणार का?

डोंबिवलीत जन्म झाला म्हणून अध्यक्ष होणार का?


डोंबिवली : एखादा लेखक डोंबिवलीला जन्माला आला म्हणून काय तो तेथील साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणार का, असा प्रश्न करत डोंबिवलीला जन्माला येणाऱ्यांनी नंतर ठाण्याला पलायन केल्याची टीका जयप्रकाश घुमटकर यांनी सोमवारी केली. घुमटकर हेही संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत.
आगरी यूथ फोरमच्या कार्यालयाला भेट दिल्यावर ते बोलत होते. निमंत्रक संस्थेची मते मिळविण्यासाठी ही भेट नसल्याचा खुलासा त्यांनी केला. यापूर्वी प्रवीण दवणे आणि अक्षयकुमार काळे यांनी डोंबिवलीत साहित्यिक व आगरी यूथ फोरमच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. अध्यक्षपदासाठी माझी कोणाशी स्पर्धा नाही. साहित्यिक हे बुद्धिजीवी असल्याने त्यांच्यात वाद अपेक्षित नाहीत, तरीही प्रत्येक साहित्य संमेलनात वाद होतात. वादामुळे संमेलने गाजतात. अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, या मताचा मी आहे. निवडणुकीच्या रिंगणात माझे मित्र आहेत. मतांसाठी मी लॉबिंग केलेले नाही. ज्येष्ठ साहित्यिकांनी उमेदवारी अर्ज न भरल्याने मी रिंगणात उतरलो. एखाद्या साहित्यिकाला ८० व्या वर्षी साहित्य संमेलनाध्यक्षपद मिळण्यापेक्षा त्याचे हातपाय हलतात तोवरच संधी मिळाली तर तो मायमराठीसाठी काही तरी काम करु शकतो, असे सांगत घुमटकर यांनी २ नोव्हेंबरपासून प्रचार सुरु करणार असल्याचे जाहीर केले.
>भूमिका न घेणाऱ्या साहित्यिकांना टोला
मराठी साहित्यात दहा वर्षात मरगळ आली आहे. ती दूर करण्याची गरज आहे. उरी हल्ला, काश्मीर प्रश्न यावर सध्या कोणी लिहित नाही. ‘मी गोलघुमट’ नावाने आत्मचरित्र लिहीले. ते आत्मप्रकटन आहे. गांधीजींच्या चरित्रानंतर असे लेखन झालेले नाही. माझ्या प्रखर मतांमुळे माझ्याविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. स्त्रियांना मंदिर प्रवेश नाकारणे, मांसाहारी-शाकाहारी वाद, काश्मीर प्रश्नावर कोणी लिखाण केलेले नसले, तरी मी केलेले आहे, असा टोला त्यांनी स्पर्धेतील अन्य साहित्यिकांना लगावला. १९८१ साली चित्रपट काढण्यासाठी शेतजमीन विकली. मला त्यात अपयश आले. त्यानंतर एका चित्रपटात भूमिका केली. त्यातून आलेल्या अनुभवावर चित्रपट कसा काढावा, हे पुस्तक लिहिले. ते प्रचंड गाजले, हे त्यांनी निदर्शनास आणले.
>महामंडळ पुण्यातच हवे : साहित्य संमेलनाचा खर्च आटोपशीर हवा. साहित्यिक हा मते विकत घ्यायला राजकारणी नाही. मराठी विद्यापीठ वर्ध्याऐवजी पुणे, मुंबई भागात हवे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय पुन्हा पुण्यात आणावे, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाच अनुमोदकांऐवजी एकच हवा, असे मुद्देही घुमटकर यांनी मांडले.

Web Title: Will Dombivli be born as president?