साहित्य संमेलनात नागरिकत्व दुरुस्ती कायदा गाजणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 06:00 AM2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:03+5:30

अध्यक्षीय भाषणात संविधान हा मूळ मुद्दा : ठरावही मांडला जाण्याची शक्यता

Will the Citizenship Amendment Act be hit in Marathi Sahitya Sammelan at usmanabad ? | साहित्य संमेलनात नागरिकत्व दुरुस्ती कायदा गाजणार?

साहित्य संमेलनात नागरिकत्व दुरुस्ती कायदा गाजणार?

googlenewsNext
ठळक मुद्देयंदा संमेलन संत गोरा कुंभार यांच्या पावन भूमीत अर्थात उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारीलासंमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षीय भाषणात संविधान केंद्रस्थानी

- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : सध्या देशाामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन रणकंदन माजले आहे. एनआरसी आणि ‘सीएए’मुळे संविधानातील तत्वांची आणि मुल्यांची पायमल्ली होत असल्याची टीका सर्व स्तरांतून होत आहे. उस्मानाबाद येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही या कायद्याचे पडसाद उमटणार आहेत. संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी अध्यक्षीय भाषणात संविधान केंद्रस्थानी ठेवले असून, संमेलनात मांडण्यात येणा-या ठरावातही या मुद्दयाचा समावेश केला जाणार आहे.
यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संत गोरा कुंभार यांच्या पावन भूमीत अर्थात उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारीदरम्यान होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेतर्फे संमेलनाचे आयोजन केले आहे. साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षीय भाषण, परिसंवाद, तसेच संमेलन ठरावांमधून सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब उमटत असते. सध्या देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा तीव्र निषेध केला जात आहे. अनेक राज्यांमध्ये या कायद्याविरोधात आंदोलने, मोर्चे, सभा सुरु असून, काही ठिकाणी कायद्याच्या समर्थनार्थ रॅली निघत आहे.धर्मनिरपेक्षता हा भारतीय राज्यघटनेचा मुलभूत पाया आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे लोकशाहीची मुल्ये दडपली जात असल्याचा आरोप होत आहे. नियोजितअध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये या मुद्दयाचा प्रामुख्याने समावेश केल्याचे संकेत दिले आहेत. साहित्य संस्थांकडून प्रस्ताव आल्यास, अथवा महामंडळ सदस्याने बैठकीत हा मुद्दा उचलून धरल्यास ठरावामध्येही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत ठाम भूमिका घेतली जाणार आहे.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यापासूनच सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. अमित शहा यांनी मांडलेल्या ‘एक भाषा, एक धर्म’ या संकल्पनेलाही त्यांनी विरोध दर्शवला होता. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर झालाच पाहिजे, असे सांगत ‘एक भाषा, एक धर्म देशात अराजक निर्माण करेल’, असे खडे बोल त्यांनी सुनावले होते. अध्यक्षीय भाषणातही संविधान हेच केंद्रस्थानी असेल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
------------
अध्यक्षीय भाषणाची प्रत आयोजक समितीकडे सोपविली आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला मुलभूत अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांची अंमलबजावणी देशात व्हायला हवी. संविधान हा अध्यक्षीय भाषणाचा पाया असेल. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत चिंतन सुरु आहे. साहित्य, संस्कृती, पर्यावरण यांसह भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली धर्मनिरपेक्षता याबाबत अध्यक्षीय भाषणात भाष्य असेल.
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो, नियोजितअध्यक्ष, उस्मानाबाद अखिलभारतीयमराठीसाहित्य संमेलन
---------------------
घटक तसेच संलग्न साहित्य संस्थांना ठराव पाठवण्याबाबतचे निवेदन पाठवण्यात आले आहे. त्यानुसार संस्थांकडून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतचा ठराव मांडला जाऊ शकतो. महामंडळाच्या बैठकीत ठरावांबाबत चर्चा केली जाईल. महामंडळाचा एखादा सदस्यही याबाबत प्रस्ताव ठेवू शकतो.
- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

Web Title: Will the Citizenship Amendment Act be hit in Marathi Sahitya Sammelan at usmanabad ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.