विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर, शिवसेनेचं समाधान होणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 15:58 IST2018-11-28T15:57:13+5:302018-11-28T15:58:05+5:30
विधानसभा उपाध्यक्षपदाचा कारभार 2014 साली काँग्रेस नेते वसंतराव पुरके यांच्याकडे होता.

विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर, शिवसेनेचं समाधान होणार ?
मुंबई - विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्यादिवशी म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी विधानसभा उपाध्यक्षपदासाठी निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली. विशेष म्हणजे गेल्या 4 वर्षापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे या पदावर आता कोणाची नियक्ती होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.
विधानसभा उपाध्यक्षपदाचा कारभार 2014 साली काँग्रेस नेते वसंतराव पुरके यांच्याकडे होता. मात्र, भाजप-शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर भाजपने हे पद रिक्त ठेवलं आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदावर शिवसेनेनं दावा केला होता. त्यामुळे भाजपनं हे पद रिक्त ठेवलं होतं. आगामी लोकसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे पद भरलं जाणार असल्याचे समजते. या पदासाठी आजपासूनच अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर गुरुवारी नामांकन अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली होती. त्यानंतर लगेच निवडणूक जाहीर झाल्याने या बैठकीत या पदाबाबत चर्चा करण्यात आल्याचीही सुत्रांची माहिती आहे. तर, शिवसेनेला हे पद देऊन शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा भाजपाकडून प्रयत्न होईल, असे दिसून येत आहे.